Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर
२०२२ दु पारी १.०० वा.
****
विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
रोजगार हमी
योजनेमध्ये राज्यातल्या विविध भागात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विधानसभेत आज विरोधी
पक्ष सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
हिंगोली
जिल्ह्यात वसमत इथल्या मॉडर्न मार्केट आणि हळद संशोधन केंद्रासंदर्भात विरोधी पक्षनेते
अजित पवार लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलं. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं
हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असून, मॉडर्न मार्केट आणि हळद संशोधन केंद्र दोन्ही
साठी पुरेशी जागा आहे, त्यामुळे दोन्ही प्रकल्प सुरु करावे, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे
यावेळी केली.
परभणी जिल्ह्यात
स्कायमॅट या पर्जन्यासंदर्भात माहिती देणार्या आणि पर्जन्यमापक यंत्र बसवणार्या कंपनीचं
काम योग्य रितीने होत नसल्यामुळे, वीमा कंपन्यांना पर्जन्यासंबंधी अचूक माहिती मिळत
नाही, त्यामुळे शेतकर्यांना योग्य मदत मिळत नसल्याचा मुद्दा, आमदार सुरेश वरपुडकर यांनी
उपस्थित केला. या संदर्भात शासन स्वत:ची यंत्रणा बसवणार का आणि फेरतपासणी करुन सर्व
शेतकर्यांना मदत देणार का, असे प्रश्न त्यांनी विचारले. यावर उत्तर देताना मंत्री शंभुराज
देसाई यांनी, जिल्हाधिकारी अणि कृषी अधिकार्यांना तपासणी करण्याच्या सूचना देणार असल्याचं
सांगितलं.
अनाथाश्रमाच्या
अनुदान वाटपाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. उस्मानाबाद
इथल्या अनाथाश्रमाच्या अनुदानाच्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी, अधिकार्यांनी लाच मागितल्याचं
त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चौकशी करुन दोषी अधिकार्यांना बडतर्फ
करण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान,
विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या निधनाबद्दल
शोक प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व सदस्यांनी हिराबा मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विधानपरिषदेत
आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात
आली.
****
राज्य सरकारने
आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. ही परिषद राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन
डॅालरची बनवण्यात महत्वाची भूमिका बजावेल, तसंच या परिषदेतर्फे विविध क्षेत्रातले महत्त्वाचे
निकष निश्चित आणि धोरण ठरवलं येईल. राज्य सरकारनं या परिषदेच्या अध्यक्षपदी टाटा समुहाचे
अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी काल विधानसभेत केली.
****
क्रिकेटपटू
ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून देहरादून इथं जाताना हम्मदपूरजवळ
आज पहाटे हा अपघात झाला. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देहरादून
इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षांमधून उद्भवणाऱ्या तणावावर मात करण्याबाबत विद्यार्थांना
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. पुढील वर्षासाठी यात सहभागी होण्यासाठी
अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असून, इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे शालेय विद्यार्थी,
शिक्षक आणि पालक ऑनलाइन प्रवेशिका दाखल करू शकतात. लेखन स्पर्धेद्वारे निवड केली जाणार
असून, या स्पर्धांद्वारे निवडलेल्या दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना
शिक्षण मंत्रालयाकडून पीपीसी संच भेट देण्यात येणार आहेत.
****
केंद्रीय
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि
बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे
तपशीलवार वेळापत्रक मंडळानं जाहीर केलं असून ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
****
राज्य शासनाच्या
क्रीडा विभागाच्या वतीनं येत्या दोन ते १२ जानेवारी या कालावधीत मिनी ऑलिंपिक स्पर्धेचं
आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धांच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा
मंत्री गिरीष महाजन, विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित
पवार यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद
इथं होणार्या जी - 20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद ते अजिंठा
रस्त्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार
पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना
दिली आहे. जिल्हाधिकारी पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हर्सूल ते अजिंठा
रस्त्याची काल पाहणी केली. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत
समन्वय ठेवून रस्त्याचं काम पूर्ण करावं, या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment