Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 January 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर
समितीच्या कार्यगटाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
· येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार
· राज्यातल्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचं आरक्षण निश्चित
· भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळला, दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश
· राज्य महिला आयोगावर शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांच्यासह
सहा जणींची नियुक्ती
· राज्यात ओमायक्रॉनचे ७२ नवे रुग्ण, औरंगाबाद १९, उस्मानाबाद पाच तर लातूर जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश
· कोविड संसर्गाचे नवे २५ हजार ४२५ रुग्ण, मराठवाड्यात ३ जणांचा मृत्यू तर २ हजार
पाचशे छप्पन्न बाधित
आणि
· ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या पार्थिवावर कोणत्याही धार्मिक
विधींशिवाय अंत्यसंस्कार
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर
समितीच्या कार्यगटाचा अहवाल काल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. या अहवालाच्या
अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्याचा
निर्णयही काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कार्यगटात उपमुख्यमंत्री
तथा अर्थ मंत्री यांच्यासह उच्च आणि तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय
शिक्षण आणि औषध द्रव्यं, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा
समावेश करण्यात आला आहे. समितीनं शिफारस केलेल्या काही मुद्यांच्या अनुषंगानं विभागानं
केलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत देण्यात आली. याशिवाय विभागानं प्रस्तावित केलेल्या
विविध समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांच्या आस्थापनेवरील
चिकित्सालयीन आणि अतिविशेषोपचार विषयातील कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतुदींत
सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसंच प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक संवर्गातल्या
अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यात उत्पादित
करण्यात आलेली वाईन, एक हजार चौरस फुटाच्या दुकानातून तसंच सुपर मार्केटमध्ये विकायलाही
काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वाईन उद्योगाला चालना मिळावी,
शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी आदी
उद्दिष्टानं हा निर्णय घेतल्याचं सरकारनं सांगितलं आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प
सादर करतील. संपूर्णपणे डिजिटल स्वरुपात हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आर्थिक
वर्ष २०२२ आणि २३ चा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना युनियन बजेट या मोबाइल अॅपवरही
पाहता येईल. अर्थसंकल्पाच्या भाषणासह सर्व प्रकारची इतर कागदपत्र या अॅपवर उपलब्ध असतील.
****
राज्यातल्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी
मुंबईत काल आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी
१७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या पालम इथल्या नगर पंचायतीचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण
महिलेसाठी राखीव झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित
केलं आहे. त्यामुळं आता या पक्षाची महिला सदस्या नगराध्यक्ष होईल, अशी चिन्हं आहेत.
लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळचं आरक्षण सर्वसाधारण महिला, चाकूरचं सर्वसाधारण, देवणीचं
अनुसूचित जाती, जळकोटचं आरक्षण अनुसूचित जाती महिला, रेणापूरचं अध्यक्षपद सर्वसाधारण
महिलांसाठी आरक्षित झालं आहे.
बीड जिल्ह्यात आष्टी-पाटोदा-शिरूर या तीन नगर पंचायतीसाठी सर्वसाधारण महिलांसाठी
आरक्षण ठेवण्यात आलं आहे. केज नगर पंचायतीचं नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित
झालं असून वडवणी नगर पंचायतीचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी आहे.
जालना जिल्ह्यात जाफराबाद, मंठा, तीर्थपुरी आणि बदनापूर या चारही नगरपंचायतीचं
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं आहे. तर घनसावंगी नगरपंचायतीच नगराध्यक्षपद
सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं
काल फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा
न्यायालयासमोर हजर व्हावं, असे निर्देश सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा, न्यायमूर्ती हिमा
कोहली आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठानं दिले आहेत.
****
राज्यातल्या तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिर, रेणापूरचे रेणुका मंदिर या सारख्या
प्राचीन मंदिरांचा पुरातत्व विभागांतर्गत विकास आराखडा आखून विकास करणार असल्याची माहिती
राज्याचे सांस्कृतिक विकासमंत्री अमित देशमुख यांनी दिली. लातूर जिल्ह्यातल्या औसा,
लातूर आणि रेणापूर तालुक्यातल्या काही गावांच्या विकास कामाचं दूरदृष्य प्रणालीद्वारे
त्यांनी उद्घाटन केलं, त्यावेळी काल ते बोलत होते. या विकास कामाची सुरवात रेणुका माता
मंदिरापासून करू तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या पानगाव चैत्यभूमीचा
विकास करणार असल्याचं ते म्हणाले.
****
वेरूळ लेणी समोरच्या वेरूळ वन उद्यानाचं लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
यांनी काल केलं. या उद्यानात विविध प्रजाती आणि औषधी वनस्पती आहेत. ठाकरे यांनी वेरूळ
पर्यटन केंद्र, कैलास लेणी आणि परिसरासह शहाजी महाराज भोसले स्मारकाची पाहणी केली.
औरंगाबाद शहरातल्या प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना
प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक आणि स्मृती वनाच्या कामाचा आढावाही त्यांनी
घेतला.
****
राज्य महिला आयोगावर सहा नवीन सदस्यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या
नेत्या विधिज्ञ गौरी छाब्रिया, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, शिवसेनेच्या
बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, शिवसेनेच्या सुप्रदा फापर्तेकर, राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या माजी आमदार दिपिका चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरच्या नगरसेविका
आभा पांडे यांचा यात समावेश आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ७२ रुग्ण आढळले असून यामध्ये मराठवाड्यातल्या
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच तर लातूर जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे. तसंच पुणे जिल्ह्यातल्या ३३, मुंबई पाच, ठाणे तीन, यवतमाळ
आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, आणि नागपूर, पुणे ग्रामीण भागातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २५ हजार ४२५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७६ लाख तीस हजार ६०६ झाली आहे. काल ४२ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार
३५८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल ३६ हजार ७०८ रुग्ण बरे
झाले, राज्यात आतापर्यंत ७१ लाख ९७ हजार एक रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख
८७ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २ हजार पाचशे छप्पन्न कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद,
नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे,
औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७१ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले
३७०, तर ग्रामीण भागातले १०१ रुग्ण आहेत. परभणी ६२४, नांदेड जिल्ह्यात ४५७ , लातूर ४०५, बीड जिल्ह्यात १६५, उस्मानाबाद
११९, जालना १५९ आणि हिंगोली जिल्ह्यात १५६ रुग्णांची नव्यानं काल नोंद झाली.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
शाळा आता टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी संयुक्तपणे या संदर्भातले आदेश
काढले आहेत. त्यानुसार कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करून नववी ते बारावीचे
वर्ग ३१ जानेवारीपासून दररोज सुरू होणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दहावी आणि
बारावीचे वर्ग पूर्ववत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातले पहिली ते
आठवीचे वर्ग पाच फेब्रुवारीपर्यंत बंदच राहतील, असं या आदेशांमध्ये नमूद आहे.
****
ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या पार्थिवावर काल पुण्यामध्ये
कोणत्याही धार्मिक विधींशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या
व्यसनमुक्ती क्षेत्रातल्या कार्याचा वसा यापुढंही असाच सुरू राहील, असं मुक्तांगणचे
अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहतांना सांगितलं. तसंच डॉ.
अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या संघर्ष सन्मान पुरस्काराबरोबर
आता पुढील वर्षीपासून डॉ. अनिल अवचट यांच्या स्मरणार्थ सृजन सन्मान पुरस्कार देण्यात
येईल, असंही डॉ. नाडकर्णी यांनी जाहीर केलं.
****
बीड
जिल्ह्यात केज नगर पंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब जाधव यांच्यासह
इतर तीन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चंदन तस्करीचा गुन्हा नोंदवण्यात
आला आहे. जाधव यांच्या मालकीच्या गोदामावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या
पथकानं काल छापा घातला. या छाप्यात ८८ हजार
रूपये मूल्य असलेलं बेकायदेशीर चंदन आढळून आलं.
****
औरंगाबाद
शहराचा पाणी पुरवठा उद्या शनिवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेनं
दिली आहे. फारोळा इथल्या पंपगृहात विद्युत रोहित्राच्या कामासाठी चार तास खंडणकाळ घेण्यात
येणार असल्यानं पाणी पुरवठा योजनेची उचल पूर्णत: बंद राहणार आहे. त्याचा शहराच्या पाणी
वितरणावर उद्या परिणाम होणार आहे.
****
No comments:
Post a Comment