Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 March
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२५ मार्च २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं
आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
बनावट कोविड मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र
सरकारला चौकशीची परवानगी
·
मराठी राजभाषा विधेयक विधान परिषदेत मंजूर; अर्थसंकल्पीय
अधिवेशनाचा आज समारोप
·
महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित
करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
·
पहिली ते नववी आणि ११ वीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत घेण्याची
शिक्षण विभागाची सूचना
·
औरंगाबाद इथल्या कोविड उपचार केंद्रांमधून लाखो रुपयांचं
साहित्य गायब झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
·
जालना जिल्ह्यात तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
·
विकेल ते पिकेल अंतर्गत नांदेड इथं भरवलेल्या धान्य महोत्सवाचा
समारोप
****
कोरोना
संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा बनावट अर्ज करुन सरकार कडून नुकसान भरपाई घेतलेल्या प्रकरणांची
चौकशी करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिली आहे. मृत्यूंची संख्या
आणि दावे यात फरक असणाऱ्या आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातल्या
५ टक्के प्रकरणांची केंद्र सरकार चौकशी करू शकतं, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या
महिन्याच्या २८ मार्चपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ६० दिवसांच्या
आत तर त्यापुढील दाव्यांसाठी ९० दिवसांच्या आत अर्ज करावेत, अशी सूचना न्यायालयानं
केली आहे.
****
मराठी
राजभाषा विधेयक-२०२२ काल विधान परिषदेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. या कायद्याची
काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, तसंच सुलभ मराठी राज्य व्यवहार कोष आणणार असल्याची माहिती,
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या विधेयकावर चर्चेच्या वेळी दिली. या विधेयकानुसार
आता केंद्राच्या राज्यातल्या कार्यालयापासून सर्व कार्यालयांमध्ये मराठी ही अनिवार्य
असेल, असं देसाई यांनी स्पष्ट केलं. मराठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
होणार असल्याचं ते म्हणाले.
****
विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेधनात काल अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाला, अधिवेशनाचा आज समारोप
होत आहे.
****
महिला
आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीनं कारवाई करण्यासाठीचं,
'महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय विधेयक', काल विधान परिषदेत मंजूर झालं. शक्ती विधेयकाला
बळकटी आणण्यासाठीच्या या विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहानं एकमतानं मंजुरी
दिली. या विधेयकात विशेष न्यायालयाची स्थापना करणं, तसचं महिला अत्याचार प्रकरणातील
अपराधाचं गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात
आली आहे.
****
महाविकास
आघाडीचं सरकार हे फक्त बोलणारं सरकार नाही तर, बोललेलं करुन दाखवणारं सरकार असल्याचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान सभेत सांगितलं. केंद्राच्या ज्या जागा मुंबईत
आहेत त्याचा विनियोग केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
करुन त्याचा निकाल लावला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्य
सरकारच्या पातळीवर मोठी उदासीनता असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र
फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये केला. त्यांनी यावेळी आणखी एक `पेनड्राईव्ह` विधानसभेत
सादर केला आणि हा `पेनड्राईव्ह` यावेळी गृहमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं नमूद केलं.
****
राज्यातला
कुठलाही विभाग दुर्लक्षित ठेवण्याची सरकारची भूमिका नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी काल स्पष्ट केलं. विदर्भाला २६ टक्के, मराठवाड्याला १८ पूर्णांक ७५ शतांश टक्के
आणि उर्वरित महाराष्ट्राला ५५ टक्के निधी देण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्यातले
साखर कारखाने जाणीवपूर्वक विकलेले नसून अद्यापही ११ साखर कारखाने भाडेतत्वावर देण्यासाठी
शिल्लक आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
****
राज्यात
उद्योगांना मिळणारी विद्युत शुल्कमाफी मोबाईल टॉवर कंपन्याना कुठल्या आधारे देण्यात
आली, याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन पवार यांनी विधान परिषदेत दिलं. माजी ऊर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्न उपस्थित केला होता. जालना इथल्या `एसआरजे पीटी
स्टील` कंपनीच्या विनंतीवर ऊर्जा मंत्रालयानं तब्बल २८ कोटी रुपये अनुदान बहाल केलं
असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
महावितरणच्या
सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आणि महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित
कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची दखल घेत त्यांना निलंबित करण्याचे
आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधान सभेत दिले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही
लक्षवेधी उपस्थित केली होती. महावितरणचे निवृत्त संचालक दिनेश साबू यांनी साडे तीन
हजार कोटी रुपयांचा वीज खरेदी घोटाळा करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी
करुन उचित कारवाई करण्यात येईल, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लातुर
जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेंतर्गत फळबाग लागवड प्रस्तावाबाबत कृषीमंत्री आणि रोजगार हमी मंत्री यांच्यासोबत
बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी
काल विधानसभेत दिली. अभिमन्यू पवार यांनी या प्रलंबित प्रस्तावाबाबतचा प्रश्न उपस्थित
केला होता.
****
पहिली
ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने
दिल्या आहेत. कोविड काळात विद्यार्थ्यांचं झालेलं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी
हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा
घ्याव्यात, आणि मे महिन्यात निकाल जाहीर करावा, तसंच शाळांना शनिवारी पूर्णवेळ वर्ग
घेऊन, ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असं शिक्षण विभागाने जारी
केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे १३९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ७२ हजार ९५६ झाली आहे. या संसर्गानं काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात सध्या ९६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी चार नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली. नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही
नवा रुग्ण आढळला नाही.
****
औरंगाबाद
इथल्या कोविड उपचार केंद्रामधून लाखो रुपयांचं साहित्य गायब झाल्याप्रकरणी महानगरपालिका
प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर
बंद करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधलं साहित्य गायब झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर हे
आदेश देण्यात आले असून, गायब झालेलं साहित्य परत न मिळाल्यास त्याची जबाबदारी आरोग्य
अधिकार्यांची राहील, असंही पांडेय यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी २५ केंद्रांमधल्या कर्मचार्यांची
देखील चौकशी करण्यात येणार आहे.
****
जालना
जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या संकनपुरी इथं नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी
मुलांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. आकाश नाचन, करण नाचण आणि अयज टेकाळे अशी मृत
मुलांची नावं आहेत. यातला आकाश आणि करण इयत्ता सातवी तर अजय हा पाचवीच्या वर्गात शिक्षण
घेत होता, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
****
शेतकरी
गट, शेतकरी उत्पादकांनी कंपनी स्थापण्यासाठी एकत्र येवून शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतः
उद्योजक व्हावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरातील धान्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या धान्य महोत्सवामध्ये
६० वैयक्तिक शेतकरी, ६० महिला, शेतकरी गट आणि दहा शेतकरी उत्पादक कंपनी सहभागी झाल्या
होत्या. या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकला असून विक्री झालेल्या
शेतमालाची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. याशिवाय सुमारे २५ लाख रुपयांच्या शेतमालाची
आगाऊ नोंदणी ग्राहकांनी शेतकऱ्यांकडे केली असल्याचं इटनकर यांनी सांगितलं.
****
जागतिक
क्षयरोग जनजागृती दिवस काल पाळण्यात आला. औरंगाबाद महापालिकेतर्फे यानिमित्त सायकल
फेरी काढण्यात आली. महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग दिनानिमित्त प्रतिज्ञाही
घेण्यात आली.
****
पैठण
इथं सुरू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवाची आज सांगता होत आहे. काल
नाथपादुकांची छबिना पालखी काढून, आज पादुकांना गोदास्नान घालण्यात आलं. सायंकाळी नाथमंदिराच्या प्रांगणात काल्याच्या कीर्तनानंतर
कालाहंडी फोडली जाणार आहे
****
वक्फ
मंडळाच्या एका प्रकरणात अनुकूल निकाल लावण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेणाऱ्या इसमाला
औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. शेख फैसल मोहमद इकबाल असं या
इसमाचं नाव आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट पंचायत समितीतला कृषी विस्तार अधिकारी संजय एकनाथ घुमटकर याला
सात हजार रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. मंजूर झालेल्या विहिरीची बांधकाम
पाहणी तसंच शिल्लक देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी घुमटकर यानं दहा हजार रुपये लाचेची
मागणी केली होती.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या कळंब इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयातल्या सविता उत्तम इर्लेकर या शिपाई
महिलेला, ६०० रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ पकडलं. प्लॉटच्या
नकला देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती.
****
परभणी
जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या आलेगावला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल भेट
दिली. सरपंच गोकर्णा गोविंद सवराते तसंच इतर संबंधित अधिकारी यावेळी प्रमुख उपस्थित
होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना, आत्मा योजना तसंच कृषी विभागाच्या
इतर योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या
जाणून घेतल्या तसंच विविध योजनांचा लाभ घेण्याच्या सूचना केल्या.
****
अल्पसंख्याक
समाजातल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दहावी पूर्व शिष्यवृत्ती
देण्यात येत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात
अडथळे येत असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर
यांनी व्यक्त केली आहे. ते काल नांदेड इथं या संदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते.
****
नांदेड
जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या जानापुरी इथं स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद वितरणाचा
कार्यक्रम काल झाला. यावेळी गावातल्या १० मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात आली. ग्रामपंचायत
कार्यालयामार्फत गावातील घरांचे नकाशे आणि कायदेशीर कागद मिळाल्यामुळे लोकांनी समाधान
व्यक्त केलं.
****
`नांदेड
- जम्मू तावी - नांदेड साप्ताहिक हमसफर जलद रेल्वेगाडीचे दोन डबे वाढवण्यात आले आहेत.
या गाडीच्या तृतीय श्रेणी वातानुकुलीत श्रेणीचे चार डबे कमी करण्यात येणार असून द्वितीय
शयनयान श्रेणीचे सहा डबे वाढवण्यात येणार आहेत. ही गाडी आता १८ डब्यांची झाली आहे.
येत्या एक एप्रिलपासून हा बदल अंमलात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागानं कळवलं आहे.
****
नांदेड
शहरातल्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात कालपासून मेंदू विकार असलेल्या मुलांची
आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर सुरू झालं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या शिबीरात मुंबई
ईथून ४० डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी भेट देऊन
या उपक्रमाची प्रशंसा केली.
****
No comments:
Post a Comment