Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
९९ लाख २७ हजार ७९७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४६ कोटी ७०
लाख १८ हजार ४६४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या ३७ हजार ३७९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२४ रुग्णांचा
उपचारादरम्यान मत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ४९ लाख ६०
हजार २६१ झाली असून, आतापर्यंत चार लाख ८२ हजार १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
११ हजार सात रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४३ लाख सहा हजार ४१४ रुग्ण कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७१ हजार ८३० रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई तसंच
ठाणे महापालिकेनं दहावी तसंच बारावी वगळता, पहिली ते नववीच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग
बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार असून, या दरम्यान
ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन सुरू ठेवलं जाणार असल्याचं, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं याबाबत
जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
शासनानं
संप मागे घ्यायचं आवाहन करूनही आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरुच ठेवल्यामुळे राज्य
परिवहन महामंडळानं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांविरोधात बडतर्फीची कारवाई केली. काल ११०
कर्मचारी बडतर्फ केल्याचं महामंडळानं कळवलं आहे. यामुळे या संपादरम्यान बडतर्फ केलेल्या
कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ झाली आहे, तर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या
११ हजार २४ झाली आहे. याशिवाय २ हजार ६११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचं
महामंडळानं कळवलं आहे.
****
पालघर
जिल्ह्यातल्या मनोर ग्रामपंचायत हद्दीतल्या पाटील पाड्यातल्या २६ लोकांना विषबाधा झाल्याची
घटना समोर आली आहे. तिथे असलेल्या विहिरीच्या पाण्यामुळे किंवा गावात झालेल्या गाव
देवाच्या धार्मिक कार्यक्रमानंतर खाल्लेल्या प्रसादामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक
अंदाज आहे. पाटील पाडा परिसरातल्या नागरिकांना जुलाब, उलट्या सुरू झाल्या होत्या, ही
संख्या अचानक वाढल्यामुळे आरोग्य विभागानं केलेल्या सर्वेक्षणात, २६ नागरिकांना ही
बाधा झाल्याचं उघडकीस आलं. यापैकी १४ जण बरे झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे
जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगानं जिल्हा विशेष शाखेत चालत असलेल्या
कामाची माहिती देणारं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील
यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं.
****
परभणी
जिल्हा परिषदेच्या वतीनं सात आरोग्य केंद्रांना काल प्रत्येकी एक रुग्णवाहिका वितरित
करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर, आरोग्य सभापती अंजली आनेराव
यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध
झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३७ आरोग्य केंद्र असून २१ ठिकाणी शासनाकडून नव्या रुग्णवाहिका
उपलब्ध झाल्या होत्या. तसंच गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या आमदार निधीतून
नऊ, अशा एकूण ३० ठिकाणी रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या. जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा,
वझरहंडी, कौसडी, येलदरी, परभणी तालुक्यातल्या जांब, पिंगळी तर सेलू तालुक्यातल्या देऊळगाव
गात या उर्वरित सात ठिकाणी काल रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात जपानी मेंदूज्वर लसीकरण मोहीम कालपासून सुरु झाली. जिल्ह्यातील एक ते पंधरा
वर्षे वयोगटातल्या सर्व बालकांना जपानी मेंदूज्वर प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यात येणार
असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी दिली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या कळंब इथल्या पुरस्कार सेवा समितीच्या वतीनं देण्यात येणारे उत्कृष्ट
पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,
आरोग्य या विषयावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात
येतं. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी, दैनिक
देशभक्त चे लक्ष्मण शिंदे, दैनिक संघर्षाचे संभाजी गिड्डे, दैनिक सामनाचे अशोक शिंदे
यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. येत्या सहा जानेवारीला दर्पण दिनी हे पुरस्कार समारंभपूर्वक
वितरित केले जाणार आहेत.
****
तुळजापूरच्या
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त मंचकी निद्रेला कालपासून
प्रारंभ झाला. १० तारखेला पहाटे देवी पुन्हा सिंहासनारूढ होणार असून त्या दिवशी दुपारी
घटस्थापनेने शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.
****
No comments:
Post a Comment