Sunday, 25 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 25.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      स्वच्छता चळवळीतला नागरिकांचा सहभाग प्रेरणा देणारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.

·      कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही.

·      भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त - सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती.

आणि

·      भारतानं बांगलादेश विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका जिंकली, अश्विन सामनावीर तर पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी.

****

राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावं आणि शहरातल्या नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज औरंगाबाद शहर आणि परिसरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले –

हे सर्वसामान्य लोकांचं सरकार, लोकांसाठीच स्थापन झालेलं सरकार याठिकाणी लोकांसाठीच काम करेल हे देखील मी याठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन जे काही सरकार सर्वसामान्यांसाठी न्याय देण्याचं काम करतंय, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न आपण करतोय. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, त्या त्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसंच परिसरात स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. राज्यातल्या अनेक शहरात याच धर्तीवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचं ते म्हणाले. प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवडीबाबत आवाहन केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या आदिनाथ कारखान्याच्या २७व्या गळीत हंगामाची सुरुवात आज झाली. त्यांनी यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.

****

कोविड-१९चा ‘बीएफ ७’ या नवीन विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पवार यांनी आज पद्दुचेरीत नागरिकांबरोबर ऐकला. त्यानंतर त्या बोलत होत्या. नव्या विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्यानं प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, असं त्या म्हणाल्या. आतापर्यंत देशात या विषाणूचे चार रुग्ण आढळल्याचं पवार यांनी सांगितलं. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसंच कोणतीही आणिबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असं डॉक्टर पवार म्हणाल्या.

****

मुंबईमध्ये दहा रुग्णांसह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे एकून ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ८१ लाख ३६ हजार ४९७ झाली असून सध्या १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात या संसर्गामुळं मरण पावलेल्यांची संख्या एक लाख ४८ हजार ४१५ झाली आहे. ओमायक्रॉनचा उप- व्हेरियंट बी. एफ. ७च्या नुकत्याच प्रसारानंतर राज्यात या संक्रमणाला नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज दुपारपर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ३ लाखांच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी २१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात सात हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७६ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९४ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लस मात्रा घेतली आहे.

****

महात्मा फुले कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत असून, भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विविध शासकीय योजनांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी सावे बोलत होते. राज्य शासन सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सकारात्मक विचार करून नागरिकांसाठी उपयोगी असणारे निर्णय घेण्यात येत असल्याचं सावे यांनी सांगितलं.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त मुंबईत वांद्रे इथल्या सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली, तसंच सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांना ‘द चर्च ऑफ द हिल’ हे सेंट स्टीफन चर्चचा १७५ वर्षांचा इतिहास सांगणारं पुस्तक भेट देण्यात आलं. यावेळी मुख्य धर्मोपदेशक रेव्हरंड थॉमस जेकब उपस्थित होते.

****

कोणतंही सरकार आलं तरी इतर मागास वर्गाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावाच लागतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर मागास वर्ग आघाडीच्या बैठकीत नागपूर इथं ते बोलत होते. इतर मागास वर्गीयांची जात निहाय जनगणना केली पाहिजे या मागणीचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला.

****

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील तीन समाजसेवकांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ग्रामविकासासाठी अविरत प्रयत्न करणारे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या आनंदवाडी इथले ज्ञानोबा चामे, नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथले विश्वास शिवाजीराव उंदरे आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या श्रीलेखा श्रीनिवास वझे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथल्या यात्रेत ताडपत्री आणि चटईचा बाजार फुलला असून या खरेदी विक्रीसाठी व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या माळेगाव यात्रेत गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातून ताडपत्री तसंच चटईचा व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आले असून त्यांनी यात्रेत आपली दुकानं थाटली आहेत. माळेगाव यात्रेत पाणी स्वच्छता समृद्ध आरोग्य यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या दालनामध्ये विविध कलापथकं प्रबोधनपर कार्यक्रम सादर करत आहेत.

****

भारतानं बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना तीन गडी राखून जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला. ढाका इथं सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं आज चार बाद ४५ धावांवरुन पुढं खेळताना विजयासाठी आवश्यक १४५ धावा सात गडी गमावत पूर्ण केल्या. एकवेळी भारताची अवस्था सात बाद ७४ अशी झाली होती. रविचंद्रन अश्विननं ४२ आणि श्रेयस अय्यरनं २९ धावा काढताना आठव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद ७१ धावांच्या भागीदारीमुळं भारताचा विजय साकारला. रविचंद्रन अश्विन सामनावीर तर चेतेश्वर पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 

****

अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आज पालघर जिल्ह्यातल्या वालीव पोलिसांनी तिचा सहकलाकार शिजान खान याला वसई न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काल वसई तालुक्यातल्या भजनलाल स्टुडिओत तुनीषानं आत्महत्या केली होती. तुनीषाच्या आईनं वालीव पोलीस ठाण्यात शिजान खानविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दोघांमधील प्रेमभंग झाल्यानं तुनीषानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...