Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा.
****
राजकीय नेत्यांनी केलेल्या टीकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयावर कोणतंही
दडपण नसून, अशा टीकांना हाताळण्यासाठी हे न्यायालय सक्षम असल्याचं, मुंबई उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्त आणि न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांनी
म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे
राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि इतर राजकीय नेत्यांनी, न्यायसंस्थेबाबत केलेल्या
टीकांविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीला सुरुवात करण्याची मागणी
करण्यात आल्यानंतर, न्यायालयानं हे स्पष्ट केलं. या याचिकेची सुनावणी उन्हाळी
सुट्टीनंतरच केली जाणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाची
सद्सद्विवेक बुद्धी जागृत असल्यानं लोकांनी केलेल्या टीकेचा गांभीर्यानं विचार
करण्याची आवश्यकता नसल्याचंही या न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे.
****
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन
याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्या वतीनं राज्य सरकारला
देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं.
त्यानंतर उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं
निश्चित केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८८ कोटी मात्रांचा टप्पा पार
केला आहे. काल २२ लाख ८० हजार ७४३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या
लसीच्या १८८ कोटी ६५ लाख ४६ हजार ८९४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ३७७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ४९६ रुग्ण बरे
झाले. देशात सध्या १७ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये अनुसूचित जातीच्या १५ टक्के आणि अनुसूचित
जमातीच्या साडे सात टक्के आरक्षित जागा भरल्या पाहिजेत, असं रिपब्लिकन पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं
आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एम्प्लॉईज वेल्फेयर असोसिएशनच्या वतीनं काल मुंबईत
विलेपार्ले इथं महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती
शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी
आठवले बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरू
झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात महामंडळाच्या महसुलात ३७१ लाख रूपयांची वाढ झाली
आहे, तर जवळपास दोन हजार ८०० कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. संप काळात
महामंडळाचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी, तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीत
प्रवाशांना हवं त्या ठिकाणी प्रवासासाठी विविध योजना हाती घेणार असल्याचं, विभागीय
नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितलं.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे मे महिन्यात
औरंगाबाद-तिरुपती- औरंगाबाद दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या दहा फेऱ्यांची घोषणा
करण्यात आली आहे. नांदेड-विशाखापट्टणम-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या मे
महिन्यात पाच फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तिरुपती ते औरंगाबाद ही विशेष
रेल्वे गाडी, १, ८, १५, २२ आणि २९ मे ला, सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटणार
आहे. औरंगाबाद ते तिरुपती ही विशेष रेल्वे गाडी, २, ९, १६, २३, ३० मे रोजी रात्री
अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. नांदेड ते विशाखापट्टणम गाडी, सहा आणि तेरा मे
रोजी, दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी विशाखापट्टणम इथून एक,
आठ आणि तेरा मे रोजी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे.
****
बंगळुरु इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई
विद्यापीठाच्या ज्योती पाटील आणि आरती पाटील या जुळ्या बहिणींची जलतरण मध्ये १००
मीटर ब्रेन स्ट्रोक प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली.
पुरूषांच्या चार बाय २०० मीटर्स रिले मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
संघानं रौप्य पदक जिंकलं, तर याच प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या संघानं कांस्य पदक
मिळवलं.
****
मनीलामध्ये सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत पी.
व्ही. सिंधु तसंच पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
उप-उपांत्य फेरीत पोहचले आहेत. तर साइना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचं या
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उप-उपांत्य फेरीत सिंधुचा सामना चीनच्या
बिंग जियाओ हिच्याशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment