Thursday, 28 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळं खबरदारी घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      केंद्र सरकारकडून तीन महिन्यांत वस्तू आणि सेवा कराचे उरलेले पैसे येतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंदाज

·      माध्यमांनी नैतिक पत्रकारितेच्या मूल्यांचं पालन करावं - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू.

आणि

·      रेल्वेच्या औरंगाबाद - तिरुपती - औरंगाबाद दरम्यान दहा विशेष गाड्या तर नांदेड - विशाखापट्टनम- नांदेड दरम्यान सहा विशेष गाड्या.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळं खबरदारी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. राज्यातल्या कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीवर सरकारचं लक्ष असल्याचं त्यांनी नमुद केलं. राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं.

****

भारतातील कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण व्याप्तीनं १८८ कोटी चाळीस लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. दोन कोटी ३१ लाख ८६ हजार चारशे एकोणचाळीस लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झालं आहे. आतापर्यंत दोन कोटी ७८ लाखाहून अधिक किशोरवयीन मुलांना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर न वाढवता उलट गॅसवरील कर साडे तेरा टक्क्यांवरुन तीन टक्क्यावर आणला असून यासाठी एक हजार कोटी रुपयांचा कर सोडला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीपुर्वी त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी पवार बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी वस्तू आणि सेवा कर परताव्याबाबत पंतप्रधानांनी काही वक्तव्यं केल्याचं आपण ऐकलं. वस्तू आणि सेवा कर परतावा पाच वर्षांसाठी ठरला होता, तो काळ आता संपुष्टात आला आहे. त्यामुळं वस्तू आणि सेवा कराचे उरलेले पैसे पुढच्या दोन-तीन महिन्यात येतील, असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला. ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना वस्तू आणि सेवा कराच्यानिमित्तानं पुढं आली. त्यामुळं केंद्रसरकारनं देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना एक मर्यादा आखून दिली, तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात, असं पवार म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरु आहे. सर्वांनी गांभीर्यानं या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल, असं आवाहन पवार यांनी केलं.

****

माध्यमांनी नैतिक पत्रकारितेच्या मूल्यांचं पालन करावं आणि जबाबदारीनं बातमी प्रस्तुत करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. अतिशयोक्ती आणि सनसनाटी बातम्या देण्याच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करत, हे जनतेला चुकीची माहिती देण्यासारखं आहे असं ते म्हणाले. कधीकधी अशा चुकीच्या माहितीमुळं दहशत पसरु शकते. सत्याच्या समीप रहा आणि अतिरंजिततेपासून दूर रहा, असं नायडू माध्यमांना उद्देशून म्हणाले. आंध्रप्रदेशातील नेल्लोर आकाशवाणीच्या ‘एफएम स्टेशन’वर शंभर मीटर मनोऱ्याचं उद्घाटन नायडू यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. लोकशाहीमध्ये वृत्तपत्राचं स्वातंत्र्य अपरिहार्य आहे यावर त्यांनी नंतर एका मेळाव्यात बोलताना भर दिला. विविध मुद्द्यांवर जनतेचं प्रबोधन करण्यात आणि लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमं महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही नायडू म्हणाले.

****

दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देश निश्चितपणे अधिक प्रगती करेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबईत दिव्यांग मुले आणि युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दमण आणि दीव इथली दीडशे पेक्षा अधिक दिव्यांग मुलं आणि युवक यात सहभागी झाले आहेत. गरीब, वंचित, दिव्यांग व्यक्तींना देव मानून त्यांची सेवा केली तर देश अधिक प्रगती करेल, असं कोश्यारी म्हणाले.

****

महिलांनी स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देत स्वतः ला वेळ देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केलं आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं ‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. आजची स्त्री समाजाच्या सर्व क्षेत्रात पुढं गेली आहे. शासनानं स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कौटुंबिक हिंसाचार, पोटगी कायदा यासारखे अनेक कायदे आणले. आता शक्ती कायदा येत आहे. पुरुष जे काम करतात ते काम महिलाही सक्षमपणे करत आहेत. तेव्हा महिलांना स्वातंत्र्य देत त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे असं त्यांनी नमुद केलं. राज्य शासनानं अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष योजना राबवणं शक्य आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाची मदत घ्यावी असं आवाहनही गोऱ्हे यांनी यावेळी केलं.

****

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे मे महिन्यात औरंगाबाद-तिरुपती- औरंगाबाद दरम्यान विशेष गाडीच्या दहा फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड-विशाखापट्टणम-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीची उद्या एक आणि मे महिन्यात पाच अशा सहा फेऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. तिरुपती ते औरंगाबाद ही विशेष रेल्वे गाडी १, ८, १५, २२ आणि २९ मे ला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. औरंगाबाद ते तिरुपती ही विशेष रेल्वे गाडी २, ९, १६, २३, ३० मे ला रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. नांदेड ते विशाखापट्टणम गाडी उद्या तसंच सहा आणि तेरा मे रोजी दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी विशाखापट्टनम इथून एक, आठ आणि तेरा मेला संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत असून गेल्या वर्षभरामध्ये एक हजार ३३८ बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात सततचे टाळेबंद, ऑनलाईन शाळा, बेरोजगारी यामुळं बाल विवाहाचं प्रमाण जिल्हाभरात वाढत आहे. अक्षय तृतीयेनिमित्त येत्या तीन मे रोजी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच मुलांची मदत वाहिनी, खुला क्रमांक १०९८ यावर किंवा पोलिस मदत क्रमांक ११२ यावर माहिती द्यावी, असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे.

****

येत्या पावसाळयात जालना जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करुन जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक विभागानं वृक्ष लागवडीचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत.

****

No comments: