Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ डिसेंबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनात आज महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचा मुद्दा गाजला. महाराष्ट्राची
एक इंचही जमिन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं.
याप्रकरणी
विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सरकारने सगळं काम बाजूला ठेऊन यावर
चर्चा केली पाहिजे, संपूर्ण राज्य सीमा वासियांच्या मागे ठाम उभं आहे ही भावना पोहोचली
पाहिजे, अशी मागणी त्यांनी लाऊन धरली. सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचलं, असा आरोप
त्यांनी केला. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका
घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान,
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं.
****
विधानपरिषदेत
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे, अनिल परब, सुनील शिंदे यांनी ९७ अन्वये
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, यावर अल्पकालीन चर्चेला सुरुवात झाली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश
हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. बेळगावच्या
महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने
बरखास्त केली. कर्नाटकात जाण्याचा ठराव मंजूर करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायत तरी
बरखास्त करणार का, असं प्रश्नही त्यांनी विचारला. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली.
****
अधिवेशनात
आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी
विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं.
****
आयसीआयसीआय
बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत
यांना अटक केली आहे. या प्रकरणात कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी
मोठी कारवाई केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
अनेक देशांमध्ये
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य यंत्रणा
किती सज्ज आहे, याचा सराव देशभरातल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये उद्या करण्यात येणार
आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये हा सराव
करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी
या सुविधा सर्व दृष्टिने सज्ज असल्याची खात्री करण्यासाठी हा सराव केला जाणार आहे.
या सरावामध्ये संबंधित अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उपलब्धता, खाटांची क्षमता, डॉक्टर्स,
परिचारक आणि निम-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ, अद्ययावत आणि मूलभूत
जीवनावश्यक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, चाचणी क्षमता आणि वैद्यकीय ऑक्सीजन यांची तयारी
पाहिली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत
सल्लामसलत करुन हा सर्व करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
कोविड
19च्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया भारतीय
वैद्यकीय महासंघासोबत आज एक बैठक घेणार आहेत. यापूर्वी मांडविया यांनी सर्व राज्यांच्या
आरोग्य मंत्र्यांची देखील बैठक घेतली होती.
****
‘वीर बाल
दिवस’ आज पाळला जात आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह
आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जात आहे.
नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला.
****
नांदेड जिल्ह्यात
श्रीक्षेत्र माळेगाव इथं सुरु असलेल्या यात्रेत काल कुस्त्यांची दंगल रंगली. राज्यातून
विविध विभागातून मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. कुस्ती दंगलीत प्रथम क्रमांकाची
कुस्ती लोहा तालुक्यातल्या किवळा इथले मल्ल अच्युत टरके यांनी जिंकत माळेगाव केशरीचा
बहुमान पटकावला. मानाचा फेटा, चांदीची गदा आणि ३१ हजार रोख रक्कम त्यांना देण्यात आली.
****
नांदेड इथं
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं भव्य लोककला महोत्सव आयोजित
करण्यात येणार असल्याची माहिती, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. काल माळेगाव
यात्रेतल्या लावणी महोत्सवाचं उद्घाटन चिखलीकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत
होते. माळेगाव यात्रेत लोककला महोत्सव आणि लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्हा परिषद
राज्यातली पहिली जिल्हा परिषद ठरली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment