Thursday, 28 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणं, लस घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचं करण्याबाबत, तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देतांना नऊ महिन्यांचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

देशातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांकडे २१ पूर्णांक ५५ शतांश दशलक्ष टन कोळशाचा साठा उपलब्ध आहे, असं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. औष्णिक वीज केंद्राकडे सुमारे नऊ दिवसांचा साठा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. कोल इंडियासह अन्य कंपन्यांकडे जवळपास ७२ पूर्णांक पाच दशांश दशलक्ष टन साठा उपलब्ध आहे, हा साठा दिवसेंदिवस भरला जातो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

****

देशातली आघाडीची आयुर्विमा कंपनी, एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीची सुरुवात दोन मे पासून अँकर गुंतवणूकदारांसाठी, आणि चार मे पासून, सर्वसामान्यांसाठी होणार असल्याची माहिती, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली. नऊ मे पर्यंत समभागाची विक्री खुली राहणार आहे.

****

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत काल देशभर पिक विमा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यशाळेच्या राष्ट्रस्तरीय विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर होते. शेती मजबूत असेल, तर देश मजबूत असेल, म्हणूनच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा मुख्य भर आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला दीड महिना उलटला तरीही त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी काल मंत्रालयात आंदोलन केलं. सरकारकडून केवळ चालढकल केली जात असल्याचा आरोप करतानाच जोपर्यंत प्रश्न सोडवले जात नाहीत तोवर हटणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

****

No comments: