Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२२ सायंकाळी
६.१०
****
· राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं - उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचं आवाहन.
· खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांची गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका मुंबई उच्च
न्यायालयाने फेटाळली.
· हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं
नियोजित लोकार्पण लांबणीवर.
· माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं निधन.
आणि
· जागतिक हिवताप दिनानिमित्त आज सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रम
****
राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी
सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ध्वनीक्षेपकासंदर्भात
आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च
न्यायालयानं ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात
केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा
गृहविभाग कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट
केलं. या बैठकीला विविध पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेही उपस्थित
होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना, समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था
बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत, कायदा सर्वांसाठी समान आहे, कुणीही कायद्याचा
भंग करु नये, अशी सूचना केली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतली आहेत.
ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
****
खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांची याचिका मुंबई
उच्च न्यायालयाने फेटाळली. आपल्यावर दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवाल - एफआयआरमधून
कलम ३५३ चा उल्लेख वगळावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत
केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. राणा दाम्पत्याला मुख्यमंत्री तथा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा
इशारा दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राणा दाम्पत्य सध्या १४ दिवसांच्या
न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर येत्या २९ तारखेला सुनावणी होणार
आहे.
दरम्यान, हनुमान चालिसा पठण हा राजद्रोह कसा होऊ
शकतो, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. ते आज मुंबईत भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह
पत्रकार परिषदेत बोलत होते. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलिस
ठाण्यासमोर हल्ला होतो, यासंदर्भात आपण केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिल्याचं, फडणवीस
यांनी सांगितलं. खासदार नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली,
त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी
सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आलं नाही,
असा आरोपही फडवणीस यांनी केला.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी
महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं आहे. हे काम ३०
एप्रिलपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र या मार्गादरम्यानच्या, वन्यजीव उन्नत
मार्गात काही ठिकाणी पुनर्निर्माण करावं लागणार असल्याचं, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून
कळवण्यात आलं आहे. हे काम सुमारे दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात
म्हटलं आहे.
****
देशात इलेक्ट्रीक महामार्ग बांधण्यात येणार असून
देशात नजिकच्या भविष्यात बस आणि ट्रक इलेक्ट्रीक केबलवर चालतील असं, केंद्रीय परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सोलापूर इथं २५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी
८ हजार १७ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते
आज करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. प्रदुषण आणि इंधनावरील खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रीक
महामार्ग ही संकल्पना राबवण्यात येत असून मोठ्या शहरात १६५ ठिकाणी हा प्रयोग करण्यात
येणार आहे. सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी अकराशे कोटी रुपये खर्च येणार आहे
तसंच यासाठी भूसंपादन करणे अपेक्षित असून महापालिका आणि राज्यशासनाने याबाबत तरतूद
करावी अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या. शहरांतर्गत दळणवळण करण्यासाठी नागरिकांना कमी
खर्चात प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, कारखानदारांनी भविष्यातील धोका लक्षात
घेवून इथेनॉल, तसेच बायो इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट
केलं आहे. यापुढे शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनं विकसित करण्यात येतील असं सांगत,
यापुढे साखर कारखानदारांनी साखर उत्पादनासह इथेनॉल आणि बायोगॅस पासून ग्रीन हायड्रोजन
निर्माण करावं असं आवाहन त्यांनी केलं.
****
माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं पुणे
इथं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. केंद्र सरकारमध्ये
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तसंच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणूनही
त्यांनी काम केलं. महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
गोडबोले यांनी निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र
सरकारची आजारी सहकारी साखर कारखाने विषयक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प आणि ऊर्जा
क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी समित्यांवरही
काम केलं.
माधव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तकं
लिहिली असून त्यांच्या लेख संग्रहाना ४ पुरस्कार मिळाले आहेत. गोडबोले यांच्या जवाहरलाल
नेतृत्व- एक सिंहावलोकन या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष
वाड्य:मय पुरस्कार मिळाला होता. अॅन अनफिनिश्ड इनिंग्ज हे त्यांचं आत्मचरित्र आहे,
अपुरा डाव या नावानं त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध आहे.
****
जागतिक हिवताप दिवस आज पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य
संघटनेनं २००७ साली झालेल्या जागतिक आरोग्य सभेच्या दरम्यान ह्या दिवसाची घोषणा केली
होती. संशोधनाची शर्थ करून हिवतापाचा प्रभाव कमी करणं आणि जीव वाचवणं ही यावर्षीची
संकल्पना आहे. या आजाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती
आराखडा आखत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. जागतिक
हिवताप दिवसाच्या निमित्तानं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. वर्ष २०३०
पर्यंत देश मलेरिया मुक्त आणि २०२५पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार
उपस्थित होत्या.
दरम्यान, नवकल्पना वापरुन सर्वेक्षण आणि उपाययोजनांच्या
माध्यमातून या आजाराचं उच्चाटन करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध
असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथं जिल्हा हिवताप कार्यालय आणि महानगरपालिका
यांच्या वतीनं हिवताप दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्तानं शहरात कांती
चौक परिसर ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत हिवताप जनजागृती फेरी काढण्यात आली होती. तसंच
सिद्धार्थ उद्यानात आरोग्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
****
सोलापूर - हैदराबाद रोडवर आज झालेल्या अपघातात तीन
जणांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर इथं हैदराबाद रोड वरील
मार्केट यार्ड परिसरातील सर्व्हिस रोडजवळ हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment