Friday, 30 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या सदस्यांना काल निरोप देण्यात आला. औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, नागपूरचे नागोराव गाणार, कोकणचे बाळाराम पाटील, नाशिकचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, आणि अमरावतीचे रणजीत पाटील, या सर्व सदस्यांचा कार्यकाळ सात फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या घरी मातोश्रींचं अंतिम दर्शन घेतलं. हिराबा मोदी यांचं आज पहाटे अहमदाबाद इथं निधन झालं, त्या शंभर वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिराबा मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

****

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून देहरादून इथं जाताना हम्मदपूरजवळ काल रात्री हा अपघात झाला. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देहरादून इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड इथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारत सरकारनं या देशांमधून निघण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. या प्रवाशांना एक जानेवारी पासून आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

****

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल देशातल्या औषध कंपन्यांकडे असलेल्या अत्यावश्यक औषधांच्या साठ्याचा आढावा घेतला. जागतिक पुरवठा साखळीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी औषध कंपन्यांना यावेळी दिल्या.

****

भारतीय वायूदलानं आज हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. एसयु-३० एमकेआय विमानातून या क्षेपणास्त्रानं बंगालच्या उपसागरात लक्ष्याचा अचूक वेध घेतला. एसयु-३० एमकेआय विमानाच्या उच्च कार्यक्षमतेसह क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ल्याच्या क्षमतेमुळे भारतीय वायूदलाला सामरिकदृष्ट्या निर्णायक बळ मिळालं आहे.

****

No comments: