Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ डिसेंबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यासह
देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी
नागरिक मोठ्या उत्साहानं तयारी करत असल्याचं, आणि त्याकरता पर्यटन स्थळी जात असल्याचं
चित्र जागोजागी दिसत आहे. मात्र या उत्साहाला कोणतंही गालबोट लागू नये, तसंच नागरिकांची
कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासनानंही खबरदारी घेतली आहे. औरंगाबाद इथं सायंकाळी
साडे सहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे पावणे सहाशे पोलिस बंदोबस्तावर तैनात
असतील. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात
येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची
परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातल्या
देवस्थानांच्या ठिकाणी देखील सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी
नगरीकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं
महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी
गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात
आली आहे.
शिर्डीत
आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी
राज्यासह देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता
यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे.
****
भीमा - कोरेगाव
इथं उद्या एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर
पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उद्या रात्री १२
वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश,
पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार
मगर यांनी जारी केले आहेत. वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी बसेसची सुविधा
उपलब्ध करून दिली आहे.
****
देशात एक
लाख ५० हजार आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता
केंद्रे कार्यरत झाली आहेत. ही कामगिरी निर्धारित तारखेपूर्वीच साध्य करण्यासाठी देशाने
केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आणि ही केंद्रे देशभरातल्या
सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध करण्यात आणि त्यांचा लाभ देण्यात
मोलाची भूमिका बजावतील, असं सांगितलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.
मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल देशाचं अभिनंदन केलं आणि निर्धारित केलेले हे
लक्ष्य भारताने साध्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
****
देशात काल
कोरोना विषाणूचे नवे २२६ रुग्ण आढळले, तर १७९ रुग्ण बरे झाले. काल देशात या आजाराने
एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. देशात सध्या तीन हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान,
काल ९१ हजार ७३२ नागरीकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. देशात आतापर्यंत लसीच्या
२२० कोटी दहा लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
चीननं आपलं
शून्य-कोविड धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड
चाचणी बंधनकारक करणाऱ्यांमध्ये आता फ्रान्स, स्पेन, दक्षिण कोरिया आणि इस्रायल हे देशही
सामील झाले आहेत.
****
खेलो इंडिया
२०२२ युवक युवती क्रीडा स्पर्धेअंतर्गत हॉकीमध्ये, पुरुष गटात मध्य प्रदेशनं ओडिशाचा
सहा - पाच असा पराभव करून पात्रता स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मध्य प्रदेश, ओडिशा,
हरियाणा आणि झारखंड पुढील वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी
पात्र ठरले आहेत. हरियाणाच्या महिला संघानं काल भुवनेश्वर इथं झालेल्या अंतिम सामन्यात
मध्य प्रदेशचा दोन - शून्य असा पराभव करून पात्रता फेरी जिंकली.
****
महाराष्ट्र
राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना येत्या दोन जानेवारीपासून पुण्यात बालेवाडी इथल्या
शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राज्यात क्रीडा
वातावरण निर्मिती होण्यासाठी, तसंच या स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी
राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत फेरीचं आयोजन करण्यात येत आहे. काल मुंबईत क्रीडा ज्योत फेरी आयोजित करण्यात
आली होती. या फेरीचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया इथून मुंबईचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर
कल्याण पांढरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर या क्रीडा ज्योतीचं काल नवी मुंबईत महानगरपालिका
मुख्यालयात आगमन झालं. महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड यांनी या क्रीडा ज्योतीचं स्वागत केलं.
****
औरंगाबाद
इथल्या देवगिरी महाविद्यालयात उद्या एक जानेवारीला संशोधन विकास या विषयावर उद्बोधन
शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी
जिल्यातील सुमारे ३०० प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment