Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 April 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· कोविडचा धोका संपला नसल्यानं, सर्व राज्यांनी सतर्कता बाळगण्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं आवाहन
· कर परताव्यात राज्याला सापत्न वागणूक मिळत असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांची तक्रार
· कोविडच्या चौथ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत: हून मास्क
लावण्याचं तसंच लस घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· खरीप हंगामाकरता रासायनिक खतांवर अनुदान देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
· रस्त्याच्या कामात अपहार केल्याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात
गुन्हा दाखल
· राज्यात कोविडचे नवे १८६ रुग्ण, मराठवाड्यात एकही नवा बाधित नाही
· राज्यातल्या सर्व २७ औष्णिक संचामाधून वीज निर्मिती केल्यानं राज्यात कुठेही
भारनियमन नाही
आणि
· औरंगाबाद शहरात किराणा दुकानातीन एक कोटी नऊ लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम
जप्त
****
सविस्तर बातम्या
कोविडचा धोका अजूनही संपला नसल्याने, सर्व राज्यांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता,
पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या
कोविड आढावा बैठकीत बोलत होते. युरोपीय देशात ओमायक्रॉन तसंच अन्य नव्या विषाणूंचा
संसर्ग वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. वैद्यकीय महाविद्यालयं तसंच जिल्हा रुग्णालयांमध्ये
आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकारांच्या समन्वयातून
निर्णय घेण्याची गरज असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पेट्रोल तसंच डिझेलचे दर
कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या नोव्हेंबर महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्याचं
त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालसह काही
राज्यांनी, अद्याप पेट्रोल डिझेलवरच्या मूल्यवर्धित करात कपात केलेली नाही, या राज्यांनी
कर कपात करून नागरिकांना दिलासा द्यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. केंद्र
सरकारकडे कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसुलापैकी ४२ टक्के निधी राज्यांना परत
केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कर परताव्यात महाराष्ट्राला सापत्न
वागणुक मिळत असल्याबद्दल, या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
प्रत्यक्ष करात महाराष्ट्राचा वाटा ३८ पूर्णांक तीन दशांश टक्के एवढा आहे. संपूर्ण
देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के वस्तू आणि सेवा कर - जीएसटी, महाराष्ट्रातून संकलित
होतो. प्रत्यक्ष कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर देशात कर संकलनात महाराष्ट्र
प्रथम क्रमांकावर आहे. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी
थकबाकीपोटी मिळणं बाकी असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले. मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरात २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा कर, तर
२२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्राचा कर,
तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर असल्याचं, त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर साडे तेरा
टक्क्यांवरून तीन टक्के केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांच्या संख्येत
वाढ होत असून, चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:
हून मास्क वापरणं, लस घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्याची कोरोना
विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेतली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाकडे लसीकरण
सक्तीचं करण्याबाबत, तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देतांना नऊ महिन्यांचा
कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
१८ ते ५९ या वयोगटातल्या नागरिकांना शासकीय रुग्णालयातून बुस्टर डोस देण्याबाबत शासन
विचार करत असल्याचंही ते म्हणाले. रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणं आढळल्यास त्यांची
तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करावी, चाचण्यांची
संख्या तसंच लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातली कोविड स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी कोविड संदर्भात
घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात दररोज २५ हजार चाचण्या
केल्या जात आहेत, येत्या काळात चाचण्यांची संख्या वाढवली जाईल. तसंच १२ वर्षांवरील
मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवला जाणार असल्याचं, टोपे यांनी संगितलं.
****
नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इक्विटी इन्फ्युजन म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट
बँकेची स्थापना करण्यासाठी प्रकल्प खर्च एक हजार ४३५ कोटी रुपयांवरून दोन हजार २५५
कोटी रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नियामक आवश्यकतांची पूर्तता
आणि तांत्रिक अद्ययावतीकरणासाठी ५०० कोटी रुपये निधी उभारण्यासदेखील यावेळी तत्त्वत:
मान्यता देण्यात आली.
जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील चार हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या
५४० मेगावॅटच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं
घेतला आहे. या प्रकल्पातून एक हजार ९७५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार असून तो ५४
महिन्यांत कार्यान्वित होईल.
खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान
दरांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति बॅग अनुदानात
५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा कालावधी २०२४
पर्यंत वाढवण्यात आला आहे. रासायनिक खतांवर भरघोस अनुदान देण्याचा, आणि नक्षलग्रस्त
भागातले टॉवर टूजी वरून फोरजी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल
घेण्यात आला.
****
रस्त्याच्या कामात अपहार केल्याप्रकरणी राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री
बच्चू कडू यांच्याविरोधात काल अकोला इथं गुन्हा दाखल झाला आहे. कागदोपत्री अस्तित्वात
नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने बच्चू कडू यांनी एक कोटी ९५
लाख निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीनं केली होती. त्यावर न्यायालयानं
कारवाईचा आदेश दिला होता.
****
केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल विविध विकास प्रकल्प
- योजना घोषित केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद टी-पॉईंट ते माळीवाडा रस्त्याचं
चौपदरीकरण करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच च्या देवगाव रंगारी ते शिऊर या
२५ किलोमीटर रस्त्याचं दुहेरीकरण करण्यासाठी १८५ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर केला
असल्याचं गडकरी यांनी ट्वीटरद्वारे सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार २६४ झाली आहे. या संसर्गानं काल एकाही
रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या
एक लाख ४७ हजार ८३८ असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १७४ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २८ हजार ४७१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९५५ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मराठवाड्यात काल एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही.
****
महानिर्मितीने काल राज्यातल्या सर्व २७ औष्णिक संचामाधून वीजनिर्मिती केल्यानं
राज्यात काल कुठेही भारनियमन करावं लागलं नाही. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातले सात
औष्णिक संच, कोराडी इथले चार, नाशिक, भुसावळ आणि परळी इथले प्रत्येकी तीन, खापरखेडा
पाच आणि पारस इथल्या दोन, अशा एकूण २७ औष्णिक संचामधून, लक्षणीय वीज निर्मिती सुरु
आहे. सर्वच्या सर्व २७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती सुरु असण्याची, गेल्या अनेक वर्षांतली
ही पहिलीच वेळ आहे.
मिशन आठ हजार मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व संच कार्यरत कसे राहतील,
याकडे प्रकर्षाने लक्ष देण्यात येत आहे. कोळसा टंचाईच्या विपरीत परिस्थितीत महानिर्मितीच्या
वरिष्ठ व्यवस्थापन-अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून, ही
कामगिरी साध्य झाली आहे. हा विक्रमी टप्पा गाठल्याबद्दल उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत
यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह महानिर्मितीच्या
चमूचं अभिनंदन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात बाल विवाह थांबवण्यासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख देवस्थानच्या
व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी, दक्षता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय्य
तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विवाह होतात, मात्र त्यात बालविवाह होवू नये
यासाठी व्यवस्थापकांनी, वधु-वरांच्या वयाची शहानिशा केल्याशिवाय विवाहाला परवानगी देऊ
नये, झालेल्या विवाहाच्या वयांच्या दाखल्यांची सत्यप्रत पुरावा म्हणून सोबत ठेवावी,
असं स्पष्ट केलं आहे. बाल विवाहाची माहिती मिळाल्यास दहा नऊ आठ या टोल फ्री कमांकावर
संपर्क साधण्याचं आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन-जालना रस्त्यावर ट्रक आणि पिकअपचा अपघात होऊन तीन ठार
तर दोन गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातल्या
एरंडोल इथले काही जण पिकअप वाहनाने जालन्याकडे येत असताना, काल सकाळी बानेगाव फाट्याजवळ
समोरुन येणाऱ्या ट्रकशी त्यांच्या वाहनाशी धडक झाल्यानं हा अपघात झाला.
****
धुळे जिल्ह्यात सोनगीर पोलिसांनी काल सकाळी एका भरधाव जीपचा पाठलाग करत, मोठा
शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ८९ तलवारी आणि एक खंजीर अशी ९० धारधार शस्त्रं जप्त
करण्यात आली. या शस्त्रांसह चौघांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शरीफ, शेख इलियास,
सैय्यद नईम, आणि कपिल दाभाडे अशी या चौघांची नावं असून, हे सर्वजण जालना इथले रहिवाशी
असल्याचं, चौकशीत समोर आलं आहे. त्यांच्याविरुद्ध
सोनगीर पोलिस ठाण्यात शस्त्रा कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरात शहागंज परिसरातल्या एका किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी
एक कोटी नऊ लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून
या ठिकाणी संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी काल ही कारवाई केली. आशिष साहुजी असं या दुकानदाराचं नाव असून,
प्राथमिक दृष्ट्या ही रक्कम हवालाची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आयकर विभागाकडून
याबाबत अधिक तपास सुरू आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी टोल
नाक्या नजीक नळदुर्ग पोलिस पथकानं एका कार मधून वाहतूक होत असलेला १०२ किलो गांजा जप्त
केला आहे. गांजा वाहतुकीसाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून दोन जणांविरुद्ध
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं तसंच औरंगाबाद फर्स्ट
या संस्थेच्या वतीनं चार ते सहा ऑगस्ट दरम्यान ‘टुरिझम कॉन्क्लेव्ह’ अर्थात पर्यटकांच्या परीषदेचं
आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेचे संयोजक तथा औरंगाबाद फर्स्टचे सहसचिव सुनील चौधरी
यांनी काल ही माहिती दिली. ‘आयडीयल औरंगाबाद’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेमुळे औरंगाबादच्या पर्यटनाच्या प्रचार - प्रसाराला
हातभार लागेल. या परिषदेत मराठवाड्यासह जवळच्या पर्यटन स्थळांचाही प्रचार - प्रसार
केला जाईल. परिषदेत सहभागी होणाऱ्या पर्यटकांना ठराविक पर्यटन स्थळांची सफर घडविली
जाणार असल्याचं सुनील चौधरी यांनी सांगितलं.
****
मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला
आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे
नुकसान होऊ शकतं ही शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.
****
परभणी जिल्ह्यातील सेलू इथं काल केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या
विरोधात निदर्शनं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोरील पेट्रोल पंपासमोर पेट्रोल डिझेलची खरेदी-विक्री बंद करत हे निदर्शन
करण्यात आलं. पेट्रोल डिझेल वरील केंद्रीय करात
५० टक्के कपात करावी, गॅस दरवाढ मागे घ्यावी तसंच पेट्रोल डिझेलच्या किंमत निर्धारणाचे
आयात समतुल्य धोरण मागे घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
औरंगाबाद शहरात महानगरपालिका अंतर्गत २५ टक्के शिक्षणाचा हक्क -आरटीई प्रवेश
प्रक्रिया राबवण्यासाठी शहर साधन केंद्र स्तरावरील पडताळणी समितीची बैठक काल घेण्यात
आली. सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम करावेत असा निर्णय यावेळी एकमतानं
घेण्यात आला.
****
नांदेड - श्रीगंगानगर या रेल्वे गाडीला तृतीय श्रेणीचा एक वातानुकूलित डबा वाढवण्यात
आला आहे. दोन जूनपर्यंत हा बदल असेल, असं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, असं पुणे वेधशाळेनं
सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment