Wednesday, 28 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केल्याचा, तसंच मुंबईत कन्नड भाषिक अधिक असल्याचा दावा केल्याचा मुद्दा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. राज्य सरकारने या वक्तव्याचा निषेध करावा, आणि दोन्ही राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न केंद्राच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही, अशा प्रकारच्या वक्तव्याचा निषेध करणारं पत्र कर्नाटक सरकारला पाठवलं जाईल, असं यावेळी सांगितलं.

****

दरम्यान, टीईटी परिक्षा घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांचा प्रश्न मांडण्यास अध्यक्षांनी नकार दिला.  मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असून, सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, त्यांच्यावर काही कारवाई करत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. टीईटी परिक्षा घोटाळा हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मागील सरकारच्या काळात जो टीईटी घोटाळा झाला, त्यात अपात्र कंपन्या पात्र केल्या. हे कुणी केलं याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

गायरान जमिन घोटाळा आरोपासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात निवेदन दिलं.

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत विरोधकांच्या अनुपस्थितीतच मंजूर करण्यात आलं.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदार-मुकादमांकडून, साखर कारखान्यांची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, ट्रॅक्टर खरेदी करुन वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांची होत असलेल्या फसवणूकीसंदर्भात अजित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. सहकारमंत्री अतुल सावे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं.

****


तुतीच्या प्रकल्पाला चालना देण्याची गरज असून, पैठणी तयार होऊ शकते इतका चांगला रेशीम धागा मराठवाड्यात तयार होऊ शकतो, असं माजी मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितलं. तालुका औद्योगिक विकास महामंडळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येऊयात असं आवाहन त्यांनी केलं. सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, या धोरणाप्रमाणेच जालन्याला सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय होण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचं देखील टोपे म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमध्ये सिदरा इथं दहशतवदी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी आज उधळवून लावला. आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.

****

देशातला ८० टक्के भूभाग पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये फाईव्ह जी सेवांद्वारे व्यापला जाईल, असा विश्वास, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. भारतीय दूरसंचार निगमद्वारे पुढील वर्षात फाईव्ह जी सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील असं त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितलं. शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि लॉजिस्टीक्स या क्षेत्रांमध्ये फाईव्ह जी सेवांचा मोठा लाभ होईल, असं ते म्हणाले.

****

आयसीआयसीआय बँकेनं व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्ज प्रकरणात अटकेत असलेल्या चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्यावर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून, यावर तत्काळ सुनावणी घेऊन अंतरिम सुटका करावी, अशी मागणी कोचर दाम्पत्याने या याचिकेत केली होती.

****

राज्यातल्या सर्व कृषी फीडर्सना दिवसा पुरवठा करण्यासाठी मिशन २०२५ चं नियोजन आणि विकास याकरता राज्याचा ऊर्जा विभाग आणि पुण्याच्या प्रयास एनर्जी ग्रुप दरम्यान काल नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक सामंजस्य करार करण्यात आला. प्रयास संस्था याकामी तांत्रिक आणि ज्ञानाधारित सहाय्य करणार आहे.

****

बीड जिल्ह्यात आजपासून येत्या तीस तारखेपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं होणाऱ्या या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

ओखा - रामेश्वरम एक्सप्रेस काल ओखा इथून निघाली असून, ती मनमाड पासून पुढे रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्याचप्रमाणे ३० डिसेंबरला नियोजित वेळापत्रकाप्रमाणे रामेश्वरम इथून सुटणारी ही गाडी मनमाडहून सुटेल, रामेश्वरम ते मनामड ही गाडी रद्द केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

                    

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...