Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
सुप्रसिद्ध
लेखक, समाजसेवक डॉ.अनिल अवचट यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७७ वर्षांचे
होते.
अनिल अवचट
यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी
आपल्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची
सुरुवात केली होती. त्यांनी व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक
व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
१९६९ मध्ये
त्यांनी आपलं पहिलं पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी
अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य आणि देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ.अनिल
अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं
आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या
कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केलं आहे.
सेवाव्रत
सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं
आपल्यातून निघून जाणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी, अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय
बैठक बोलावली आहे. कोविड प्रादुर्भावामुळे ही बैठक दूरदृश्य पद्धतीने येत्या ३१ तारखेला
होणार असल्याचं, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. त्याच दिवशी संसदेचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे.
****
बँकांद्वारे
दिल्या जाणाऱ्या अर्थ पुरवठ्याबाबतच्या सुविधा, त्याबद्दल वाढत असलेला विश्वास, अर्थपुरवठ्याचा
केला जात असलेला वापर आणि वाढती गुंतवणूक यामुळे विकासदर वाढण्याच्या मोठ्या शक्यता
निर्माण झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यवस्थांकडे
दृष्टीक्षेप, या आपल्या ताज्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे. आगामी २०२२-२३ या आर्थिक
वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर नऊ टक्के राहील, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
****
देशभरातल्या
उमेदवारांकडून होत असलेल्या विरोधामुळे रेल्वेनं सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियेची
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एन टी पी सी अर्थात गैरतांत्रिक लोकप्रिय
श्रेणीतल्या आणि संगणक आधारित परीक्षेच्या पहिल्या टप्प्याची परीक्षा पुढे ढकलली आहे.
पुढच्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. या भरती प्रकियेसंबंधीच्या उमेदवारांच्या
तक्रारी आणि शंकांचं निरसन करण्यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.
उमेदवार त्यांच्या तक्रारी आणि सूचना आर आर बी कमिटी ॲट रेल नेट डॉट जीओव्ही डॉट इन
या ई मेलवर पाठवू शकतात. उमेदवारांना त्यांच्या शंका १६ फेब्रुवारीपर्यंत दाखल करता
येतील, त्यानंतर ही समिती चार मार्चपर्यंत शिफारशी सादर करेल, असं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८५वा भाग असेल.
****
पंतप्रधान
आवास योजनेसाठीचे अनेक पात्र नागरिक, गावागावातल्या राजकारणामुळे लाभापासून वंचीत आहेत,
या योजनेत राजकारण करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी, जिंतूरच्या आमदार मेघना
बोर्डीकर यांनी, काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी उपोषण स्थळी
आमदार बोर्डीकर यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर
त्यांनी उपोषण स्थगित केलं.
****
परभणी जिल्ह्याचे
पालकमंत्री नवाब मलिक यांनी काल जिल्ह्यातल्या विविध विभागांची आढावा बैठक घेतली. सर्व
विभागांच्या कामांची प्रगति आणि अडीअडचणी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकार्यांना योग्य
त्या सूचना केल्या.
****
भारत आणि
वेस्ट इंडिज दरम्यान आगामी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं संघाची घोषणा केली आहे. या मालिकांसाठी रोहीत
शर्मा कर्णधार, तर लोकेश राहुल उपकर्णधार आहे. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी यांना
या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना
सहा फेब्रुवारीला अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment