Monday, 31 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली, त्यावेळी ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात भारताने ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली असून, जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाची खात्री असल्याचं ते म्हणाले. कोविड-19 महामारीच्या काळात भारतानं केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना राष्ट्रपतींनी, लसीकरण कार्यक्रमाने साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्यात भारताची क्षमता सिद्ध केली असल्याचं नमूद केलं. संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात भारतीय बनावटीच्या लसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगून, राष्ट्रपतींनी, कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढ्यात आरोग्य आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं यावेळी कौतुक केलं. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, जन औषधी केंद्र, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, जनधन, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन यासारख्या सरकारच्या अनेक योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२१-२२ या वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करणार आहेत. तर उद्या एक फेब्रुवारी रोजी त्या २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अधिवेशनापूर्वी संसद परिसरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं असून, लोकांसाठी जास्तीत जास्त फलद्रुप करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सर्व कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सर्व पक्षाच्या सदस्यांचं सहकार्य मिळावं, यासाठी सरकारनं देखील आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधातत्मक लसीकरण मोहिमेनं १६६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख ९० हजार ९८६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६६ कोटी तीन लाख ९६ हजार २२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत एक कोटी १८ लाख ५८ हजार १९० पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

****

देशात रेडी टू ईट अर्थात खाण्यास तयार वस्तूंच्या निर्यातीत २४ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील वित्त वर्षाच्या तुलनेत ही वाढ ३९ कोटी ४० लाख डॉलर एवढी आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा आणि श्रीलंका या देशांना प्रामुख्यानं अशा वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या निर्यातीत मागील दहा वर्षात लक्षणीय वृद्धी झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी दिली आहे. या परवानगीच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं देखील प्रवेश क्षमतेत वाढ केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबईच्या कुलाबा इथल्या आय एन एच एस अश्विनी इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन या संस्थेमध्ये मरीन मेडिसीन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन जागा, ठाणे इथल्या राजीव गांधी आणि शिवाजी महाराज रुग्णालयातल्या एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ८० वरुन १००, तसंच अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात पदवी अभ्यासक्रमासाठी दोन जागा वाढवायला राज्य सरकारनं मान्यता दिली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यात सध्या नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी चाचणीला दिलेल्या नमुन्यांपैकी सुमारे ४५ टक्के नमुने कोरोनाबाधित आढळत आहेत. पुण्यात हे प्रमाण ४० टक्के, तर नाशिक आणि वाशिममध्ये ३८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. औरंगाबाद, वर्धा, अकोला, चंद्रपूर, सांगली, नांदेड, नंदूरबारमध्ये रुग्ण आढळण्याचा दर ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परभणी, रायगड, बुलडाणा, बीड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर या नऊ जिल्ह्यांमधला रुग्ण आढळण्याचा दर देशाच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं अडीच कोटीचं रक्त चंदन पोलिसांनी जप्त केलं आहे. एक टन रक्त चंदन बंगळूरुहून कोल्हापूरला नेलं जात असताना, पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, यामुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे.

****

No comments: