Tuesday, 26 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.04.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर आतापर्यंत झालेली कारवाई कायदेशीर असल्याचं गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नवनीत राणांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक देण्यात आली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं असून, त्यांनी राज्य सरकारकडे उत्तर मागितलं आहे. लोकसभा अध्यक्षांना सर्व माहिती देणार असल्याचं, वळसे पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथं होणाऱ्या सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्त निर्णय घेतील, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात सतत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

दरम्यान, राणा दाम्पत्यानी दाखल केलेली जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयानं राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर या याचिकेवर सुनावणी होईल, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते आज ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या अभियानाचं उद्धाटन होणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत सुरु केलेली ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आखलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. याअंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रावर कृषी मेळावा आणि नैसर्गिक शेतीवरील प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम, २०२१ अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत चुकीची माहिती पसरवणारे १६ यूट्यूब न्यूज चॅनल आणि पाकिस्तान आधारित सहा युट्यूब चॅनल बंद केले, तसंच एक फेसबुक अकाउंटही ब्लॉक करण्यात आलं आहे. मंत्रालयाने खाजगी टीव्ही वृत्तवाहिन्यांना खोटे दावे आणि निंदनीय मथळे न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख ८३ हजार २२३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८७ कोटी ९५ लाख ७६ हजार ४२३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ४८३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार ९७० रुग्ण बरे झाले. देशात सध्या १६ हजार ६३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  

****

कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचं पहायला मिळत आहे. एक ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या कमी झाली असून, ११ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत, असं राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

****

येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत `महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ हे तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास संस्था, “झेप उद्योगिनी” आणि “वी एम एस एम ई” च्या सहकार्यानं भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संधी, सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

****

आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून फिलिपाइन्समध्ये सुरुवात होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या वतीने एकेरी गटात ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सायना नेहवाल तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी सहभागी होणार आहेत. एचएस प्रणॉयने मात्र दुखापतीमुळे पुरुष एकेरीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

****

हवामान

राज्याच्या काही भागात उन्हाची तीव्रता जाणवत असतानाच काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काल महाबळेश्वर, साताऱ्यात जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद काल वर्धा इथं झाली.

येत्या दोन तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऊर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

****

No comments: