Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ डिसेंबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधीमंडळाच्या
नागपूर इथं सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होणार आहे. त्यामुळे आज अंतिम
आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार असून, त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
दरम्यान,
विधानसभेत आज बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
झाल्याचा मुद्दा भाजपा आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला. २३ कॉन्ट्रॅक्टर काळ्या
यादीत टाकण्यात आलं असून, अधिकाऱ्यांच्या मुलांनाच काम मिळालं आहे. हे सर्व उबाळे नावाच्या
कार्यकारी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालं आहे. विभागीय उपायुक्तांकडून याप्रकरणी चौकशी
सुरु असून, या अधिकाऱ्याला निलंबीत करणार का, असा प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला.
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात
येईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या
जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला
होता.
वन्य प्राण्यांच्या
हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक वाघ काही प्रमाणात इतर ठिकाणी देण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे, त्या सोबत संबधित गावांमध्ये दहा लाख रुपये देऊन स्वरोजगार
उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
विनोद अग्रवाल यांनी, प्राणी शेतीचं नुकसान करत असल्याचं सांगितलं. हत्ती पकडुन ते
मूळ राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाते असून, डोंगर आणि खनिज विकास निधीच्या धर्तीवर
अशा वन्य प्राणी ग्रस्त गावांच्या विकासासाठी वन ग्रामविकास निधी उपलब्ध करुन देण्याचा
प्रस्ताव करण्यात येत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
गायरान जमिनीच्या
वाटपासंदर्भातला मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी सखोल
चौकशी करुन, चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावा, अशी मागणी
त्यांनी केली.
विधानपरिषदेत
सकाळच्या सत्रात विदर्भ विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीला
भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन
कटिबद्ध असून, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिलं.
नागपूर शहरात
रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी
भेट दिली.
गोवारी समाजाच्या
मागण्यांसाठी १९९४ मध्ये विधान भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात मृत्युमुखी पडलेल्या
बांधवांच्या स्मरणार्थ नागपूर इथं उभारलेल्या गोवारी स्मारकाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी
भेट देऊन आदरांजली अर्पण केली.
****
मतदारसंघापासून
दूर राहणाऱ्यांना नागरिकांना रिमोट वोटिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय केंद्रीय
निवडणूक आयोगानं घेतला आहे. आयोगाने रिमोट वोटिंग संकल्पनेबाबत निवेदन जारी केलं असून,
ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मते मागवली आहेत.
रिमोट वोटिंगला मान्यता मिळाल्यास इतर राज्यांत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा
फायदा होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशातल्या
विविध विद्यापीठातल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या
वतीनं सामान्य विद्यापीठ प्रवेश परीक्षा पीजी अर्थात सीयूईटी पीजी परीक्षा आयोजित करण्यात
येणार आहे. पुढील वर्षी एक ते दहा जून दरम्यान ही परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठीची
अर्ज प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू होईल, असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष ममिदला
जगदेश कुमार यांनी ट्विटरवरील संदेशात सांगितलं.
****
एक जानेवारीच्या
शौर्य दिनानिमित्त भीमा - कोरेगाव इथं सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या
आहेत. विजयस्तंभ आजूबाजूच्या परिसरात खबरदारीचे उपाय म्हणून २४० सीसीटीव्ही कॅमेरे
बसवण्यात आले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र
क्रिकेट संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक आठ जानेवारीला होणार असून, याच दिवशी मतमोजणी
होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एम. सहारिया यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. संघटनेच्या अंतर्गत २१ जिल्हे येत असून सहारिया यांची निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र
राज्य ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धांच्या अंतर्गत कबड्डी स्पर्धा पाच ते आठ जानेवारी दरम्यान
बारामती इथं होणार आहे. या स्पर्धेत राज्यातले पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी आठ वरिष्ठ
संघ सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment