Tuesday, 26 April 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      धार्मिक स्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबत एकसमान मार्गदर्शक सूचना जारी करण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी

·      समाजात तेढ वाढेल आणि कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये न करण्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं आवाहन

·      अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्याविरुद्धचा राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

·      देशात इलेक्ट्रीक महामार्ग बांधण्याची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

·      मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं नियोजित लोकार्पण पुढे ढकललं

·      राज्यात ८४ तर मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण

आणि

·      माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं निधन

****

 

सविस्तर बातम्या

धार्मिक स्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबत एकसमान मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबईत काल या संदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं २००५ मध्ये भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ दरम्यान अनेकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं, वळसे पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्र तसंच ग्रामीण भागात दररोज प्रार्थनेसाठी भोंग्यांचा वापर केला जातो, त्यामुळे भोंग्यांबाबतचा नियम कोणा एका समुदायासाठी लागू करता येणार नाही, सर्वांनाच याचं पालन करावं लागेल, असं ते म्हणाले. भोंगे लावण्याची परवानगी किंवा काढण्याची सूचना देणं हे राज्य सरकारचं काम नाही, असा स्पष्ट पुनरुच्चार वळसे पाटील यांनी केला. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवणं ही राज्य सरकारची जबाबदारी असून, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांवर कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. भोंग्यांच्या वापरासंबंधात केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

****

दरम्यान, या बैठकीत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत, कायदा सर्वांसाठी समान आहे, कुणीही कायद्याचा भंग करु नये, अशी सूचना केली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी, राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. सर्वोच्च न्यायालयानं भोंग्यांसंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून, त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारं त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला विविध पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेही उपस्थित होते.

****

हनुमान चालिसा वाचायची असेल तर स्वागत करु, मात्र दादागिरी करुन याल तर चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘बेस्ट बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. लवकरच एक जाहीर सभा घेऊन हिंदुत्वाच्या मुद्यावर सोक्षमोक्ष लावणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, बेस्टमध्ये ई बससाठी पुढील चार वर्षात एक हजार कोटी देणार असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांची राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. आपल्यावर दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवाल - एफआयआरमधून कलम ३५३ चा उल्लेख वगळावा, अशी मागणी राणा दाम्पत्यानं उच्च न्यायालयात दाखल याचिकेत केली होती. प्राथमिकदृष्टया गुन्ह्यात तथ्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायाधीश पी. बी. वराळे आणि न्यायधीश एस. एम. मोडक यांच्या खंडपीठानं, दुसऱ्यांच्या घरात श्लोकाचं पठण करणं व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग असल्याचं न्यायालयानं नमूद करत, ही याचिका फेटाळली. कलम ३५३ अंतर्गत राणा यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याआधी पोलिसांनी त्यांना ७२ तासाची नोटिस द्यावी अशी सूचना न्यायालयानं केली आहे.

****

हनुमान चालिसा पठण हा राजद्रोह कसा होऊ शकतो, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. ते काल मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलत होते. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलिस ठाण्यासमोर हल्ला होतो, यासंदर्भात आपण केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. खासदार नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली, त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आलं नाही, असा आरोपही फडवणीस यांनी केला.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. राज्यात मागील काही दिवसांमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. दिल्लीतलं विशेष पथक महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी गृह सचिवांकडे करण्यात आल्याचं सोमय्या यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ज्या प्रकारे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर हल्ले, अत्याचार सुरू आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, अशी सात उदाहरणं गृहमंत्रालयास दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

****

देशात इलेक्ट्रीक महामार्ग बांधण्यात येणार असून, नजिकच्या भविष्यात बस आणि ट्रक इलेक्ट्रीक केबलवर चालतील असं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सोलापूर इथं २५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी, आठ हजार १७ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन, गडकरी यांच्या हस्ते काल झालं,  त्यानंतर ते बोलत होते. प्रदुषण आणि इंधनावरील खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रीक महामार्ग ही संकल्पना राबवण्यात येत असून, मोठ्या शहरात १६५ ठिकाणी हा प्रयोग करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातल्या दोन उड्डाण पुलांसाठी अकराशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, तसंच यासाठी भूसंपादन करणं अपेक्षित असून, महापालिका आणि राज्यशासनानं याबाबत तरतूद करावी, अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या. शहरांतर्गत दळणवळण करण्यासाठी नागरिकांना कमी खर्चात प्रवास करणं सोयीचं होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, कारखानदारांनी भविष्यातला धोका लक्षात घेवून इथेनॉल, तसंच बायो इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची गरज गडकरी यांनी स्पष्ट केलं. यापुढे शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनं विकसित करण्यात येतील असं सांगत, यापुढे साखर कारखानदारांनी साखर उत्पादनासह इथेनॉल आणि बायोगॅस पासून ग्रीन हायड्रोजन निर्माण करावं असं आवाहन त्यांनी केलं.

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र या मार्गादरम्यानच्या, वन्यजीव उन्नत मार्गात काही ठिकाणी पुनर्निर्माण करावं लागणार असल्याचं, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे. हे काम सुमारे दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचं, याबाबतच्या वूत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ९२५ झाली आहे. या संसर्गानं काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८३४ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ७१ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ७७ लाख २८ हजार १६२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

शिक्षण हक्क कायदा - आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत निवड झालेल्या बालकांपैकी,  आत्तापर्यंत राज्यात ५१ पूर्णांक ८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी,  राज्यातल्या नऊ हजार ८६ शाळांमधल्या एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी, एकूण दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सोडतीत राज्यातून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यातल्या ४६ हजार ९९५ विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत.

****

वसतिगृहांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. कर्जत इथं सामाजिक न्याय विभागाच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाची नवीन इमारत, सिद्धार्थ वसतिगृहाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण तसंच विशेष मोहीमेतल्या लाभार्थींना लाभ मंजूरी आदेश वाटप, मुंडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

****


माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं काल पुणे इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तसंच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. गोडबोले यांनी निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखाने विषयक समिती, एन्‌रॉन विद्युत प्रकल्प आणि ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती, आदी समित्यांवरही काम केलं.

माधव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तकं लिहिली असून, त्यांच्या लेख संग्रहाना चार पुरस्कार मिळाले आहेत. गोडबोले यांच्या ‘जवाहरलाल नेतृत्व- एक सिंहावलोकन या पुस्तकाला, मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्य:मय पुरस्कार मिळाला होता. अॅन अनफिनिश्ड इनिंग्ज हे त्यांचं आत्मचरित्र आहे, अपुरा डाव या नावानं त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध आहे.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या धनेगाव बॅरेज मधून आज पाणी सोडण्यात येणार आहे. मांजरा नदी काठचे शेतकरी आणि गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती, कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी दिली. नदीकाठच्या लोकांनी सावध राहून दक्षता बाळगण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. धनेगाव धरणाच्या खाली मांजरा नदीवर असलेल्या लासरा, बोरगाव-अंजनपूर, टाक्ळगाव - देवळा, वांजरखेडा, वागदरी, कारसा, पोहरेगाव, नागझरी, साई आदी गावांसाठी पाणी सोडण्याची शेतकर्यांची मागणी आहे. नियमानुसार शुलक भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, हे शुल्क भरल्या नंतरच ३० एप्रिल रोजी धरणातून पाणी सोडणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं.

****

परभणी शहरात कारेगांव रस्त्यानजिक अनेक वसाहतीतला वीज पुरवठा तब्बल ३६ तास खंडीत झाला होता. रविवारी रोहित्र नादुरूस्त झाल्यानं पहाटेपासून खंडीत झालेला वीजपुरवठा सायंकाळी सहा वाजेदरम्यान सुरू झाला, मात्र पुन्हा रात्री आठ वाजता खंडीत होवून काल सायंकाळी चार वाजेपर्यंतही सुरळीत झाला नव्हता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यातील्या वीज टंचाईच्या विरोधात काल उस्मानाबादमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर कंदिल आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली.

***

जालना शहरातल्या जिल्हा परिषद शाळेत काल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात येत्या दोन मेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असून, एक ते १९ वयोगटातल्या मुलांना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांच आरोग्य चांगलं ठेवणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं, जिल्हाधिकारी राठोड यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री  किसान किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या ग्राम सभेमध्ये बँक प्रतिनिधी उपस्थित राहून ग्रामस्थांना किसान क्रेडीट कार्डविषयी माहिती देणार आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हि माहिती दिली.

****

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...