Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 04 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल
करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा,
हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण
०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· ओमायक्रॉन संसर्ग झाल्याचं निदान करणाऱ्या तपासणी संचाला आयसीएमआरची मंजुरी.
· कोविड संदर्भात वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला गती देण्याचे, केंद्रीय
आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे राज्य सरकारला निर्देश.
· ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचं येत्या ७, ८, आणि ९ जानेवारीला सोलापुरात
आयोजन.
आणि
· परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डासाळा शाखेचे पाच लाख रुपये चोरट्यांकडून
लंपास.
****
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान करणाऱ्या
तपासणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरकडून मंजुरी देण्यात आली आहे.
‘ओमीशुअर-कीट’ असं या तपासणी संचाचं नाव आहे. टाटा मेडिकलने हा तपासणी संच तयार केला
आहे.
****
कोविड संदर्भात राज्यात वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला गती देण्याचे
निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राज्य सरकारला दिले आहेत.
आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, राज्यात यासंदर्भातली काम संथगतीनं चालू असल्याबद्दल
डॉ पवार यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने राज्यांना पुरेसा निधी दिलेला आहे,
तो आवश्यक सुविधांवर खर्च का झाला नाही, याकडे लक्ष देण्याची गरज डॉ पवार यांनी व्यक्त
केली. त्या म्हणाल्या –
केंद्राने
पूर्ण बजेट सगळ्या राज्यांना दिलंय. ए सी आर पी – 1, ए सी आर पी – 2 हे असे बजेट आहेत
एक्स्ट्रा की जे या कोविड काळामधे विशेष दिले गेले. राज्यांनी न मागता दिले. त्यातही
ते राज्य सरकारांनी खर्च करून ती ती व्यवस्था तयार करायची आहे. मग त्याच्यात बेडस्
आले, आय सी यु आले. व्हेंटीलेटर आले. ऑक्सिजन पाईपलाईनपासून अगदी मायनर गोष्टींना लक्षात
घेऊन हे बजट दिलंय. केंद्र सरकार कुठे कमी पडलंय आजपर्यंत हे आम्हाला कळू द्या. हेल्थ
बजेट एक्स्ट्रा दिलं गेलंय. एन एम एच व्यतिरिक्त तर ते खर्च झालं नसेल तर काय कारण
आहे. काम चालू आहे. काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही. परंतू संथ
गतीने चालू आहे. आपल्या माध्यमातनं माझी विनंती आहे राज्य सरकारने थोडी गती वाढवावी.
****
राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार
अरविंद सावंत यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही
माहिती दिली. शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती
उत्तम असून लवकरच आपल्या सेवेत हजर होईन असं त्यांनी आपल्यां संदेशात म्हटलं आहे. तर
खासदार सावंत यांनी स्वतः विलगीकरणात जात असल्याचं सांगितलं. संपर्कात आलेल्या सर्वांनी
आपली कोरोना तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन दोघांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज नवीन
१२ तर नांदेड जिल्ह्यात नव्या २९ कोविड बाधितांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात सध्या
५४ रुग्णांवर तर नांदेड जिल्ह्यात सध्या ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
आज जागतिक ब्रेल दिन आहे. दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपी तयार करणारे लुई
ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ४ जानेवारीला हा दिवस पाळला जातो. लुई ब्रेल यांचा
जन्म फ्रान्समध्ये १८०९ मध्ये झाला होता. ब्रेल यांना वयाच्या १५ व्या वर्षी एका अपघातानंतर
अंधत्व आलं. त्यानंतर त्यांनी चार्ल्स बार्बियरच्या रात्री लिखाण पद्धतीवर आधारित वाचन
आणि लेखन प्रणाली तयार केली. ब्रेल ही वर्णमाला आणि संख्यात्मक चिन्हांची एक स्पर्श
प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रत्येक अक्षर, संख्या, संगीत, गणितीय आणि वैज्ञानिक चिन्हं
दर्शवण्यासाठी सहा ठिपक्यांची रचना वेगवेगळ्या पद्धतीनं वापरली जाते.
****
३४ वं राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७, ८, आणि ९ जानेवारीला सोलापुरात
आयोजित करण्यात आलं आहे. डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी ही माहिती
दिली. डॉ. मेतन फाउंडेशन, सामाजिक वनीकर तसंच वन विभागाच्या सहकार्याने हे संमेलन भरवण्यात
येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून डॉ निनाद
शहा यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे. या संमेलनात पहिल्या दिवशी ७ जानेवारीला
‘जखमी पक्ष्यांची निगा कशी राखावी’ तसंच ‘फोटो एडिटिंग’ या विषयांवर कार्यशाळा होणार
आहेत. ८ तसंच ९ जानेवारीला पक्षी या विषयांवर व्याख्याने, शोध निबंध, मुलाखत आणि चर्चासत्र
होणार आहे.
****
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू
असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण
आफ्रिकेचा संघ सध्या ११ धावांनी पिछाडीवर आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, दक्षिण
आफ्रिका संघानं सात बाद १९१ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूरनं पाच तर मोहम्मद शमीनं
दोन बळी घेतले. भारतानं पहिल्या डाव्यात २०२ धावा केल्या आहेत.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डासाळा शाखेचे पाच लाख रुपये
आज चोरट्यांनी लांबवले. डासाळा शाखेचे शाखाधिकारी केशव मांडे आणि रोखपाल बालासाहेब
जाधव हे दोघे सेलू इथून आज सकाळी रोख रक्कम घेऊन निघाले असता, मोटार सायकल वरून आलेल्या
दोन चोरट्यांनी या दोघांच्या डोळ्यात स्प्रे मारून पाच लाख रुपये असलेली पिशवी पळवली.
पोलिसांनी चोरांचा पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या रकमेतील
पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकून चोर पसार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
लातूर शहरातल्या १६, १७ आणि १८ क्रमांकाच्या प्रभागातील संजय गांधी निराधार
योजनेची नियोजित समाधान शिबीरं काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहेत. संजय गांधी
निराधार योजनेचे लातूर शहराध्यक्ष हकीम भाई शेख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही
माहिती दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय
घेण्यात आला असून, प्रादुर्भाव कमी होताच सदरील प्रभागात होणाऱ्या समाधान शिबिराचा
तारखा जाहीर करण्यात येतील असंही या पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment