Wednesday, 26 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·      प्रजासत्ताक दिनानिमित्त नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करू या - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन.

·      निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही.

·      मराठवाड्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा.

आणि

·      राज्यात कर वाढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.

****

राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करूया, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.  मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं त्र्यहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. राज्यानं आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वनं, सर्वसामान्यांना घरं, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केल्याचं ते यावेळी म्हणाले. कोश्यारी यांनी यावेळी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

निर्भया पथकामुळं महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून निर्भया पथकासह विविध निर्भया उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. निर्भया संकल्पगीताचं लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झालं. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलं आहे. शेट्टी यांनी यावेळी ५० लाख रुपये निधी निर्भया पथकासाठी दिला. याच निमित्तानं मुख्यमंत्री निधीत धनादेशाद्वारे जमा झालेला ११ लाख रुपये निधीही महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना, निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती दिली. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

****

मराठवाड्यामध्ये प्रजासत्ताक दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऐकू यात या संदर्भातला वृत्तांत –

औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याची दखल राज्य मंत्रिमंडळानं घेतली असल्याचं सांगत देसाई यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. विविध विकासात्मक कामांमुळं जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचं देसाई म्हणाले.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवगिरी किल्यावर नायब तहसिलदार प्रशांत देवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वीज महावितरण परिमंडल कार्यालयात व्यवस्थापकीय सहसंचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी घटना उद्देश पत्रिकेचं कर्मचाऱ्यांनी सामुहिक वाचन केलं.

जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं.

नांदेड इथं पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. चव्हाण यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरीक, पत्रकार, युवक युवती यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस तसंच विविध दलाच्या पथकांनी यावेळी मानवंदना दिली.

बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस दलातले अधिकारी-कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तुळजाभवानी क्रीडासंकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केला असून विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून प्रयत्न होत केले जात असल्याचं गडाख यांनी सांगितलं.

लातूर इथं पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं देशमुख यांनी मानवंदना स्वीकारून, उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोविड प्रादुर्भावाचा राज्याने तसंच लातूर जिल्ह्याने केलेल्या मुकाबल्याचा उल्लेख करत, संसर्ग टाळण्यासाठी नियमांचं पालन करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला ५० हजार रुपये मदतनिधी दिला जातो, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ११६ मृतांच्या वारसांना सानुग्रह मदत निधी देण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. कोविडजन्य परिस्थितीत दोन्ही पालक गमावलेल्या जगनाथ नागोराव गाडे तसंच पंढरीनाथ महादू कांदे या बालकांना पाच लाख रुपये मुदतठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं.

हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कोविडमुळं अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये ठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. वीर मातेला सरकारच्या वतीनं चार एकर जमीन प्रदान करत असल्याचं प्रमाणपत्रही सुपूर्द करण्यात आले.

हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी, औरंगाबाद

****

राज्याचा अर्थसंकल्प अकरा मार्च रोजी जाहीर केला जाणार असून राज्यात कर वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यांना खूप फटका बसला आहे. गेल्या काळात `एक राष्ट्र, एक कर` असा निर्णय झाला आणि सेवा आणि वस्तू कर आला. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षांच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे, असं पवार म्हणाले. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल, असंही पवार म्हणाले.

****

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग येत्या एक फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजरोहण कार्यक्रमप्रसंगी ते आज बोलत होते. आपल्याला कोरोना विषाणू संसर्गा बरोबर राहायचं असल्यामुळं कृती दल आणि केंद्र सरकारच्या सुचनांचं पालन करावं लागेल, असं ते म्हणाले. राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं, नियमांचं पालन करावं, त्याद्वारे आपण लवकर संसर्गावर मात करू शकू, असं ते म्हणाले. संसर्गामुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे. निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांना नुकसान होत आहे. महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

****

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात ऑलिंपिक दर्जाच्या दहा मीटर `एअर फायरिंग रेंज` आणि मुष्टीयुद्ध `रिंग`चं लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. पोलिस दलातल्या उदयोन्मुख खेळाडुंसह इतर खेळांडुंना सरावासाठी याचा उपयोग होऊन त्यांच्या खेळाचा दर्जा अधिक सुधारेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल असं देसाई यावेळी म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातल्या कर्मचाऱ्यांनी आज `भीक मागा` आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनातून जमा झालेले पैसे निषेध नोंदवण्यासाठी प्रशासनाला पाठवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथं आज पहाटे झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन ट्रक आणि एका सात आसनी वाहनांदरम्यान हा भीषण अपघात झाला. गंभीर जखमींमधे दोन पुरुष, दोन महिला, आणि तीन लहान मुलांचा समावेश असून हे सर्व उस्मानाबाद इथले राहणारे आहेत.

****

 

No comments: