Sunday, 2 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोविड मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचं केंद्राचं आवाहन.

·      उदगीर इथल्या नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची एकमतानं निवड.

आणि

·      शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मराठवाड्यातून किसान रेल्वे उपलब्ध करून देणार - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं आश्वासन.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी राज्यशासनांनी कोविड तपासण्या, सतर्कता, तसंच कोविड नियमावलीचं पालन आदी गोष्टींवर भर द्यावा असं राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण आणि कोविडविषयक नियमावलीचं पालन हे प्रमुख स्तंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. कोविड रुग्णांचं निदान आणि उपचारासाठी सहाय्यकारक ठरणाऱ्या वेबिनार शृंखलेचं आयोजन राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या उत्कृष्टता केंद्रांच्या सहकार्यानं येत्या ५ ते १९ जानेवारी दरम्यान करण्यात येणार असल्याचं भूषण यांनी सांगितलं.

****

देशात सुमारे ९० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीची पहिली तर ६५ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचं उद्दीष्ट साध्य झालं नसल्यासंदर्भात माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचं, केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातलं कोविड प्रतिबंधक लसीकरण अधिक यशस्वी झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेत सुमारे ७३ टक्के, ब्रिटनमध्ये सुमारे ७६ टक्के, फ्रान्समध्ये सुमारे ७८ टक्के, तर स्पेनमध्ये आतापर्यंत सुमारे ८५ टक्के नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. भारतात हे प्रमाण ९० टक्क्यांवर असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान, १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला उद्यापासून सुरवात होणार आहे. यासाठीची नोंदणी कालपासून सुरु झाली आहे. या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने दिलेलं ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. विनानोंदणी थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही विद्यार्थ्यांना लस घेता येणार आहे.

****

उदगीर इथल्या नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची एकमतानं निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या उदगीर इथं झालेल्या बैठकीत सासणे यांच्या अध्यक्षपदावर एकमत झालं. २७ मार्च १९५१ रोजी जालना इथं जन्मलेले सासणे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत विविध पदांवर काम केलं. सासणे यांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित लेख संग्रह, नाटकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.

२०१० मध्ये वैजापूर इथं झालेलं पाचवं राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, वसमत इथं २०१४ मध्ये झालेलं ३५ वं मराठवाडा साहित्य संमेलन, तसंच नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचं २०१६ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सासणे यांनी भुषवलं आहे. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल सासणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. येत्या मार्च महिन्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं हे संमेलन आयोजित केलं जाण्याची शक्यता आहे.

****

इंडियन ऑइल कंपनीने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात केली आहे. या निर्णयामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.

****

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मराठवाड्यातून किसान रेल्वे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं आश्वासन, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. ते आज जालना इथं किसान रेल्वे तसंच नांदेड हडपसर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आसाम मधल्या जोरहट इथं पाठवलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले –

जालन्यामधून आसामला कांदा पाठवला. आपल्या भागामध्ये अठराशे रुपये कांद्याचा भाव आहे. आसाम जोरहटला अठ्ठावीसशे रूपये कांद्याचा भाव आहे. एक क्विंटलला फक्त सव्वातीनशे ते साडेतीनशे रुपये भाडे लागते, परंतू हजार रुपये क्विंटलमागे शेतकऱ्यांचा फायदा होतो. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची एक घोषणा दिलेली आहे. आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेतकरी व्हावा या संकल्पनेतून ही किसान रेल्वे जालन्यातून सोडण्यात आलेली आहे.

 

एक हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यातून दररोज चारशेहून अधिक खाजगी बस पुण्याला जातात, त्यामुळे नांदेड-हडपसर ही नवीन एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

नांदेड, परभणी, जालना, औरंगाबादहून जवळपास साडे चारशे ट्रॅव्हल्स पुण्याला जातात. ट्रॅफिकमुळे सहा ते सात तास लागतात. परंतू यामुळे मराठवाड्यातील जनतेची फार मोठी सोय होणार आहे.

****

महाराष्ट्र पोलीस दल आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या बोधवाक्याप्रमाणे प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरं जाणाऱ्या, अहोरात्र निष्ठेने आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

****

जालना जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातल्या एक लाख ३१ हजार ७५५ मुलांना उद्या ३ तारखेपासून कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागानं जालना जिल्ह्यातल्या ५१६ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं असून, महाविद्यालयांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली. दरम्यान, येत्या दहा जानेवारीपासून जिल्ह्यातल्या सुमारे १४ हजार आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची बुस्टर मात्रा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जालना तसंच परभणी जिल्ह्यात आज प्रत्येकी दहा तर नांदेड जिल्ह्यात आज नऊ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

****

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नियोजीत सापळी धरण रद्द करुन कयाधू नदीवर बंधारे बांधण्याच्या मागणीसाठी, जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचं पाणी पळवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबतच शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं उद्या ‘गौरव शिक्षकांचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. उद्या दुपारी साडे बारा वाजता तापडिया नाट्यमंदिरात हा सत्कार सोहळा होणार आहे.

****

No comments: