Saturday, 29 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात सहभागी होण्यासाठीची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातले विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात, इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ऑनलाईन स्पर्धेतर्फे निवडले जातील. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या उद्या प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, मन की बात चा हा ८५ वा भाग असेल.

****

कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून विधीमंडळाचं पुढचं अधिवेशन घेतलं जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राविषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही हा अंतिम निर्णय पालकांचा असेल असं पवार यांनी सांगितलं. पहिली ते आठवी पर्यंत अर्धवेळ चार तास शाळा असेल,सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

लातूर महानगरपालिकेच्या जवळच्या २७ गावांचे एकात्मिक विकास आराखडे तयार करावे. तसंच या संबंधित विविध योजनांचे प्रस्ताव तयार करुन याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणा उभारावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. लातूर इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.

****

ओमानमधील मस्कत इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं चीनला हरवत कांस्य पदक मिळवलं.काल सायंकाळी झालेल्या सामन्यात भारतानं चीनचा २-० अशा फरकानं पराभव केला.

****

No comments: