आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशभरातल्या
रुग्णालयांमध्ये कोविड विषयक आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेचा सराव आज घेण्यात येणार
आहे. यावेळी मुख्यतः प्राणवायूची उपलब्धता, व्हेंटीलेटर्ससह अन्य वैद्यकीय सामग्री
आणि वैद्यकीय-निमवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येईल.
****
महाराष्ट्र
- कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधिमंडळात ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. विधीमंडळात
या संदर्भात ठराव मांडायचा असं सर्वानुमते ठरलं होतं, मात्र अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
सुरू झाला, तरी हा ठराव मांडलेला नाही, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल
लक्ष वेधलं, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठराव मांडणार असल्याचं
सांगितलं होतं.
****
आयुष्मान भारत
आरोग्य खात्या अंतर्गत ओळखपत्र तयार करण्यात देशाने ३० कोटींचा टप्पा पार केला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी त्यांच्या ट्विट संदेशात ही
माहिती दिली. आयुष्मान भारत डिजिटल मिशन तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून नागरिकांच्या
जीवनातल्या सुलभतेत लक्षणीय वाढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारतीय तटरक्षक
दल आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहा पाकिस्तानी नागरिकांसह एक बोट जप्त
करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दारू गोळा, शस्त्रास्त्रे आणि ४० किलो अंमलीपदार्थ
हस्तगत करण्यात आले. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. २५ आणि २६ डिसेंबरच्या रात्री
ही कारवाई करण्यात आली.
****
गडचिरोली पोलिसांनी
एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. वत्ते उर्फ प्रदीप वंजा वड्डे असं या नक्षलवाद्याचं
नाव असून, त्याच्यावर तीन पोलिसांसह आठ जणांची हत्या, तीन चकमकी, एक दरोडा, असे १३
गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
या वर्षभरात आतापर्यंत ६० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण
केलं आहे.
****
महिला राष्ट्रीय
बॉक्सिंग २०२२ या स्पर्धेत रेल्वेचा संघ सर्वोत्कृष्ठ ठरला असून यजमान मध्य प्रदेशचा
संघ उपविजेता घोषित झाला आहे. ५० किलो वजनी गटात निखत जरीनने, तर ५७ किलो वजनी गटात
हरियाणाच्या मनीषाने अंतिम सामना जिंकला.
****
No comments:
Post a Comment