Tuesday, 26 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      ५ ते १२ वर्ष वयोगटासाठी कोविड लस आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांची मंजुरी.

·      सन २०३० पर्यंत सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर वैद्यकीय सेवेचे उद्दिष्ट.

·      आमदार विक्रम काळे यांच्या निधीतून ३ हजार ३०० शाळांच्या ग्रंथालयासाठी ११ लाखांहून अधिक पुस्तकं वितरित.

आणि

·      औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ९८४ सदनिका तसंच २२० भूखंड विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला प्रारंभ.

****

५ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड लसीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींना कोव्हॅक्सीन तर ५ ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांना कॉर्बेव्हॅक्स या लसीची मात्रा देता येणार आहे. १२ वर्षांवरच्या मुला-मुलींकरता झायकोव्ह डी या लसीच्या आपत्कालीन वापरालाही औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेटफ्लिक्सच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या आजादी की अमृत कहानियां या उपक्रमाचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी आजादी की अमृत कहानियांचा ट्रेलर प्रकाशित केला. या मालिकेत भारतासाठी, चौकटीबाहेर जाऊन वैशिष्टपूर्ण कार्य करणाऱ्या सात भारतीय महिलांच्या प्रेरणादायी लघु कथा दाखवल्या जाणार आहेत. देशभरातल्या जनतेला प्रेरणा देणाऱ्या महिला आणि इतरांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.

****

सन २०३० पर्यंत सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण आणि तृतीयक आरोग्य सेवेचं सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून बळकटीकरण करण्यासाठी गुंतवणूकदारांची परिषद आज मुंबईत ताज लॅण्ड्स एण्ड इथं झाली, या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलंत होते. येणाऱ्या काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैद्यकीय सेवा क्षेत्राचं खाजगीकरण न करता सार्वजनिक खाजगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचंही देशमुख म्हणाले.  

दरम्यान, राज्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी आणण्यात आलेले ‘पीपीपी’ धोरणाचा राज्यातील सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याने हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

****

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज स्काऊट गाईड राज्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. दादरच्या शिवाजी उद्यानातील स्काऊट गाईड पॅविलिऑन इथं वर्ष २०१८-१९ आणि वर्ष २०१९-२० चे स्काऊट गाईड राज्य पुरस्कार आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. ‘आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे.  देशात स्काऊट गाईड चळवळीसारख्या युवकांसाठी काम करणाऱ्या चळवळीची अतिशय गरज आहे. महाराष्ट्रातील स्काऊट गाईडची नोंदणी संख्या भारतात सर्वाधिक आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोशारी म्हणाले. स्काऊट गाईड या चळवळीतून मुलांच्या मनावर इतरांना मदत करण्याचे, शिस्त, स्वावलंबन आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार होतात असंही कोशारी यांनी म्हटलं आहे. यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून विभागातल्या आठ जिल्ह्यांतील तब्बल ३ हजार ३०० शाळांच्या ग्रंथालयासाठी १० कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तकं आज वितरित करण्यात आली. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या सभागृहात खासदार शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, एम.जी.एम.चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक कार्यशाळाही यावेळी घेण्यात आली. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन -मुप्टाचं रौप्य महोत्सवी अधिवेशनही आज औरंगाबाद इथं खासदार पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलं.

****

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी औरंगाबाद इथं देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय इथं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्याचबरोबर कोरोना बाबत सर्व निर्बंध शिथिल केले असले तरी योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करुन सर्व संबंधित विभागांना सोपवलेली जबाबदारी योग्य पध्दतीने आणि परस्पर समन्वयाने पार पाडण्याच्या सूचना उपायुक्त जगदिश मिनियार यांनी संबंधितांना आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची बैठक उपायुक्त मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.

****

औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद,

लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका तसंच २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनात आणि म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणारिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक येत्या १० जून रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद इथं मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

****

लातूर इथं आज वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या कामदार पेट्रोल पंप जवळ लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या २०१४ पूर्वीच्या ध्वनीफिती ऐकवण्यात आल्या.

****

औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या आदेशाने शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. आगामी सण उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ मे पर्यंत हे आदेश जारी असतील. या दरम्यान कोणाही व्यक्तीला आपल्याजवळ कोणतंही शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगडफेकीची साधनं, बाळगता येणार नाहीत. जाहीरपणे घोषणाबाजी किंवा आंदोलन निदर्शनंही करता येणार नसल्याचं, याबाबत जारी आदेशात म्हटलं आहे. औरंगाबाद शहरात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन निदर्शनं, मोर्चा, मिरवणुका काढण्यास मनाई असल्याचं, पोलीस आयुक्तांनी या आदेशात म्हटलं आहे.

****

अश्वगंधा ही आर्युवेदीक वनस्पती असून कोरोना नंतरच्या काळात औषधी उपयोगासाठी या वनस्पतीची मोठी मागणी वाढली आहे. अश्वगंधा वनस्पतीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळू शकतं, असं लातूर जिल्ह्यातल्या  ट्वेन्टीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका अदिती अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे.

****

No comments: