Sunday, 25 December 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २५ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कोविड व्यवस्थापनासाठी वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुनिश्चित करण्याची केंद्राची राज्यांना सूचना 

·      कोविडचा सामना करण्यासाठी राज्यसरकार सक्षम;नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही-आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा दिलासा

·      नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेसाठी मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर

·      मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य:अन्यथा पॅन निरस्त

·      पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं स्वप्न साकार होणार-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

·      हैदराबाद इथल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात खरपुडी कृषी विज्ञान केंद्राला प्रथम पुरस्कार

·      येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ सर्वत्र पारंपारिक पद्धतीने साजरा

आणि

·      भारत-बांगलादेश कसोटी क्रिकेट सामना रंगतदार अवस्थेत

****

सविस्तर बातम्या

कोविड १९ संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय प्राणवायू -ऑक्सिजनचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना लिहिलेल्या पत्रात सर्व आरोग्य सुविधांमध्ये द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, आपापल्या सर्व संबंधित विभागांना निर्देश द्यावेत असं म्हटलं आहे. ऑक्सिजनचा पुनर्भरणा करण्यासाठी पुरवठा साखळीत कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये, तसंच जीवरक्षक प्रणालीची उपलब्धता, या बाबी सुनिश्चित करण्याचे निर्देशही, आरोग्य विभागानं दिले आहेत.

दरम्यान, जगातल्या काही देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री  डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी तत्काळ चर्चा करून ही चाचणी अनिवार्य करण्यात येईल. भारतात आल्यानंतर कोणालाही ताप किंवा कोविडची त्यासारखी लक्षणं आढळली किंवा RTPCR चाचणीत कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं तर त्या रुग्णाला तत्काळ विलगीकरणात पाठवण्याचे आदेश आरोग्य मंत्रालय जारी करेल, असं मांडवीय यांनी सांगितलं आहे.

****

कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. सावंत यांच्या हस्ते काल पुण्यात पिंपरी चिंचवड इथं अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक सण आणि सुट्यांचा आनंद घ्यावा, मात्र कोविड नियमांचं पालन करा, असं आवाहन सावंत यांनी केलं. ते म्हणाले,

 महाराष्ट्राची स्थिती अगदी ताकदीची आहे. कारण जवळपास ९५% लोकांचं लसीकरण झालेलं आहे. आपली हर्ड इम्युनिटी महाराष्ट्रातली अतिशय चांगली आहे. आपला बुस्टर डोस सुद्धा ६० ते ७० टक्के लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्याच्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. मंदिरात जाऊ, पर्यटनस्थळी जाऊ, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. आणि एव्हढं माफक आवाहन करतो आपल्या माध्यमातून थोडं डिस्टन्स मेंन्टेन करा, सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरा, घाबरायचं तर अजिबात करण नाही. आणि म्हणून प्रत्येक सण-सुद असेल किंवा अशा सुट्ट्या असतील तर एन्जॉय करायचं का? तर डेफिनेट एन्जॉय करायचा पण काही तत्व काही बंधनं पाळून करायचा एव्हढं आपल्याला आवाहन करतो.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते छावणी परिषदेच्या मैदानावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेत मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे दुपारी सव्वा बारा वाजता विमानानं सोलापूरला रवाना होणार आहेत.

****

राज्यात आगामी काळात खाजगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मूळ पशुवैद्यकीय विद्यापीठांच्या नियमात बदल करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं बोलत होते. राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ठराविक महाविद्यालयं होती. मात्र कृषी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यानंतर खाजगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालयं सुरू झाली. त्याच धर्तीवर राज्यातल्या पशुसंवर्धन  विद्यापीठातल्या कायद्यामध्ये बदल केला जाणार असून त्यानंतर खाजगी तत्वावर पशुसंवर्धन महाविद्यालयांना परवानगी देण्यात येणार असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं.

****

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्याला शुक्रवारी सीबीआयने दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर त्यांना शनिवारी मुंबईत आणण्यात आलं. व्हिडीओकॉन समूहाला १ हजार ८७५ कोटी रुपये कर्जवाटपात अनियमितता केल्याच्या आरोपावरून कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.

****

मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्डचं आधार ओळखपत्राशी संलग्नीकरण करणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं स्पष्ट केलं आहे. जे पॅनकार्ड आधारकार्डाशी जोडले जाणार नाहीत ते ३१ मार्चनंतर निष्क्रीय होतील असा इशाराही प्राप्तीकर विभागानं दिला आहे. पॅनकार्ड निष्क्रीय झाल्यास अशी व्यक्ती प्राप्तीकर दाखल करु शकणार नाही, प्राप्तीकराचा परतावा अश्या व्यक्तीला मिळणार नाही आणि त्याला सुधारित विवरणपत्रदेखील दाखल करता येणार नाही, शिवाय अधिक दरानं अश्या व्यक्तीच्या उत्पन्नावर करकपात केली जाणार आहे. आणि जिथे पॅनकार्ड अनिवार्य असेल अश्या आर्थिक व्यवहारांमध्ये ही अडचण येणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा ९६ वा आणि या वर्षाचा शेवटचा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून सीमा बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू करणार आहे. तसंच पूर्वीच्या सरकारनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राज्यसरकार सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा, निर्वाळा केसरकर यांनी दिला.

****

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्पर समन्वय दृढ आणि व्यापक करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी दिले आहेत. दोन्ही राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक काल अमरावती इथं झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

****

अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात १२ लाख नवे रोजगार निर्माण होतील, असं केंद्रीय अक्षय ऊर्जा आणि रासायनिक खते निर्मिती राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी म्हटलं आहे. ते काल पंढरपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकार लवकरच देशातील तीर्थक्षेत्रांसाठी अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची वीज पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया निर्मितीचं संशोधन क्रांतिकारक ठरेल असंही त्यांनी सांगितलं. खुबा यांनी काल पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी मंदिर व्यवस्थेचा आढावाही घेतला.

****

भारतीय अर्थव्यवस्था नवी भरारी घेत असून भारताचं पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न नक्की साकार होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचा काल समारोप झाला, या समारोप सोहळ्यात डॉ कराड बोलत होते. भारतीय वाणिज्य संघटनेच्या वतीने ’इंडियाज मार्च टूवडर्स फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमी बाय टू थाऊजंड ट्वेंटी फोर’ या विषयावर तीन दिवसीय परिषद घेण्यात आली. वाणिज्य परिषदेत झालेले मंथन देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, वाणिज्य परिषदेच्या अध्यक्षपदी औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ वाल्मिक सरवदे यांची निवड झाली आहे. डॉ सरवदे यांनी काल या पदाची सूत्रं स्वीकारली.

****

हैदराबाद इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात जालना जिल्ह्यातील खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी ऑफ ड्रायलँड ॲग्रीकल्चर आयएसडीए यांच्या वतीने हैदराबाद इथं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अभियंता पंडित वासरे आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक सलमान पठाण यांनी या परिषेदेत सहभाग घेऊन स्टॉलचं सादरीकरण केलं. यामध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, कृषी विज्ञान मंडळाचा उपक्रम, बांबू लागवड आणि रेशीम शेतीतील पुढाकार, स्वयंरोजगार निर्मिती, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, कृषी विज्ञान केंद्राची विविध उत्पादने याबत माहिती सादर करण्यात आली.

****

ख्रिस्ती धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ आज सर्वत्र साजरा होत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा सर्वांनी जीवनात अंगीकार करावा, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात येशू ख्रिस्ताने दाखवलेला प्रेम, दया आणि करुणेचा मार्ग समाजात सद्भाव आणि सहिष्णुता वृद्धिंगत करत असल्याचं म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाताळनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मध्यरात्री सर्व ठिकाणच्या चर्चेसमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा झाला. बाल येशूच्या जन्मोत्सवाच्या देखाव्यासह विद्युत रोषणाईने चर्चेस सजवण्यात आले आहेत. या निमित्ताने चर्च मधून विशेष प्रार्थना तसंच कॅरेल गायनाचे कार्यक्रम होत आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कचनेर इथल्या जैन मंदिरातून चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची २ किलो वजनाची सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याचं काल उघडकीला आलं. महिनाभरापू्र्वीच मंदिर प्रशासनानं या मूर्तीची स्थापना केली होती. अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही मूर्ती चोरली आणि त्या जागी अन्य धातुची हुबेहुब दिसणारी मूर्ती ठेवली. काल या मूर्तीचा रंग उडाल्याचं निदर्शनास आल्यानं, हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

****

भारत आणि बांगलादेश दरम्यानचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. या सामन्यात विजयासाठी दुसऱ्या डावात १४५ धावांचं लक्ष्य असलेल्या भारतीय संघानं काल तिसऱ्या दिवसअखेर चार बाद ४५ धावा केल्या. अक्षर पटेल २६ आणि जयदेव उनाड्कट तीन धावांवर खेळत आहेत. त्या आधी बांगलादेशचा संघ आपल्या दुसऱ्या डावात २३१ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलनं तीन तर आर. अश्र्विन, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमेश यादव, जयदेव उनाड्कट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. यंदा वाशी इथले प्रगतीशील शेतकरी विश्वास उंदरे, परभणीच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीलेखा वझे, लातूरचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चामे यांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या शिवार प्रतिष्ठानचा शेतकरी साहित्य पुरस्कार कवी संदीप जगदाळे यांना 'असो आता चाड' या काव्यसंग्रहासाठी काल प्रदान करण्यात आला. ४२ व्या मराठवाडा साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ.शेषराव मोहिते यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आपल्या काळातील आवाज नोंदवणं, हे कवी, कलावंत आणि विचारवंतांचं काम आहे, असं मत संदीप जगदाळे यांनी पुरस्काराला उत्तर देतांना व्यक्त केलं.

****

 सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक तथा कादंबरीकार डॉ. राम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. वाघमारे यांचे कथासंग्रह, अनेक कादंबऱ्या आणि अनेक चरित्रात्मक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख इथं हे संमेलन होणार आहे.

****

No comments: