Monday, 31 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२- २३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त देशभर आदरांजली 

·      देशाची संस्कृती संपूर्ण विश्वासाठी अनमोल वारसा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे पाच तर कोविड संसर्गाचे २२ हजार ४४४ नवे रुग्ण, मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर एक हजार ८८५ बाधित

·      राज्य मास्कमुक्त करण्याचा कोणताही विचार नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

·      दहावी - बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

आणि

·      स्पेनच्या राफेन नदालनं ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकत मिळवलं विक्रमी २१वं ग्रँड स्लॅम

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं, या अधिवेशनाला सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाची प्रत दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवली जाईल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, २०२१-२२ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर करतील. उद्या मंगळवारी त्या २०२२- २३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प कागदविरहीत असेल.

कोविड नियमांमुळे दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दोन फेब्रुवारीपासून राज्यसभेचं कामकाज सकाळी १० ते दुपारी तीन या वेळेत, तर लोकसभेचं कामकाज, दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा टप्पा १४ मार्चला सुरू होईल, तो आठ एप्रिलपर्यंत चालेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्यासाठी सरकारनं आज दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता, राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना काल देशभर आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांधीजींना पुष्पार्पण करुन आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत ३० जानेवारी मार्गावर गांधी स्मृती इथं सर्वधर्मिय प्रार्थनासभाही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवर या प्रार्थनासभेला उपस्थित होते. हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्यानिमित्त सर्वांनी दोन मिनिटं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजींना आदरांजली वाहिली.

****

औरंगाबादमध्ये महात्मा गांधी मिशन-एमजीएम विद्यापीठात 'अहिंसेचे तत्वज्ञान', या विषयावर प्राध्यापक जयदेव डोळे यांचं व्याख्यान झालं. यावेळी एमजीएमच्या संगीत विभागाच्या गायकवृंदानं, सर्वधर्म प्रार्थना आणि भजनांच्या माध्यमातून, हुतात्म्यांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ, जगभरातल्या ११९ देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या संकलित पोस्टरचं प्रकाशनही, यावेळी करण्यात आलं.

****

देशाची संस्कृती केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी अनमोल वारसा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते. निसर्गाविषयीचं प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा, ही आपली संस्कृती आणि स्वभाव वैशिष्ट्य आहे, भारतीयांच्या मनातल्या निसर्ग आणि जीवसृष्टी विषयीच्या प्रेमाचं संपूर्ण जगात कौतुक होत असतं, असं ते म्हणाले. भारत ही कायमच शिक्षण आणि ज्ञानाची तपोभूमी राहिली आहे. देशातल्या शिक्षण क्षेत्राचं सक्षमीकरण करण्यासाठी, देशभरात माजी विद्यार्थी, सामान्य व्यक्ती तसंच संस्थात्मक अशा विविध पातळ्यांवर होत असलेल्या प्रयत्नांची दखल, त्यांनी मन की बातमध्ये घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, देश आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची पुनर्स्थापना करत असल्याचं पंतप्रधान महणाले.

****

देशातल्या ६० वर्षावरील ७५ टक्के पात्र लाभार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झालं असून, सबका साथ सबका प्रयास या मंत्रामुळे भारताला हे उद्दिष्ट गाठता आलं, असं ट्विट, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केलं आहे. जनतेनं कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करावं आणि शक्य तितक्या लवकर लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असं त्यांनी ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळले. हे पाचही रुग्ण पुणे शहरातील आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता तीन हजार १३० एवढी झाली असून, यापैकी एक हजार ६७४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २२ हजार ४४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७७ लाख पाच हजार ९६९ झाली आहे. काल ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ५७२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ३९ हजार १५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७३ लाख ३१ हजार ८०६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख २७ हजार ७११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ८८५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७४ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ३२२ तर ग्रामीण भागातले १५२ रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ३५०, नांदेड ३०५, उस्मानाबाद १९४, बीड १७७, जालना १४७, हिंगोली १३६, तर परभणी जिल्ह्यात १०२ रुग्णांची नोंद झाली.

****

राज्य मास्कमुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, युरोपमधल्या राष्ट्रांनी मास्क बाबत जो निर्णय घेतला आहे, त्यावर अभ्यास करून नंतर पुढचा  निर्णय घेण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पंढरपूर इथं काल विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर, ते वार्ताहरांशी ते बोलत होते. सध्या राज्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या कमी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, त्या कोरोना विषाणू मुक्त झाल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

राज्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या आयोजनासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून, विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं त्या म्हणाल्या. कोविड संसर्ग स्थितीचा १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन, परिक्षा मंडळ, एसईआरटी आणि मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या अनेक भागात आजपासून शाळा सुरु होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड नियमांचं पलन करत शाळा सुरु होणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सात फेब्रुवारी पासून सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी दिली आहे. 

****

लातूर जिल्ह्यात तोंडारच्या विलास सहकारी साखर कारखान्यात उत्पादित सहा लाख ११ हजाराव्या साखर पोत्याचं पूजन, पालकमंत्री अमित देशमुख आणि कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलतांना पालकमंत्री देशमुख यांनी, कारखाना परिसरात लवकरच विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, भविष्यात हा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन प्रकल्पांमुळे कारखाना परिसरातील उदगीर, जळकोट, चाकूर, अहमदपूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, नळेगाव या भागातील शेतकऱ्यांना कामं मिळण्यास नदत होईल, असं देशमुख यांनी यावेळी नमूद केलं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, प्राथमिक स्तर पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर आठवी परीक्षेसाठी, नव्यानं प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज, एक फेब्रुवारीपासून  २८ फेब्रुवारी पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. मंडळानं काल ही माहिती दिली.

****

रेल्वे रूळाच्या नविनीकरणाच्या कामामुळे आज, तसंच दोन, पाच आणि सात फेब्रुवारी रोजी, मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबाद ते मनमाड दरम्यान धावणार नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या दैठणा गावात शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे चार एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाच्या शेतात लोंबकळणाऱ्या तारा एकमेकांवर घासल्यामुळे ही आग लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे

****

स्पेनच्या राफेन नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला दोन-सहा, सहा-सात, सहा-चार, सहा-चार, आणि सात-पाच असं पराभूत करत, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली आहे. त्याचं हे २१वं ग्रँड स्लॅम असून, जगात सर्वाधिक ग्रँडस्लॅम मिळवणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दोघांना प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिलालेली आहेत.

****

राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा, पुणे जिल्ह्यातल्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी निषेध केला आहे. त्यांना २०१७ मध्ये व्यसनमुक्तीबाबत शासनानं महात्मा गांधी यांच्या नावानं पुरस्कार दिला होता, काल महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला मावळे यांनी हा पुरस्कार  परत केला.

****

राज्यातल्या यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे १२ कोटी रुपये वितरित करण्यास, वित्त विभागानं सहमती दर्शवली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ४८ कोटी रुपयांचा निधी याआधी वितरीत करण्यात आला असल्याचं, त्यांनी सांगितलं. सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या नऊ हजार ६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल परताव्याची रक्कम मिळणार असल्याची माहितीही, शेख यांनी दिली.

****

No comments: