Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप; विधानसभेत ८४ तास १०
मिनिटं कामकाज.
·
आपल्या शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये - मुख्यमंत्र्यांचा
इशारा.
·
महापुरुषांच्या अवमानना प्रकरणाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष
केल्याचा विरोधकांचा आरोप.
·
पंतप्रधानांच्या मातोश्री हिराबा यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार.
आणि
·
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं
सुरुवात.
****
विधानसभेच्या
हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनात याबाबत
अधिकृत घोषणा केली. या अधिवेशन काळात विधानसभेत दहा बैठका झाल्या. यात एकूण ८४ तास
१० मिनिटं कामकाज झालं. १२ विधेयकं आणि दोन शासकीय ठराव मंजूर झाले, २९३ अन्वये तीन
सूचनांवर तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा झाल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
****
आपल्या
शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
आज दिला आहे. ते आज हिवाळी अधिवेशनाचा समारोप करताना अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर
देत होते. सरकारला आज सहा महिने पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, या सहा महिन्यांत सरकारनं
घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पेट्रोलची दरकपात,
शेतकऱ्यांच्या मदतीत दुप्पट वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, नागरिकांना
शंभर रुपयात दिवाळी शिधा, यासह दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र
हे पहिलं राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पूर्वी
सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांवर तातडीनं सूडबुद्धीची कारवाई केली जात असे, असा आरोप करत,
मुख्यमंत्र्यांनी कंगना रानावत, नवनीत राणा, अर्णब गोस्वामी यांच्यावरच्या कारवाईची
आठवण करून दिली. महापुरुषांच्या अवमानना प्रकरणी विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप
मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधी पक्षांकडूनच महापुरुषांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही
मुख्यमंत्र्यांनी उदाहरणं देऊन केला. भ्रष्टाचाराचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
ते म्हणाले –
भ्रष्टाचार
आणि गैरव्यवहाराचे आरोप आमच्यावर करता? का अण्णा हजारेंची मागणी लोकायुक्ताची तुम्ही
मान्य केली नाही? अरे आम्ही केली ना? आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळ त्या लोकायुक्ताच्या
चौकशीमध्ये आणण्याचं धाडस आमच्या सरकारने दाखवलं. एकच मी सांगतो की बिनबुडाचे आरोप,
कुठलाही आधार नाही, पुरावे नाही, अशा प्रकारचे आरोप, तुम्ही करू नका. कारण माझा स्वभाव
टीका करण्याचा नाही म्हणून मी शांत आहे. परंतू शांत म्हणजे माझी हतबलता समजू नका. मै
खामोश हूं क्यों की मै सब जानता हूं। बात निकलेगी तो बहोत दूर तलक जायेगी।
****
महापुरुषांच्या
अवमानना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर
झाल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांवर
मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाडा
मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने लोकसहभागातून कार्यक्रम घ्यावेत, अशी महाविकास
आघाडीची भूमिका आहे. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हा संग्राम पोहोचवावा,
असं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान,
विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या
आवारात सरकार आणि राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.
****
शालेय
शिक्षण पोषण आहारातलं ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचं प्रलंबित अनुदान सरकारनं त्वरित
द्यावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात
केली. शालेय पोषण आहाराचं एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचं सत्तर टक्के अनुदान वितरित
झालं आहे, मात्र ऑक्टोबरपासून पुढचं अनुदान अजून मिळालेलं नाही, अशी माहिती देत, हे
अनुदान कधी देणार असा प्रश्न दानवे यांनी केला. यावर, संबंधित कंत्राटदारांना ऑनलाईन
अर्ज भरण्यास अडचण येत असल्यामुळे अनुदानाला विलंब झाला, आता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज
करण्याची परवानगी दिली असून, प्रलंबित अनुदान लवकरच वितरित होईल, असं उत्तर शालेय शिक्षण
मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.
****
अनेक
कंपन्या त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत
नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनानं घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात
जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत
दिली. विधानसभा सदस्य गीता जैन यांनी मांडलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना ते
बोलत होते.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी
चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, तरीही याप्रकरणी फेरचौकशी करण्यात येईल
आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री
संदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या
प्रश्नाला ते उत्तर देत होते. या प्रकरणात अपहार झालेल्या एक कोटी बारा लाख रुपयांपैकी
पंचाहत्तर लाख सत्तर हजार रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात आले असून उर्वरित रक्कमही
वसूल करणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
****
बनावट
खत विक्री करणाऱ्यांवर धाक बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे
आणि खतांची गोदामं तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि बनावट खत विक्री
करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री
शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. बुलडाणा शहरात दुकानदाराकडून अनावश्यक खत घेण्याची
सक्ती शेतकऱ्यांवर झाल्याच्या प्रकरणी सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला
ते उत्तर देत होते.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी गांधीनगर
इथं अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईंच्या
पार्थिव देहाला मुखाग्नी दिला. मोदी कुटुंबातले सदस्य, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई
पटेल आणि इतर नातेवाईक अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते. हिराबा यांचं आज पहाटे
अहमदाबाद इथं निधन झालं, त्यांनी गेल्या १८ जूनला शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं.
जपान, रशिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यासह देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधानांना
शोकसंदेश पाठवून संवेदना प्रकट केली आहे.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हिराबा यांचं संघर्षपूर्ण
जीवन म्हणजे भारतीय आदर्शांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं. उपराष्ट्रपती जगदीप
धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह, यांनीही हिराबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिराबा यांना श्रद्धांजली अर्पण
केली आहे. विधानसभा तसंच विधान परिषदेतही हिराबा यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव पारित
करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांनीही हिराबा यांच्या
निधनाबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.
****
तुळजाभवानी
देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात झाली. सात दिवसांची
मंचकी निद्रा संपवून आज देवी सिंहासनावर विराजमान झाली, त्यानंतर मंदिर परिसरात विधीवत
घटस्थापना करण्यात आली. पौष महिन्यातल्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या
शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीच्या विविध अलंकार पूजा मांडण्यात येणार असून, दररोज
रात्री छबिना, मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातलं
प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारीला होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद
इथं होणाऱ्या जी-20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचं
काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी
राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली
आहे.
****
No comments:
Post a Comment