Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल
करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे.
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या कोविड प्रतिबंधक
लसीकरणाला सुरवात.
· वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाच्या शाळा ३१
जानेवारीपर्यंत बंद.
· क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
· दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी.
****
देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या कोविड प्रतिबंधक
लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी
पात्र असतील, असं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीन प्रियदर्शनी केंद्रीय विद्यालयात पालकमंत्री
सुभाष देसाई यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त
तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि
विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
नाशिक इथं महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्री
डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. केंद्र शासनाने सुरू केलेल्या
या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावं असं आवाहन डॉक्टर भारती
पवार यांनी केलं.
****
जालना इथं १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा
शुभारंभ राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते
करण्यात आला. जिल्हा महिला रुग्णालयात सुरु झालेल्या या कार्यक्रमाला महिला आर्थिक
विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आणि आरोग्य
कर्मचारी उपस्थित होते.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त
प्रदीप जगताप यांच्या उपस्थितीत शिवाजी महाविद्यालयात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा
शुभारंभ करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला
आजपासून सुरुवात झाली. शहरातल्या सरजूदेवी कन्या विद्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात झाली.
****
बीड इथं सावरकर विद्यालय, जिल्हा रूग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय,
यासह इतर ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सकाळपासून लसीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
या केंद्रांवर रांगा लावल्याचं दिसून येत होतं.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात भोसी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात
जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांच्या हस्ते किशोरवयीन मुलांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक
लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
****
पालकांनी निश्चिंत मनाने आपल्या पाल्यांना लसीकरण केंद्रावर नेऊन लस द्यावी,
या कामी शिक्षक, शिक्षण संस्थाचालक तसंच सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यावा असं आवाहन,
राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.
ते आज लातूर इथं बोलत होते. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी किंवा या
लाटेचा प्रभाव कमी रहावा यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्याची काटेकोर
अमंलबजावणी करण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
****
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने
दहावी तसंच बारावी वगळता, पहिली ते नववीच्या शाळा तसंच अकरावीचे वर्ग बंद करण्याचा
निर्णय घेतला आहे. या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार असून, या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने
अध्यापन सुरू ठेवलं जाणार असल्याचं, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं याबाबत जारी केलेल्या
पत्रकात म्हटलं आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या पात्र विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी
शाळेत बोलावलं जाणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत
गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ दिसून येत आहे
****
जम्मू काश्मिरच्या सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने झुडपांमध्ये
लपवून ठेवण्यात आलेला शस्त्रसाठा आणि अंमलीपदार्थ जप्त केले. ही सर्व शस्त्रे उर्दू
भाषेत छापील मजकूर असलेल्या एका पोत्यात ठेवण्यात आली होती. हे पोते पाकिस्तानातलं
असल्याचं बोललं जात आहे. या पोत्यात तीन एके ४७ रायफल्स, ४ पिस्तुलं, हेरॉईनची ५ पाकिटं
आणि १४ गोळ्या सापडल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं ५० लाखांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त
करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक परिसरातल पोलिसांनी ही कारवाई केली. कर्नाटकातील
अथणीहून पुण्याकडे हा गुटखा टेम्पोमधून पाठवला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन
आरोपींना अटक केली असून, दाऊल मुल्ला आणि हसन सनदी अशी त्यांची नावं आहेत.
****
देशातल्या पहिल्या महिला शिक्षक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
मुंबईत आपल्या निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
आदरांजली वाहिली.
औरंगाबादसह बीड, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, तसंच नांदेड जिल्हाधिकारी
कार्यालयात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद शहरातल्या औरंगपुरा इथं विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या
वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून
आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात भोसी इथं आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं आजपासून सुरवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर
भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच
बाद १२५ धावा झाल्या होत्या. कर्णधार के एल राहुल ५०, मयांक अग्रवाल २६, हनुमा विहारी
२०, चेतेश्वर पुजारा ३, तर अजिंक्य राहणे शून्यावर बाद झाला.
****
नांदेड-हिंगोली महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ आज खाजगी बस पहाटे उलटून
झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले. छत्तीसगडच्या रायपूरहून निघालेली बस सोलापूरकडे
जात होती.
****
No comments:
Post a Comment