Monday, 25 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.04.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसून, मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीत हजर राहणार नाहीत. सर्वपक्षीय नेत्यांचा विचार घेऊन राज्यात शांतता राखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंळानं आज दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. राज्यात मागील काही दिवसांमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. दिल्लीतलं विशेष पथक महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी गृह सचिवांकडे करण्यात आल्याचं सोमय्या यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ज्या प्रकारे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर हल्ले, अत्याचार सुरू आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, अशी सात उदाहरणं गृहमंत्रालयास दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

****

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहून राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देखील त्यांनी या पत्रात उल्लेख केला आहे. मुंबई पोलिसांच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

****

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली असून, यावर आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. प्रक्षोभक विधानं करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

****

आंतरराष्ट्रीय मलेरिया दिवस आज पाळण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं २००७ साली झालेल्या जागतिक आरोग्य सभेच्या दरम्यान ह्या दिवसाची घोषणा केली होती. संशोधनाची शर्थ करून मलेरियाचा प्रभाव कमी करणं आणि जीव वाचवणं ही यावर्षीची संकल्पना आहे. नवकल्पना वापरुन सर्वेक्षण आणि उपाययोजनांच्या माध्यमातून मलेरियाचं दूरीकरण करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल तीन लाख ६४ हजार २१० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८७ कोटी ७१ लाख ९५ हजार ७८१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ५४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ८६२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १६ हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  

****

काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत प्रतिबंधित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन दहशतवादी ठार झाले. पहू परिसरात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली.

****

बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचं गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनानं विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगानं आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एक ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या पार्डी टकमोर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांना आरोग्य सेविकांच्या हस्ते आज जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं.

****

सोलापूर मधल्या प्रिसिजन ग्रुपनं तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पाहणी केली, तसंच या बसने प्रवास केला. गडकरी यांनी बस बद्दल संपूर्ण माहिती यावेळी जाणून घेतली.

****

महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या २४ ते २८ मे दरम्यान लखनऊ इथं खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या शिखर परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली.

****

No comments: