Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत कोणत्याही चर्चेविना
एकमताने मंजूर.
·
मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही-राज्य सरकारची स्पष्ट
भूमिका.
·
टीईटी घोटाळ्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग; उपमुख्यमंत्र्यांकडून
उच्चस्तरीय चौकशीचं आश्वासन.
आणि
·
माजी मंत्री अनिल देशमुख यांची कारागृहातून जामिनावर सुटका.
****
“महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त
विधेयक आज विधानसभेत कोणत्याही चर्चेविना आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या अनुपस्थितीत
एकमताने मंजूर करण्यात आलं. या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी
यांच्या भ्रष्टाचाराच्या घटनेवर लोकायुक्त थेट कारवाई करू शकणार आहेत. कायद्याचा गैरवापर
होऊ नये, यासाठी केंद्रीय लोकायुक्त कायद्याप्रमाणेच निकष ठरवण्यात आले आहेत. या कायद्याअंतर्गत
आमदारांच्या संदर्भात अध्यक्षांना आणि मंत्र्यांच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार
देण्यात आले आहेत. हे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सभागृहाचे आभार मानले. तसंच लोकपाल कायद्यासारखे लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं
महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
मुंबई
ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका
राज्य सरकारनं घेतली आहे. कर्नाटक राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याने मुंबई केंद्रशासित
प्रदेश करण्यासंदर्भात केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत
राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले –
कर्नाटक
सरकारने तिथले कोणी मंत्री आहेत, त्यांनी कालच काहीतरी मुंबई हे केंद्रशासीत करा म्हणून
अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. त्याचा निषेध सगळ्यांनीच केलाय. मीही या ठिकाणी सभागृहाच्या
वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो. आणि अशा प्रकारचं वक्तव्य
जे करतायेत, त्यांना त्या राज्याच्या प्रमुखांनी देखील समज दिली पाहिजे, कारवाई केली
पाहिजे. आणि मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही, मुंबई आपल्या महाराष्ट्राची आहे. आणि
अशा प्रकारचं भाष्य करणं, अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करणं हे कोणालाही न परवडणारं
आहे.
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत भूमिका मांडली. अशा प्रकारच्या वक्तव्याचा निषेध
करणारं पत्र कर्नाटक सरकारला पाठवलं जाईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले
–
मुंबईवर
दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल त्याचा निषेध आम्ही याठिकाणी करतो.
तशा प्रकारचं निषेधाचं पत्र आम्ही त्यांना पाठवू. त्यांनी अशा प्रकारे जे काही गृहमंत्र्यांसमोर
ठरलं आहे, त्याचं उल्लंघन करणं हे दोन राज्यांच्या बायलॅटरल रिलेशनकरता योग्य नाही.
हे त्यांना अतिशय कडक शब्दात सांगण्यात येईल. आणि यासोबतच माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्यादेखील
निदर्शनास आणून देण्यात येईल.
****
टीईटी
घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांचा प्रश्न मांडण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी नकार दिला. मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असून, सरकार त्यांना
पाठिशी घालत आहे, त्यांच्यावर काही कारवाई करत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग
केला. दरम्यान, टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी केला. मागील सरकारच्या काळात जो टीईटी घोटाळा झाला, त्यात अपात्र कंपन्या
पात्र करण्यात आल्या, याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
गायरान
भूखंड वाटप प्रकरणात झालेले आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी फेटाळून लावले आहेत.
आपण सद्सद्विवेक बुद्धीने हा निर्णय दिला, असं सत्तार यांनी विधानसभेत सांगितलं.
ते म्हणाले –
साकल्याने,
सहानुभूतीपूर्वक विचार करून मी सद्सद्विवेकबुद्धीने याप्रकरणी न्याय निवाडा दिला
आहे. यामध्ये कोणताही हेतूपुरस्सर निर्णय घेतलेला नाही. माझ्या आदेशाच्या पूर्वस्थितीत
अर्जनियमन देखील कायम करण्यात आलेलं आहे. त्यात कोणत्याही संस्थेचं हित निर्माण झालेलं
नाही. तसेच माझ्या आदेशामुळे आजपर्यंत कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. शासनाचं
कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही ही बाब दिसून येते.
दुसरीकडे
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यावर एक हजार
कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राज्यभरात औद्योगिक भूखंड रुपांतर
प्रकरणात हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले –
सुभाष
देसाई साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडचा कन्व्हर्जन त्यांनी केलेला
आहे, मागचा त्यांचा जो काळ होता आणि विशेषतः जाता जाता त्यांच्या दोन वर्षामध्ये ते
संपूर्ण महाराष्ट्राच्या आपण आकडा काढला तर रफली ते एक हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार
होऊ शकतो जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये.
****
शालेय
पोषण आहार योजनेबद्दल असलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा
केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात लवकरच शिक्षक पदभरती प्रकिया सुरू करण्यात येणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना अहमदाबाद इथं
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी आज रुग्णालयात त्यांची भेट घेतली.
हिराबा यांनी यंदा १८ जूनला शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. दरम्यान, काँग्रेस
नेते, खासदार राहुल गांधी यांनी हिराबा यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पार्थना करत
असल्याचं, ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
माजी
मंत्री अनिल देशमुख यांची आज कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. सुमारे चौदा
महिन्यांपासून ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात होते. केंद्रीय अन्वेषण विभाग
सीबीआयनं त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन
पीठाने सीबीआयची मागणी नाकारल्याने देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. देशमुख
यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित
पवार, सुप्रिया सुळे आदी ज्येष्ठ नेते, देशमुख यांच कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ऑर्थररोड कारागृहासमोर गर्दी केली होती.
****
राज्यातील
साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून
साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार ॲपमध्ये गेल्या दोन
वर्षातील माहिती संकलित केली आहे. महाराष्ट्रात २००४ ते २०२० पर्यंत सुमारे ४० कोटी
रुपयांची फसवणूक मुकादमाकडून झाल्याची माहिती ॲपद्वारे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर
साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत येत्या ९ तारखेला बैठक घेण्यात
येईल असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता सखाराम पानझडे यांच्या विविध गैरकारभार प्रकरणी प्रधान
सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी
विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य प्रशांत बंब यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित
केली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
****
राज्य
परिवहन महामंडळाकरिता नवीन बसेस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये
महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस
घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित
असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
****
अहमदनगर
जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याबाबत जिल्ह्याची माहिती आल्यानंतर
केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी विधान
परिषदेत सांगितलं. सदस्य गोपीचंद पडळकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
****
पीकविम्यासह
सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे
आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. कृषीमंत्री हे मराठवाड्यातील
असल्याने त्यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,
अशी मागणी पाटील यांनी केली.
****
No comments:
Post a Comment