Wednesday, 27 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान स्वनिधी योजनेला डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

·      कोविडचा धोका संपलेला नाही; सतर्कता बाळगण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त.

·      सर्वाधिक कर संकलन करणाऱ्या महाराष्ट्राला कर वाटपात सापत्न वागणुक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      किसान रेल्वे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय.

आणि

·      जालना जिल्ह्यात रस्ता अपघातात तीन ठार तर धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र प्रकरणी जालन्याच्या चौघांना अटक.

****

फेरीवाल्यांसाठी असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. खरीप हंगामासाठी खतांच्या अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत घेतला. नक्षलग्रस्त भागात 2 जी मोबाईल सेवेचं 4 जी सेवेत रुपांतर करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.

****

कोविडचा धोका अजूनही संपला नसल्याने, सर्व राज्यांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ते आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोविड आढावा बैठकीत बोलत होते. युरोपीय देशात ओमायक्रॉन तसंच अन्य नव्या विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. वैद्यकीय महाविद्यालयं तसंच जिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकारांच्या समन्वयातून निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पेट्रोल तसंच डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कर वाटपात महाराष्ट्राला सापत्न वागणुक मिळत असल्याबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

प्रत्यक्ष करात महाराष्ट्राचा वाटा ३८ पूर्णांक ३ दशांश टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के वस्तू आणि सेवा कर - जीएसटी महाराष्ट्रातून संकलित होतो. प्रत्यक्ष कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर देशात करसंकलनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरात २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा कर तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्राचा कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर साडे तेरा टक्क्यांहून कमी करून तो ३ टक्के केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

****

प्रार्थनास्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारला विचारला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यामुळे संविधानाचा अपमान होत असून, या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. प्रार्थनास्थळांवरचे बेकायदा ध्वनिक्षेपक तातडीने काढून टाकावेत असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्याऐवजी, ज्यांनी ध्वनिक्षेपकासाठी परवानगी घेतलेली नाही, अशांनी परवानगी घ्यावी, असं जाहीर वक्तव्य गृहमंत्री करतात, हे धक्कादायक असल्याचं भांडारी म्हणाले. राज्यात किती अनधिकृत प्रार्थनास्थळे आहेत याची संख्या राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली.

****

देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांनी गेल्या चार वर्षांत महत्त्वाच्या विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असल्याचं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं आज 'सेवागीता से समृद्धी' या आकांक्षित जिल्ह्यांच्या कार्यक्रमावर आयोजित एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन कांत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यांमधली भागीदारी आणि नियमित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांची जलद सुधारणा होत असल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

****

महाराष्ट्र राज्याच्या मराठी समाजशास्त्र परिषदेच्या कार्यकारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनीधी म्हणून प्राध्यापक डॉ.मधुकर चाटसे यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी इथं गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या परिषदेच्या अधिवेशनात नवीन कार्यकारणीची निवड झाली. डॉ.मधुकर चाटसे हे सध्या औरंगाबादच्या वाळूज इथल्या राजश्री शाहू कला आणि विज्ञान महाविद्यालयात उपप्राचार्य तथा समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनात सध्या आठ विद्यार्थी संशोधन करत आहेत.

****

मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्तवेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं हि शक्यता लक्षात घेवून मध्य रेल्वे हा निर्णय घेतला आहे. किसान रेल्वे सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला रेल्वे स्थानकातून सुमारे ७९ हजार टन शेतमालाच्या वाहतुकीतून रेल्वेला सुमारे ३२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे मात्र आता किसान रेल्वे बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-जालना रस्त्यावरील ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात होऊन तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल इथले काही जण पिकअप वाहनाने जालन्याकडे येत असताना, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास बानेगाव फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकशी त्यांच्या वाहनाशी धडक झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे जिल्ह्यात सोनगीर पोलिसांनी आज सकाळी एका भरधाव जीपचा पाठलाग करत, मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ८९ तलवारी आणि एक खंजीर अशी ९० धारधार शस्त्रं पोलिसांनी जप्त केली आहेत. या शस्त्रांसह चौघांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शरीफ, शेख इलियास, सैय्यद नईम, आणि कपिल दाभाडे अशी या चौघांची नावं असून, हे सर्वजण जालना इथले असल्याचं, चौकशीत समोर आलं आहे.  त्यांच्या विरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात आर्म ऍक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद इथं शहागंज परिसरातल्या एका किराणा दुकानातून पोलिसांनी छापा टाकून एक कोटी नऊ लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून ही रोकड तसंच नोटा मोजण्याचं यंत्रही जप्त केलं. आशीष साहुजी असं या दुकानदाराचं नाव असून, प्राथमिक दृष्टया ही रक्कम हवाला रॅकेटची असण्याची शक्यता पोलिस विभागानं वर्तवली आहे. आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

****

नांदेड श्रीगंगानगर या रेल्वेगाडीला तृतीय श्रेणीचा एक वातानुकूलित डबा वाढवण्यात आला आहे. दोन जूनपर्यंत हा बदल असेल, असं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

****

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, असं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.

****

No comments: