Tuesday, 27 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 27.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  27 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      सीमा भागातली मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्धार करणारा ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर.

·      पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.

आणि

·      जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या वॉटर ग्रीड योजनेला मान्यता.

****

कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातल्या आठशे पासष्ट मराठी भाषिक गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच आहे, आणि सीमा भागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे सर्व ताकदीनिशी उभं आहे, असा ठराव आज विधानसभेत आणि त्या पाठोपाठ विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, बिदर, धारवाड, निपाणी, भालकी आणि कारवार या शहरांसह आठशे पासष्ट मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडताना व्यक्त केला. कर्नाटकच्या मराठीविरोधी भूमिका आणि वर्तनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले –

बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा आज निर्धारपूर्वक एक मताने पारित करीत आहे.

****

दोन्ही सभागृहात हा ठराव पारित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातल्या मराठी नागरिकांसाठी घेतलेल्या काही निर्णयांची घोषणा केली. या आठशे पासष्ट गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश केला असून, तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सीमा भागात मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्या मराठी संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करणार असून, याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मार्गिकेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, तेव्हा उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीनं प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत नव्यानं कामं समाविष्ट करण्यात आली आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यावर कडाडून आक्षेप घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांचं हे विधान निंदाजनक असल्याचं नमूद केलं. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मिटकरी यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत, त्यांना तारतम्य बाळगण्याची सूचना केली तसंच ते वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची सूचना केली. त्यावर मिटकरी यांनी या विधानाबाबत सदनात दिलगिरी व्यक्त केली.

****

आपल्या पक्षनेत्यांची तुलना महापुरुषांशी करणं, हा महापुरुषांचा अवमान होत नाही का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिदेत विचारला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापुरुषांचा अवमान प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस बोलत होते. देवदेवता, संत महात्मे तसंच महापुरुषांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य फडणवीस यांनी सदनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यामुळे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

राज्यातल्या गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खनन करण्याला आळा घालता यावा, यासाठी सरकार नवीन धोरण आणत असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विखे पाटील बोलत होते. येत्या पंधरा जानेवारीपर्यंत हे धोरण आणलं जाणार असून, यातून, अनधिकृत खनन रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या, सरळसेवा भरतीच्या एकूण चारशे तीस जाहिरातींसाठी दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा विचार करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

अनुसूचित जाती - जमाती तसंच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आज विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात आला. समता प्रतिष्ठान मधील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी यासह अनेक मागण्याही या इशारा मोर्चात करण्यात आल्या.

****

देशभरात गेल्या चोवीस तासात एकूण एकशे सत्तावन्न नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या कोविडचे तीन हजार चारशे एकवीसहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात एकोणपन्नास हजारांहून जास्त लोकांची कोविड चाचणी करण्यात आल्याची, तसंच देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोनशे वीस कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. २२ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. आज सकाळपासून देशभरात सुमारे ३३ हजारांहून जास्त नागरिकांचं लसीकरण झालं.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं नकार दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं या पीठाकडे केली होती, ती आज न्यायालयानं फेटाळून लावली. आता सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी काही सुनावणी झाली नाही तर देशमुख यांची उद्या कारागृहातून जामिनावर मुक्तता होऊ शकते.

****

जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या सुमारे एकशे चौतीस कोटी रुपये मूल्याच्या वॉटर ग्रीड अर्थात नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी, झाल्टा, गांधेली, गेवराई तांडा, तीसगाव, दौलताबाद, शरणापूर, केसापुरी, जटवाडा यासह पस्तीस गावांना नळानं पाणी पुरवठा करता येणार आहे.

****

जालना शहरातल्या नथुमल वासुदेव या कापड विक्रीच्या दुकानातील एक कोटी ७० लाख रुपये चोरणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून एक कोटी ६९ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दुकानात काम करणाऱ्या एका नोकरानेच रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी, दुकानातच थांबून तीन साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याचं तपासात समोर आलं आहे.

****

औरंगाबाद शहरात मध्यवर्ती उस्मानपुरा भागात आज पेट्रोल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. पाच हजार लिटर डिझेल घेऊन जाणाऱ्या या वाहनानं उस्मानपुऱ्यातल्या भारत पेट्रोल पंपानजिक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाच्या पद्मपुरा आणि सिडको केंद्रांच्या तीन गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवलं.

****

देशाचे पहिले कृषीमंत्री आणि विदर्भाचे शिक्षण शिल्पकार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर इथल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानात आज त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...