Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२२ सायंकाळी
६.१०
****
· महाराष्ट्र स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं
आयोजन.
· शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांत राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत
मुदतवाढ.
· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
· डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिंथेटिक ट्रॅक उभारण्यास परवानगी.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त
उद्या १ मे रोजी सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्या सकाळी ८ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण
होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी
सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे.
****
कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना
तोंड देत राज्य शासनाने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती
देणाऱ्या ‘दोन वर्षे जनसेवेची: महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत उद्या १ मे रोजी
राज्यात विभागीयस्तरावर सचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संबंधित जिल्ह्यांच्या
पालकमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल.
औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयासमोर सिमंत
मंगल कार्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्या हस्ते उद्या सकाळी साडे दहा वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन
नागरिकांसाठी उद्यापासून पाच मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले
राहणार आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या
स्थापनेस उद्या १ मे रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यातल्या जिल्हा
परिषद अंतर्गत हीरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या
आहेत. त्यानुसार उद्या नांदेड जिल्हा परिषदेत सकाळी साडेआठ वाजता हीरक महोत्सव कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण
उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.
****
विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव,
नैतिक मूल्यांचं शिक्षण देऊन, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या
पापरी जिल्हा परिषद शाळेत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री
पवार बोलत होते. शिक्षक हे उद्याची पिढी घडवत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये
याची त्यांनी दक्षता घ्यावी, गुणवत्तेबाबत सातत्य ठेवावं असंही पवार म्हणाले.
****
व्यंकटेश्वराचं मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती
देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचं पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी
आज तिरुपती इथं जाऊन देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द
केलं. आज पहाटे त्यांनी बालाजीचं दर्शन घेऊन पूजा केली आणि आपल्यासमवेतचं पत्र चरणी
अर्पण केलं. नवी मुंबईतल्या उलवे नोड इथली जागा देवस्थानला देण्यात येणार आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांना अभिवादन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज यांनी राष्ट्र उभारणीतील ग्राम विकासाचं महत्व सहज सोप्या पद्धतीने समजावून
दिलं. समाजातील वाईट प्रथा, चालीरितींना त्यांनी कठोर शब्दांत विरोध केला. तुकडोजी
महाराज यांचे ग्राम कल्याणाचे विचार प्रत्यक्षात यावेत यासाठी प्रयत्नशील राहूया, हेच
त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुकडोजी महाराजांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
आज सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली.
****
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के
राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत
आतापर्यत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील
विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची ही प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे राज्यभरात
ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत ३०
मार्च रोजी काढण्यात आली. या सोडतीनुसार ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी तसंच
६९ हजार ८५९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या
प्रवेशासाठी १० मे ही अंतिम मुदतवाढ असणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण
संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
****
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत युवा
व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील
परिसरात सिंथेटिक अॅथेलेटिक ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटींच्या निधीच्या
प्रशासकीय मान्यतेचं पत्र विद्यापीठाला प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद
येवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपलब्ध जागा, निविदा, काम करणारी संस्था
आदी बाबतची कामं आगामी तीन महिन्यांच्या आत करून तसा अहवाल मंत्रालयाला पाठवण्याची
सूचना करण्यात आली आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त
केला. खेलो इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून एकूण ३८ प्रस्ताव आले होते. त्यातून
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निवड झाली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या एक मे रोजी औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेला
पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून औरंगाबाद
इथं दाखल झाले. त्यांनी वढू बुद्रुक तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं
दर्शन घेऊन अभिवादन केल्याचं, मनसेकडून सांगण्यात आलं.
****
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी आणि
नाशिकचे भूमीपुत्र दादासाहेब फाळके यांच्या १०९ व्या जन्मदिनानिमित्त आज नाशिक इथं
त्यांना अभिवादन करण्यात आलं. महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने लघुपट महोत्सवाचा शुभारंभ
त्यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाला सहायक शिक्षण संचालक सरोज जगताप, नाशिकच्या
वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बसते आणि महर्षी चित्रपट संस्थेचे
निशिकांत पगारे यावेळी उपस्थित होते.
****
अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत आलेलं सुमारे २७ किलो
अंमलीपदार्थ तस्करी कस्टम विभागाने जप्त केलं आहे. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपीला
कस्टमकडून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत
असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कस्टमने कारवाई करत आरोपीला
अटक केली आहे.
****
ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं अभिनेत्री जॅकलीन
फर्नांड़ीसच्या ७ कोटींच्या मुदत ठेवी जप्त केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी
ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्याशी केलेल्या व्यवहारांच्या
संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment