Monday, 26 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      नव्या वर्षात जी ट्वेंटीचा उत्साह नव्या उंचीवर न्यावा;मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन

·      आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी उद्या देशभरात मॉक-ड्रील

·      देशभरातल्या सर्व बँकांनी लॉकरधारकांच्या कराराचं नूतनीकरण करण्याचे रिजर्व्ह बँकेचे निर्देश   

·      स्वच्छता चळवळीत नागरिकांचा सहभाग इतरांसाठी प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची औरंगाबाद शहरात स्वच्छता मोहीम;सुमारे साडे सातशे टन कचरा संकलित

·      आज वीर बाल दिवस;नांदेडसह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      भूविकास बँकेकडे कर्जापोटी गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन बँकेकडून मुक्त

आणि

·      बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकत भारताचा मालिका विजय

 

सविस्तर बातम्या

नव्या वर्षात जी ट्वेंटीचा उत्साह नव्या उंचीवर नेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या शहाण्णवाव्या भागात बोलत होते. सरत्या वर्षात भारताला जी ट्वेंटी समूहाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातही साध्य केलेल्या उद्दीष्टांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मिळालेला दर्जा, २२० कोटी कोविड लसीकरणाचा विक्रमी टप्पा, ४०० अब्ज डॉलर निर्यातीचा टप्पा, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात मिळालेलं यश, आदींचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. हर घर तिरंगा मोहीम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला हॉकी संघाचा विजय, कर्करोगाच्या उपचारात योगाभ्यासाचा लाभ, नमामी गंगे योजना, यासोबतच पर्यावरण आणि स्वच्छता मोहिमेवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. पालघर परिसरात आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तुंमुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळत आहे, शिवाय त्यांच्या कौशल्याला ओळख प्राप्त होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मास्क घालणं आणि हात धुणं यासारख्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी उद्या देशभरात मॉक-ड्रील घेण्यात येणार आहे. ऑक्सिजन सपोर्ट आणि आयसीयू बेड, व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले बेड आणि इतर सुविधांबाबत आपण किती तत्पर आहोत याची सुनिश्चितितता या माध्यमातून केली जाणार आहे.

****

कोविड १९ चा `बीएफ 7` या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा `मन की बात` कार्यक्रम पवार यांनी काल पद्दुचेरीत नागरिकांबरोबर ऐकला, त्यानंतर त्या बोलत होत्या. नव्या विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्यानं प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, असं त्या म्हणाल्या. आतापर्यंत देशात या विषाणूचे चार रुग्ण आढळल्याचं त्यांनी सांगितलं. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसंच कोणतीही आणिबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असं डॉक्टर पवार म्हणाल्या.

****

उत्तरप्रदेशात आग्रा इथल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती २३ डिसेंबर रोजी चीनहून भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी एका खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता, त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीचं घर बंद केलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी तपास केला जात आहे.

****

राज्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे एकूण ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ८१ लाख ३६ हजार ४९७ झाली असून, सध्या १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात या संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या एक लाख ४८ हजार ४१५ झाली आहे. ओमायक्रॉनचा उप- व्हेरियंट बी. एफ. 7च्या प्रसारानंतर राज्यात या संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

****


देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी तीन लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी २१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९४ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी बूस्टर मात्रा घेतली आहे.

****

देशभरातल्या सर्व बँकांनी लॉकरधारकांच्या कराराचं नूतनीकरण करण्याचे निर्देश रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. यासाठी सर्व लॉकरधारकांना पात्रता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. एका निश्चित कालमर्यादेत या करारांचं नूतनीकरण करावं, असं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बँकेत स्ट्राँगरूमच्या प्रवेशद्वारावर तसंच परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, या कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग किमान १८० दिवस सांभाळून ठेवावं, असंही रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. लॉकरधारकाने लॉकरसंदर्भात काही तक्रार केल्यास, पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत हे रेकॉर्डिंग सांभाळून ठेवावं लागेल. दरोडा किंवा आग लागून नुकसान झाल्यास, लॉकरधारकाला नुकसान भरपाईच्या रुपात बँक शुल्काच्या शंभर पट रक्कम मिळू शकेल, नैसर्गिक आपत्तींसारख्या घटनेत मात्र बँकेची जबाबदारी नसेल, असंही याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.

****

राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून, गावं आणि शहरातल्या नागरिकांचा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद शहर आणि परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, या अभियानाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले...

Byte..

आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वच्छता महत्त्वाची असते आणि म्हणून स्वच्छतेला खूप मोठं प्राधान्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अगोदर पासून दिलेलं आहे. मुख्य म्हणजे आता ही चळवळ आपल्या श्री सदस्या पूरती मर्यादित राहिली नाही. इतरानांही त्यातून आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी आपण काही तरी चांगलं करावं ही प्रेरणा मिळते आहे. आता हजारो लोक इकडे आल्यानंतर त्याचा परिणाम इतर हजारो लोकांवर नक्की झाला पाहिजे त्या शिवाय राहणार नाही आणि हेच खऱ्या अर्थाने समाजासाठी आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल

 

 

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसंच परिसरात स्वच्छता मोहिम राबवल्याबद्दल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवडीबाबत आवाहन केलं.

दरम्यान, कालच्या या मोहिमेत शहराच्या विविध रस्त्यांसह पदपथ आणि चौकातील कचरा संकलित करण्यात आला. रस्त्याच्या कडेला उगवलेली झुडुपं तसंच गवतही काढण्यात आलं आणि नाल्यांचीही सफाई करण्यात आली. शहरात सुमारे ७४० टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं.

****

राज्यात अस्तित्वात असलेलं सरकार हे सर्वसामान्य लोकांचं सरकार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या आदिनाथ कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाची सुरुवात काल शिंदे यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. करमाळा तालुक्यातल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसह तालुक्यातले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी  यावेळी दिलं. राज्यात रखडलेल्या १८ प्रकल्पांना आपल्या सरकारने मंजूरी दिल्यामुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

वीर बाल दिवस आज पाळला जात आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जात आहे. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

****

नांदेड हे शक्तीस्थळ भक्तीसह विश्वशांतीचं केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देणार असल्याचं, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. काल नांदेड इथं वीर बाल दिवस आणि नांदेड महोत्सवाचं उद्घाटन लोढा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. साहिबजादा बाबा जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांनी देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिलं, तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिवस पाळण्याचा निर्णय घेतल्याचं लोढा यांनी सांगितलं.

दरम्यान, नांदेड जिल्हा पातळीवर पर्यटन विकासासंदर्भात अशासकीय सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश, लोढा यांनी दिले. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. रोजगार आणि स्वयंरोजागाराच्या संधी त्या-त्या पर्यटन तीर्थक्षेत्राच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात यादृष्टीने नियोजन सुरू असून, सुमारे पाच लाख युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.

****

महात्मा फुले कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत असून, भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे. सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं काल विविध शासकीय योजनांचं शिबिर घेण्यात आलं, त्यावेळी सावे बोलत होते. सकारात्मक विचार करून नागरिकांसाठी उपयोगी असणारे निर्णय घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

उस्मानाबाद इथं अटलजींच्या जयंतीदिनी लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. ग्रामविकासासाठी अविरत प्रयत्न करणारे लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या आनंदवाडी इथले ज्ञानोबा चामे, नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथले विश्वास उंदरे, आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या श्रीलेखा वझे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

दरम्यान, एका ताऱ्याचं नामकरण भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असं करण्यात आलं आहे. काल औरंगाबाद इथं झालेल्या एका विशेष कार्यक्रमात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अंतराळात एका ताऱ्याची जागतिक स्तरावर नोंद केली. भाजपचे औरंगाबाद शहाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी, तिचा सहकलाकार शिजान खान याला वसई न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वसई तालुक्यातल्या भजनलाल स्टुडिओत तुनीषानं परवा आत्महत्या केली. दोघांमधील प्रेमभंग झाल्यानं तुनीषानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

भारतानं बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना तीन गडी राखून जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला आहे. ढाका इथं सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं विजयासाठी आवश्यक १४५ धावा सात गडी गमावत पूर्ण केल्या. सात बाद ७४ धावा अशी बिकट अवस्था असताना, रविचंद्रन अश्विनच्या ४२ आणि श्रेयस अय्यरच्या २९ अशा  नाबाद ७१ धावांच्या भागीदारीमुळे भारताचा विजय झाला. रविचंद्रन अश्विन सामनावीर तर चेतेश्वर पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****


जनावरे चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीतल्या दोघांना काल औरंगाबाद इथं पोलिसांनी अटक केली. शहरातल्या छावणी परिसरातून ऑगस्ट महिन्यात केलेल्या जनावरांच्या चोरीचा तपास करतांना पोलिसांना इतर ११ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलं. आशिफ रमजान कुरेशी आणि शेख अब्दुल रहिम शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मात्र, इतर तीन आरोपी फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याची मागणी मराठा सेवा संघानं केली आहे. काल परभणी इथं झालेल्या महाधिवेशनात या मागणीसह विविध ठराव संमत करण्यात आले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल मतदान झालं. सहकारी सोसायटी मतदारसंघात ७२२ मतदारांपैकी ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघातल्या ७४० मतदारांपैकी ७२२ मतदारांनी, तर व्यापारी मतदारसंघातल्या ५६२ मतदारांपैकी ५५४ मतदारांनी मतदान केलं. मतमोजणी आज होणार आहे.

****

 


No comments: