Thursday, 29 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 29.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  29 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      देशभरातून कुठूनही मतदानाची सुविधा देणाऱ्या रिमोट मतदान प्रक्रियेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी.

·      विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी लवकरच मान्य होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांकडून पुन्हा उपस्थित.

आणि

·      मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव-शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी केली आहे. यामुळे इतर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आपल्या राज्यात परतण्याची गरज आता राहणार नाही. देशभरातून कुठूनही आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगानं बहु-मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान-यंत्र निर्माण केलं असून, या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रातून बहात्तर मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या यंत्राच्या उपयोगाची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेला सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून, या पक्षांनी येत्या एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतच्या आपल्या सूचना मांडाव्यात, असं त्यांना सांगितलं आहे.

****

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी केंद्र सरकारकडे केली असून, ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सुरू केलेल्या ‘विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास’ या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठीच्या योजनांना सरकार चालना देत आहे, असं त्यांनी सांगितलं. मराठवाडा आणि विदर्भात सत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली असल्याची माहिती देत, यातून या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग हा आंतरराज्यीय होणार असून, राज्याच्या निधीतून तयार होणारा आणि इतक्या जिल्ह्यांना जोडणारा हा देशातला पहिला महामार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर गोवा औद्योगिक मार्गिकेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले –

नागपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर देखील आपण विकसित करतोय. मग त्यात मराठवाड्याला पण न्याय मिळणार आहे. आणि मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे जे काही आहेत, ते ही त्याच्यातून कव्हर होतायत. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टीक सपोर्ट देखील तयार होतील.

****

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चेत बोलताना, समृद्धी महामार्गावरील त्रुटींकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले –

अजून त्या समृद्‌धी महामार्गावर एकही चार्जिंग स्टेशन नाही, पेट्रोल पंप नाही, डिझेल पंप नाही. सुरवातीला नवीन होताना काही त्रुटी असतात, नंतर आपण अनुभवातनं त्या दुरूस्त करून घेत असतो. तर त्याही संदर्भामध्ये आपण पहा.

****

मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा अजित पवार यांनी आजही उपस्थित केला. महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची मागणी त्यांनी केली.

ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन त्यावेळेस माझी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधीत्व द्या अन् बाकीच्या पण जागा त्या ठिकाणी भरा. कुठल्या घ्यायच्यात त्या भरा.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार एक नवीन धोरण आखत असल्याची माहिती दिली. ऊर्जा योजनेसाठी केंद्रानं एकोणचाळीस हजार सहाशे दोनकोटी रुपये मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं.

विदर्भाच्या विकासासाठीच्या अनेक योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग आपण विदर्भात आणले, असं सांगत, पतंजलीचा नवा प्रकल्प जानेवारीत सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी सरकार मदत करणार असल्याचं, तसंच गुणवत्ताधारक ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट मदत पोचवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातले किमान तीस टक्के शेतकरी पूर्णपणे सौरऊर्जा वापराकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या योजनेला चालना देताना, सौर ऊर्जेसाठीचे फीडर बसवण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन किमान तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतली जाईल आणि त्यासाठी त्यांना दर हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये दिले जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. शिवाय या रकमेत सरकार दर वर्षी तीन टक्क्यांची वाढ करेल, तसंच जमिनीचे दर जास्त असलेल्या ठिकाणी रेडी रेकनर दरानुसार ही किंमत दिली जाईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकारचा पहिला पथदर्शी फीडर राळेगण सिद्धी इथं बसवण्यात आला असून, या गावातल्या ग्रामस्थांनी अजून एका सौर फीडरची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव असून, तो आता कर्नाटकाच्या मंत्र्यांकडून उघड होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानं महाराष्ट्राला काय दिलं, असा प्रश्न करत, या अधिवेशनात अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले, त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला. सहा महिन्यांपासून सरकारनं काय केलं, हे दिसून येत नाही, अशी टीका करत, नागपूरमध्ये झालेल्या या अधिवेशनात विदर्भासाठी एकही घोषणा झाली नाही, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधलं.

****

औरंगाबाद शहरातील पोलीस वसाहतींचा प्रश्न प्राधान्यक्रमानं मार्गी लावला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी पोलीस वसाहतींच्या दुरावस्थेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलं. याठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.

****

बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा भाजपा आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला. २३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं असून, विभागीय उपायुक्तांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. संबंधित या अधिकाऱ्याला निलंबित करणार का, असा प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.

****

हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील रहिवाशी सन १९५० पासून वास्तव्यास आहेत की अतिक्रमण झालेलं आहे, याची पडताळणी करण्यात येईल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. सदस्य संतोष बांगर यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. विकास आराखड्यात आरक्षण बदललं असेल तर संबंधितांचं पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.

****

लातूर शहराच्या नियोजित बाह्यवळण रस्तासाठी ९६० कोटी रूपये निधी उपलब्ध करून द्यावा, यासह जिल्ह्याच्या विकास कामाशी निगडित विविध मागण्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची आज देशमुख यांनी भेट घेऊन या मागण्या मांडल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरसकट सगळ्या दिव्यांगांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर, कुटुंबप्रमुख दिव्यांग असल्यास मिळकत करामध्ये मिळणारी पन्नास टक्के सूट, ही कुटुंबाचे प्रमुख नसलेल्या दिव्यांगांनाही मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीनं केली होती, त्यानंतर, ही अट शिथील करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.

****

No comments: