Thursday, 28 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.04.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या विविध शिक्षण योजनांचा शुभारंभ त्याचबरोबर आसाममध्ये २६०० हून अधिक अमृत सरोवर निर्माण करण्याच्या योजनेचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला.

****

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी आयातित मद्याऐवजी इंधनावरील कर कमी केला तर पेट्रोल स्वस्त होईल, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना काल सल्ला दिला होता, त्यानंतर अनेक राज्यांनी त्यास विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर पुरी यांनी आज ट्विटरवर केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर ३२ पूर्णांक १५ रुपये प्रति लिटर, काँग्रेस शासित राजस्थान २९ पूर्णांक दहा रुपये प्रतिलिटर कर आकारतात. तर भाजपशासित उत्तराखंड केवळ १४ पूर्णांक ५१ रुपये आणि उत्तरप्रदेश १६ पूर्णांक ५० रुपये कर आकारतात असं पुरी यांनी सांगितलं. आंदोलने वस्तुस्थितीला आव्हान देऊ शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.

****

केंद्रीय कार्मिक मंत्रालय या महिन्यापासून पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत सुशासन या विषयाशी संबधित वेबिनारची एक मालिका सुरु करत आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र मिश्रा आज या मालिकेचं उद्घाटन करतील. प्रत्येक महिन्यात एका विषयाचा आढावा या मालिकेत घेतला जाणार असून, सेवा क्षेत्राच्या सुधारणेबद्दल पहिला वेबिनार होणार आहे.

****

प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ न मिळणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय, शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एस सी ई आर टी आणि इन्फोसिस यांच्यामध्ये, काल सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल या वेळी उपस्थित होते. निर्धारित कालावधीसाठी शिक्षक म्हणून काम केलं असून, प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण न केल्यामुळे लाभ मिळत नसलेल्या, राज्यातल्या सुमारे ९४ हजार शिक्षकांना, या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

राज्यातल्या सुमारे ४४ हजार शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर वाढवून विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, इतरही निजोजित सुविधा पुरवण्यासाठी इन्फोसिसनं आम्हाला सहकार्य करावं, असं आवाहन गायकवाड यांनी यावेळी केलं.

****

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापर्यंत मर्यादित आहे, तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल, असं त्यांनी सांगितलं. नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

महाआवास अभियानातर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचे पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा अव्वल ठरला असून, धुळे जिल्ह्याला दुसरा आणि ठाणे जिल्ह्याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये, अहमदनगर जिल्हा अव्वल, रत्नागिरी द्वितीय, तर वर्धा जिल्ह्याला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान- २०२०-२१ राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला होता.

****

मध्य रेल्वेनं एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर आणि साईनगर शिर्डी इथून विविध ठिकाणी ५७४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात लातूर आणि बिदर दरम्यान दोन विशेष गाड्यांचा समावेश आहे.

****

बंगळुरू इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मल्लखांब खेळाडूंनी पुरुष आणि महिला दोन्ही गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं जिंकले. मुंबई विद्यापीठानं महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, तर पुणे विद्यापीठाच्या संघानं दुसरं स्थान पटकावलं.

****

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांनी आपापले पहिले सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्य सेन आणि बी साई प्रणित यांचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

****

No comments: