Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशातल्या कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. काही राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याच्या
पार्श्वभूमीवर, ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
****
केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातल्या
विविध विकास प्रकल्प - योजना घोषित केल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद टी-पॉईंट ते माळीवाडा रस्त्याचं चौपदरीकरण
करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच च्या देवगाव रंगारी ते शिवूर या २५
किलोमीटर रस्त्याचं दुहेरीकरण करण्यासाठी १८५ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात
आल्याचं गडकरी यांनी ट्वीटरद्वारे सांगितलं.
नंदुरबार जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी च्या शेवाळी ते
नंदुरबार विभागाचं दुहेरीकरण, तसंच नंदुरबार जिल्ह्यातल्या ३२ किलोमीटर लांबीची
अतिरिक्त पुलाची कामं करण्यासाठी २३२ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला
आहे. तसंच सोलापूर जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या कामांसाठी २४५ कोटी रुपये मंजूर
करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावं, अशी मागणी राज्याचे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली
आहे. ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेऊन, राज्यांच्या विविध
प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा केली. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता
दर्शवल्याचं आदित्य ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांनी गेल्या चार वर्षांत महत्त्वाच्या
विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असल्याचं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं आज ‘सेवागीता से समृद्धी’ या
आकांक्षित जिल्ह्यांच्या कार्यक्रमावर आयोजित एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन कांत
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यांमधली भागीदारी आणि नियमित
उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांची जलद सुधारणा होत असल्याचं ते म्हणाले.
****
तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान करंट लागून ११
जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा देखील समावेश
आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या
कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत
पंतप्रधान मदत निधीतून जाहीर केली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८८ कोटी मात्रांचा टप्पा पार
केला आहे. काल २१ लाख ९७ हजार ८२ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या
१८८ कोटी १९ लाख ४० हजार ९७१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ९२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार २५२ रुग्ण बरे
झाले. देशात सध्या १६ हजार २७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
देशात काल २०१ पेक्षा अधिक गिगावॅट वीजेची मागणी पूर्ण करण्यात आली.
गेल्या वर्षी सात जुलै रोजी झालेल्या २०० गिगावॅट उच्चांकी मागणीचा पुढचा टप्पा
काल गाठल्याचं ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं. मार्च महिन्यात ऊर्जेच्या मागणीत
सुमारे आठ पूर्णांक नऊ टक्के इतकी वाढ झाली होती.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कारागृहातल्या कैद्यांना मर्यादित
स्वरुपात कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी
पुण्यातल्या येरवडा कारागृहापासून होणार असून, त्यानंतर संपूर्ण राज्यात ही योजना
राबवली जाणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात डोंगराळ भागात वास्तव्यास असणाऱ्या धनगर तसंच मेंढपाळ
समाजाचा खंडोबा दैवत असलेल्या सर्व समाज बांधवांच्या नंगर सोहळ्याला आजपासून
सुरुवात झाली. आज सकाळी नांगर ओढण्याची प्रथा पार पडली, त्यानंतर महाप्रसादाने या
कार्यक्रमाची सांगता झाली.
****
नंदुरबार जिल्ह्यात विसरवाडी ते कोंडाईबारी घाटात गस्तीवर असणाऱ्या
वनविभागाच्या पथकाला एका नादुरुस्त ट्रकमध्ये अवैधरित्या खैर जातीच्या लाकडांची
तस्करी आढळुन आली आहे. हा ट्रक महामार्गावर उभा होता. वनविभागाच्या पथकाला
ट्रकमध्ये तासलेलं खैर जातीचं जवळपास दहा टन लाकूड आढळून आलं. हे लाकूड जप्त करुन
नवापूर इथल्या वनविभागाच्या डेपोत जमा करण्यात आलं आहे.
****
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील,
असं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment