आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ
स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांचं
काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताई अनाथ
मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सदैव कार्यरत राहिल्या.
****
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान करणाऱ्या
तपासणी संचाला, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आय सी एम आर कडून मंजुरी देण्यात आली
आहे. ‘ओमीशुअर-कीट’ असं या तपासणी संचाचं नाव असून, टाटा मेडिकलने हा संच तयार केला
आहे.
****
मुंबई बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित सहकार पॅनलनं सर्व
२१ जागांवर विजय मिळवला. मात्र बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांना सहकार विभागानं मजूर म्हणून अपात्र ठरवलं आहे. १९९७ पासून दरेकर
हे मजूर प्रवर्गातून ही निवडणूक लढवत आहेत. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी ते मजूर नसल्याची
तक्रार दाखल झाल्यानंतर सहकार खात्याने त्यानुषंगाने चौकशी केली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथल्या वीज कंपनीचे सहायक अभियंता सत्यनारायण
वडगावकर यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वडगावकर यांनी
नगरपंचायत निवडणुकीतले प्रभाग क्रमांक ११चे भाजपचे उमेदवार गजानन घोगरे यांच्या समर्थनार्थ
१५ डिसेंबरला सामाजिक माध्यमांवर प्रचार केला. गटविकास अधिकारी सखाराम बेले यांच्या
तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात सहायक अभियंता वडगावकर यांच्या विरोधात आचारसंहिता
भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
देशात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, यंदाची रणजी क्रिकेट स्पर्धा
रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयने घेतला आहे. कर्नल सी
के नायडू चषक स्पर्धा तसंच ज्येष्ठ महिलांची टी ट्वेंटी स्पर्धाही रद्द करण्यात आली
आहे.
****
मराठवाड्यात काल २३३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात
१०३ नव्या रुग्णांची नोंद झाली, यात शहरातल्या ८७, तर ग्रामीण भागातल्या १६ रुग्णांचा
समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment