Sunday, 30 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारांची चर्चा नागरिकांनी आपल्या पाल्यांसोबत करावी, यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल तसंच देशाचं नाव उज्ज्वल करण्याचा उत्साह त्यांच्यात निर्माण होईल,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ८५व्या भागात देशवासियांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात देश कसा असावा याबाबत केलेल्या आवाहनाला पत्रांद्वारे मिळालेल्या प्रतिसादांचा विशेष उल्लेख केला. यामधे आसामच्या गुवाहाटीतल्या रिद्धिमा स्वर्गियारीच्या पत्राचा उल्लेख केला. तिनं जगातील सर्वात स्वच्छ, दहशतवादमुक्त, पूर्ण साक्षर, शून्य अपघात आणि शाश्वत तंत्रज्ञानातून अन्न सुरक्षेत सक्षम असणाऱ्या देशाचं स्वप्न व्यक्त केलं आहे. तर उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथल्या नव्या वर्मानं २०४७ मध्ये सर्वाना सन्मानाचं जीवन मिळावं, जिथं शेतकरी समृध्द असावा आणि भ्रष्टाचाराला थारा नसावा असं स्वप्न पाहिलं आहे. तर चेन्नईच्या मोहंमद इब्राहीमनं संरक्षण क्षेत्रात एक सामर्थ्यवान शक्ती म्हणून देशाकडे पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह फक्त आपल्याच देशात आहे असे नव्हे. भारताचा मित्र असलेल्या क्रोएशिया देशातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त  ७५ पोस्ट कार्ड आली आहेत. क्रोएशियाच्या जाग्रेब इथे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस् अॅन्ड डीझाईनच्या विद्यार्थ्यांनी ही कार्डे भारताच्या जनतेसाठी पाठवली आहेत आणि अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

****

राज्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र राज्य मास्क मुक्त करण्याची योजना नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पंढरपूर इथं टोपे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कोविड काळात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद -आयसीएमआरनं मोलाचं कार्य केलं आहे. पाश्चिमात्य देशांनी घेतलेला मास्क सक्ती न करण्याचा निर्णय भारतात लागू करण्यासंदर्भात आयसीएमआरचं अभ्यास करुन याबाबतीत निर्णय घेईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.

किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री निर्णय हा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी घेण्यात आला असून आरोग्य विभाग मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे दोन लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण आढळले तर ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २१ शतांश टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. काल दिवसभरात ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन बाधित दर आता १४ पूर्णांक ५० शतांश टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १८ लाख ८४ हजार ९३७ वर आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

आतापर्यंत देशात १६५ कोटी ७० लाख ६० हजार ६९२ कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात ६२ लाख २२ हजार ६८२ मात्रा देण्यात आल्या. देशात पात्र लोकसंख्येच्या ७५ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. सबका साथ, सबका विकास या तंत्रानुसार देशातील जनतेचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

भारतरत्न लता मंगेशकर कोरोना विषाणू मुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोविडची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना प्राण वायू रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यानं दोन दिवसांपूर्वी ही प्रणाली काढण्यात आली आहे.

****

शहिद दिनानिमित्त देश आज महात्मा गांधींना आदरांजली वाहत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. गांधीजींच्या आदर्शांना लोकप्रिय करण्याचा आपला सामूहिक प्रयत्न असायला हवा, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशामध्ये म्हटलं आहे. ज्यांनी धैर्यानं देशाचं रक्षण केलं, अशा सर्व महान लोकांना आपण आदरांजली वाहतो, त्यांची सेवा आणि पराक्रम सदैव स्मरणात राहील, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजींना आदरांजली अर्पण केली. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढून साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. अशा शब्दात पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

****

No comments: