Wednesday, 27 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

७    एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या देशात १५ हजार ६३६ कोविड बाधितांवर उपचार सुरु आहेत.

****

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत गेल्या सात वर्षात देशात ४५ कोटींहून अधिक खाती उघडली आहेत. समाजातल्या सर्व स्तरातल्या व्यक्तींना बँकिंग सेवांचा लाभ घेता यावा, या उद्देशानं केंद्र सरकारनं, ही योजना सुरु केली आहे. त्यायोगे गरीब नागरिकांना बँकिंग प्रणालीचा लाभ घेणं शक्य झालं असून, आर्थिक सर्वसामावेशकता प्रत्यक्षात येऊ शकली आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेच्या खात्यांतील एकूण ठेवी १३ एप्रिलपर्यंत एक लाख ६८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहेत तर प्रत्येक खात्यात सरासरी तीन हजार ७२३ रुपयांची जमा आहे.

****

सहा ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच पाच ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी कॉर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरालाही, औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यांनी १२ वर्षांवरच्या मुला-मुलींकरता झायकोव्ह डी या लसीच्या आपत्कालीन वापरालाही मंजुरी देण्यात आली आहे.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते काल किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या अभियानाचं उद्धाटन झालं. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत सुरु केलेली ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे. यावेळी तोमर यांनी शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आखलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

No comments: