Wednesday, 27 April 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      देशातल्या कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

·      सहा ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लस देण्यास औषध महानियंत्रकाची मंजुरी

·      राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न  कदापी यशस्वी होऊ देणार नाही- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

·      शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अर्थसंकल्पातला किमान पाच टक्के निधी खर्च करणारः अर्थमंत्री अजित पवार

·      राज्यात १५३ तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण

आणि

·      बाल विवाह होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह नोंदणी अधिकाऱ्याची पद रद्द करण्याची राज्य महिला आयोगा राज्य शासनाला शिफारस करणार.

****


सविस्तर बातम्या

देशातल्या कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या देशात १५ हजार ६३६ कोविड बाधितांवर उपचार सुरु आहेत.

****

सहा ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच पाच ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी कॉर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरालाही, औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यांनी १२ वर्षांवरच्या मुला-मुलींकरता झायकोव्ह डी या लसीच्या आपत्कालीन वापरालाही मंजुरी दिली आहे. 

****

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांवर पोलीसांनी केलेली कारवाई कायद्यानुसारच असून, कोठडीत नवनीत राणा यांना कोणतीही हीन दर्जाची वागणूक दिली गेलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एक मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधल्या नियोजित सभेसंदर्भात, येत्या दोन दिवसात औरंगाबादचे पोलीस आयुक्त, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पोलीस महासंचालकांशी चर्चा करून निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी यावेळी केला.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगानं काल आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. सेवानिवृत्त न्यायाधीश के यू चांदीवाल यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलं होतं.

****

राज्यातलं शिक्षण दर्जेदार असावं, गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अर्थसंकल्पातला किमान पाच टक्के निधी हा शिक्षणावर खर्च करण्यात येणार असल्याचं, अर्थमंत्री अजित पवार सांगितलं.  मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून, विभागातल्या आठ जिल्ह्यांतल्या तब्बल तीन हजार ३०० शाळांच्या ग्रंथालयासाठी, १० कोटी ३१ लाख रुपये किंमतीची ११ लाखाच्यावर पुस्तकं काल औरंगाबाद इथं वितरित करण्यात आली, त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या सभागृहात खासदार शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, एम.जी.एम.चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक कार्यशाळाही यावेळी घेण्यात आली. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन -मुप्टाचं रौप्य महोत्सवी अधिवेशनही काल औरंगाबाद इथं खासदार पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार ७८ झाली आहे. काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८३८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १३५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २८ हजार २९७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

बाल विवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल, तिथले सरपंच, लोकप्रतिनिधी आणि बाल विवाहाची खोटी नोंद करणारे नोंदणी अधिकारी यांच्यावरती दोष सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करावं अशी शिफारस राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारींची जनसुनावणी चाकणकर यांनी काल घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात बाल विवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे. जिल्ह्यात २०२० ते २१ या दरम्यान १०२ बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोना काळापासून औरंगाबाद जिल्ह्यात महिलांच्या कैटुंबिक हिंचारामध्ये वाढ झाली असल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली.     

****

लातूर जिल्ह्याला यापूर्वी भूकंपासारख्या आपत्तीचा सामना करावा लागला होता, तसंच आता कोविड काळातही अनेक कुटुंबांमधल्या विधवा महिलांना विविध पातळ्यांवर आधार आणि मदत देण्यामध्ये या जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे, असं परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं बोलत होत्या. जिल्हा प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध रीतीने काम करून या महिलांना अधिकाधिक प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं.

****

जालना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर काल जालना जिल्हा महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झालं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, प्रभारी पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचं जिल्हाधिकार्यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं. तसंच त्यांनी खेळाडुंना नांदेड इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

****

औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासह विविध कामांसंदर्भात केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल मुंबईत एक आढावा बैठक घेतली. औरंगाबाद विमानतळावर जास्त प्रवासी संख्या असणारे, मोठे विमान उतरण्यासाठी धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठीच्या भु-संपादनाची प्रक्रिया तत्काळ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. फ्लाय बिग एअरलाईन्स आणि अक्सा एअरलाईन्स या विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांना औरंगाबादहून विविध ठिकाणांसाठी सेवा सुरु करण्याची सूचना मंत्री कराड यांनी केली.

****

वाढत्या महागाई विरोधात लातूर इथं काल काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या कामदार पेट्रोल पंपाजवळ लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या २०१४ पूर्वीच्या ध्वनीफिती ऐकवण्यात आल्या.

****

औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या आदेशाने शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. आगामी सण उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ मे पर्यंत हे आदेश जारी असतील. असं पोलीस आयुक्तांनी या आदेशात म्हटलं आहे.

****

अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळू शकतं, असं लातूर जिल्ह्यातल्या ट्वेन्टीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका अदिती देशमुख यांनी सांगितलं आहे. सध्या अश्वगंधा काढणीचा हंगाम सुरू असून, देशमुख यांनी काल शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत पाहणी केली. लातूर तालुक्यात शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेन्टीवन ॲग्रीने राबवली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर शहरातल्या मलनि:स्सारण प्रकल्प उभारणीसाठी, राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात, ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आधिकचे १० कोटी रुपये मिळणार आहेत. अर्धापूर नगर पंचायतीत मलनि:स्सारण प्रकल्प हाती घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

जालना शहरातल्या मोती तलावात पोहत असताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली. बापूराव निर्वळ, आकाश निर्वळ अशी मृतांची नावं आहेत. तलावात पोहत असताना मुलगा आकाश खोल पाण्यात बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर, बापूराव निर्वळ त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, मुलाने गळ्याला मिठी मारल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत उत्तरीय तपासणीकरता जिल्हा सामान्य रुग्णालात पाठवले आहेत.

****

किसान भागिदारी प्राथमिकता हमारी या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत काल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मेळावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधावी, असं आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी यावेळी केलं. या मेळाव्यास बाजार समितीचे संचालक, शेतकरी, हमाल, मापाडी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.

****

उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर इथल्या संत गोरोबा काकांच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झाला. या यात्रेसाठी राज्यभरातून जवळपास ९१ दिंड्या तेर इथं दाखल झाल्या आहेत.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीनं काल जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं आरोग्य मेळावा घेण्यात आला. आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन झालं. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेशी निगडित योजनांचा गरजुंनी लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या मेळाव्यात १४०० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी सांगितलं.

****

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा असल्यामुळे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आपल्या राजकीय नेतृत्वाच्या यशापयशाबद्दल आपलं मत मांडू शकतो, असं मत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं मौलाना आझाद संशोधन केंद्रात झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषद, औरंगाबाद इथलं पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय, सोयगाव इथलं संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, आणि अजिंठा इथल्या बाबुरावजी काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद घेण्यात आली.

****

हवामान

येत्या दोन तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऊर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

****


No comments: