Saturday, 30 April 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      एमपीएससीचा निकाल जाहीर; सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

·      करदात्यांना अनुकूल आणि पारदर्शक कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त

·      पाच लाख घरकुलांचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला पाच जूनपर्यंत मुदतवाढ

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १४८ रुग्ण; मराठवाड्यात नांदेड इथं एका रुग्णाची नोंद

·      पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान

·      लातूर जिल्ह्यातल्या चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड

·      औरंगाबाद इथं इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड

आणि

·      बीड जिल्ह्यात ४४ टक्के पाणी शिल्लक; पिण्याच्या पाण्याचं आरक्षण करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

****


सविस्तर बातम्या

महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग - एम पी एस सी चा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये सांगलीचे प्रमोद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. नीतेश कदम यांनी द्वितीय तर रुपाली माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी आयोगानं संकेतस्थळावर जाहीर केली आहे. १५ संवर्गातल्या २०० जागांसाठीची एप्रिल २०२० मध्ये नियोजित असलेली ही परीक्षा कोविड प्रादुर्भावामुळे मार्च २०२१ मध्ये घेण्यात आली होती. निवड प्रक्रियेत काल प्रत्यक्ष मुलाखत झाल्यानंतर अवघ्या काही तासांत निकाल जाहीर झाल्याने, उमेदवारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

****

करदात्यांना अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अशा कर प्रशासनाची गरज, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-एन ए डी टी इथं, भारतीय महसूल सेवा-आय आर एस अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीच्या समारोप समारंभ प्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. महोपात्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपतींनी, ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेनं ‘अपडेट रिटर्न सादर करण्यासारख्या आयकर विभागाच्या निर्णयाचं कौतुक केलं.

****

रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी मुंबईतल्या वातानुकुलित उपनगरी रेल्वे गाडीच्या तिकीटदरात ५० टक्क्यांनी कपातीची घोषणा केली आहे. गॉथिक वास्तुरचना यादीत असलेल्या आणि एकशे एकोणसत्तर वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी, ते काल बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विमानतळांसारखं अद्ययावत केलं जाणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितलं.

****


गरीब, गरजू, बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्याच्या उद्देशानं पाच लाख घरकुलांचं बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला पाच जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात केंद्र पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी आणि गुणवत्तावाढीसाठी २० नोव्हेंबर, २०२१ ते एक मे २०२२ या कालावधीत महाआवास अभियान राबवलं जात आहे. त्यात पाच लाख घरं पूर्ण करण्याचा मानस असल्याचं ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

भ्रष्टाचार तसंच काळा पैसा वैध प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत, येत्या १३ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयानं देशमुख यांना सुनावलेल्या कोठडीची मुदत काल संपली, त्यावर न्यायालयानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.

****

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल सुनावणी होऊ शकली नाही, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितलं. गेल्या २४ एप्रिलपासून राणा दांपत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत, याचिकाकर्त्याना एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. ठाकरे यांची उद्या एक मे रोजी औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून रवाना होणार आहेत. या प्रवासादरम्यान ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन करणार असल्याचं, मनसेकडून सांगण्यात आलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार ५७७ झाली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १२८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २८ हजार ७५६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नांदेड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

कोविड काळात देशपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे मराठवाड्याचे भूमिपूत्र पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचा काल नांदेड इथं, डॉ.शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातली असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर नेटाने काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा मिळते अशी भावना, डॉ.गंगाखेडकर यांनी पुरस्कारला उत्तर देताना व्यक्त केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये लिंबाळवाडी इथले नागनाथ पाटील, मोहनाळचे दिनकर पाटील, महादेववाडीचे ओमकार मसकल्ले आणि मुरुड बुद्रुक इथले मुरलीधर नागटिळक यांचा समावेश आहे. राज्यातल्या कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसंच कृषीउत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या दोन मे रोजी नाशिक इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

भारताला इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन केंद्र करण्याचा सरकारचा निर्धार असून औरंगाबाद इथं या क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं दोन दिवसीय ऊर्जा परिषदेचं उद्‌‌घाटन केल्यानंतर बोलत होते. यासंदर्भात इलेक्ट्रिक बस आणि बॅटरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या कंपन्यांशी चर्च सुरू असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.

****

अवैध सावकारी लूट थांबवण्यासाठी तसंच अवैध सावकारांनी हडपलेल्या जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत करण्यासाठी कायदाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश, राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. ते काल नांदेड इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या अतिरिक्त ऊसाचं गाळप २५ मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याची, तसंच नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजेत, बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

****

बीड जिल्ह्यात ४४ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. हा पाणी साठा जुलै महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पिण्याच्या पाण्याचं सर्वप्रथम आरक्षण करण्याच्या जीवन प्राधिकरणास सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पात सरासरी ५३ टक्के पाणीसाठा आहे, तर दहा मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गाळप अभावी शिल्लक उसाला प्रतिएकर ८० हजार रुपये, तर जळालेल्या उसाला प्रतिएकर ४० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं. पुढील वर्षी अशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी यंदाच्या हंगामातल्या ऊसतोड आणि गाळप प्रक्रियेतल्या उणीवांचा बारकाईने अभ्यास करून पुढील हंगामात योग्य नियोजन करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

****

औरंगाबाद इथल्या नगररचना विभागातला प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्षप्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपये लाच घेताना काल रंगेहात पकडलं. बांधकामाचा नकाशा मंजूर करुन देण्यासाठी चामले याने तक्रारदाराकडे सहा लाख रुपयांची मागणी केली होती, त्यातला पहिला हप्ता घेताना काल त्याला अटक करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्थानकातले सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि पोलीस नाईक नितीन चौरे या दोघांना १५ हजार रुपयांची लाच घेताना पडकण्यात आलं. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली. पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, उस्मानाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील नाट्यशास्त्र आणि लोककला विभाग, तसंच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांच्या हस्ते काल कार्यशाळेचं उद्घाटन झालं. येत्या ६ मे पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.

****

राज्यात उष्णतेची लाट तीव्र असून हवामानशास्त्र विभागाने आज आणि उद्या वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उच्च तापमानामुळे उष्माघाताची शक्यता वाढली असून त्यादृष्टीनं सर्वांनी विशेषतः वृद्ध, लहान मुलं, आणि रुग्णांची काळजी घ्यावी असं वेधशाळेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात महामंडळाच्या महसुलात ३७१ लाख रूपयांची वाढ झाली आहे, तर जवळपास दोन हजार ८०० कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत.

****

औरंगाबाद - रेणीगुंठा ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी आता तिरुपती रेल्वेस्थानकापर्यंत धावणार आहे. हा बदल सहा मे पासून करण्यात येणार आहे. तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

No comments: