Saturday, 31 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप;अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत

·      अधिवेशन यशस्वी आणि फलद्रूप झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा;विरोधकांकडून मात्र नाराजी व्यक्त

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसंच सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

·      तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ

·      औरंगाबाद रोटेगाव रेल्वे मार्गावर वीजेच्या रेल्वेची चाचणी यशस्वी

आणि

·      नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक;प्रशासनाचा चोख बंदोबस्त

 

सविस्तर बातम्या

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ पासून मुंबईत सुरू होणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशन काळात विधानसभा तसंच विधान परिषदेत प्रत्येकी दहा बैठका झाल्या. यात विधानसभेत एकूण ८४ तास १० मिनिटं कामकाज झालं. १२ विधेयकं आणि दोन शासकीय ठराव मंजूर झाले, २९३ अन्वये तीन सूचनांवर तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

विधान परिषदेत सुमारे बावन्न तास ३५ मिनिटं कामकाज झालं, तर सुमारे सव्वा पाच तासांचा वेळ वाया गेल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली. अधिवेशन काळात पाच अध्यादेश, ३८ तारांकित प्रश्नांना उत्तरं देण्यात आली तर तीन विधेयकं संमत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****


आपलं सरकार कार्यकाळ पूर्ण करेलच शिवाय बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती पुढच्या निवडणुकीतही विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधानसभेत हिवाळी अधिवेशनाचा समारोप करताना अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. आपल्या शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. आपल्या सरकारला सहा महिने पूर्ण झाले, या सहा महिन्यात सरकारनं घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विरोधी पक्षांकडूनच महापुरुषांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी पुराव्यांसह केला. भ्रष्टाचाराचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.  

****

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार असून, त्या माध्यमातून दोषींवर कडक कारवाही केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. दारिद्र्यरेषेच्या वरच्या APL शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ देण्याऐवजी थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना सहा हजार १९५ कोटींची नुकसान भरपाई दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

****

दरम्यान, अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेऊ शकलो, त्यामुळे हे अधिवेशन अतिशय यशस्वी आणि फलद्रूप झाल्याचं सांगितलं. अधिवेशनामधून विदर्भाला मोठ्या प्रमाणावर दिलासा आणि न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी १५ हजार रुपये बोनस थेट जमा होणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, इतर निर्णयांची माहिती दिली. नागपूरच्या अधिवेशनात विदर्भाला प्राधान्य असतं, या अधिवेशनात निश्चितच विदर्भाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

****

महापुरुषांच्या अवमानना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचं कामकाज संपल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने लोकसहभागातून कार्यक्रम घ्यावेत, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हा संग्राम पोहोचवावा, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेतही सरकारवर टीका करण्यात आली. अब्दुल सत्तार यांचा भूखंड घोटाळा, एनआयटी भूखंड घोटाळा यावर सत्ताधाऱ्यांना उत्तर देता आलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी जाणारी रक्कम ही तुटपुंजी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

राज्यातल्या इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबवण्याचा प्रस्ताव असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली.

****

अल्पसंख्याक समाजाचं शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला असून, याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारल्या जातील, असं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधली पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही, त्यांनी दिली. शिक्षकांचा पगार ऑनलाईन पद्धतीनं पगार थेट बँकेत जमा करण्याची पद्धत राज्य शासन सुरू करणार असून, पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असंही केसरकर यांनी सांगितलं.

****

शालेय शिक्षण पोषण आहारातलं ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचं प्रलंबित अनुदान सरकारनं त्वरित द्यावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल सभागृहात केली. यावर, संबंधित कंत्राटदारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची परवानगी दिली असून, प्रलंबित अनुदान लवकरच वितरित होईल, असं केसरकर यांनी सांगितलं.

****

बेरोजगार तरुणांना नोकरीची प्रलोभनं दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयांवर अंकुश ठेवण्यासाठी, नियमावली तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. नोकरीच्या आमिषानं देशाबाहेर नेलेल्या तरुणांना परत आणण्यासाठी केंद्र शासनानं स्वतंत्र कक्ष तयार केलेला असून, राज्यातल्या अशा प्रकारच्या तक्रारी त्या कक्षाच्या माध्यमातून सोडवण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

विधवांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. या कुप्रथांच्या परिणामांबाबत येत्या एकतीस मे रोजी महिला विशेष ग्रामसभा घेतली जाईल, तसंच याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****


कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनानं घेतली असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल विधानसभेत दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, तरीही याप्रकरणी फेरचौकशी करण्यात येईल आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

परभणी जिल्ह्यात सोयाबीन पिकाकरता आठ महसूल मंडळांमध्ये, ७३ हजार ८१४ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाईपोटी, ४० कोटी ७१ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत, त्यापैकी ७२ हजार ५७६ शेतकरी लाभार्थ्यांना, ४० कोटी नऊ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेचंही लवकरात लवकर वाटप केलं जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत दिली. डॉक्टर राहुल पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर धाक बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून, बी-बियाणे आणि खतांची गोदामं तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती  शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत दिली. बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना तत्काळ दिल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निकालाचं एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान सभेत सांगितलं. सदस्य प्रकाश सोळंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. परीक्षा आणि निकालामध्ये एकसूत्रता नसल्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख बदलत जाते. मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, जून अखेर निकाल जाहीर करावा आणि एक ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना सगळ्या महाविद्यालयांना देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी गांधीनगर इथं अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी आईंच्या पार्थिव देहाला मुखाग्नी दिला.

****

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून देहरादून इथं जाताना हम्मदपूरजवळ काल पहाटे हा अपघात झाला. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देहरादून इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं १० वी आणि १२ वीच्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार दहावीच्या लेखी परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च दरम्यान, तर बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान घेण्याचं मंडळाचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या maha hsc board.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचं तपशीलवार वेळापत्रक मंडळानं जाहीर केलं असून ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना जेईईसह स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाची दखल घेण्यात आली असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलं आहे. ते काल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

बीड जिल्हयात या निवडणुकीची आचारसंहिता तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्याची सूचना, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संबंधितांना दिली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठीही अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

****

तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला काल घटस्थापनेनं सुरुवात झाली. सात दिवसांची मंचकी निद्रा संपवून काल पहाटे देवी सिंहासनारुढ झाली, त्यानंतर मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात दररोज रात्री छबिना, मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातलं प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारीला होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


औरंगाबाद रोटेगाव रेल्वे मार्गावर वीजेच्या रेल्वेची चाचणी यशस्वी झाली आहे. काल सायंकाळी साडे सात वाजता रोटेगावहून निघालेली ही दहा डब्यांची रेल्वे गाडी अर्ध्या तासात आठ वाजेच्या सुमारास औरंगाबादला पोहोचली. औरंगाबाद स्थानकावर या गाडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

****

आज ३१ डिसेंबर. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहानं तयारी करत असल्याचं, आणि त्याकरता पर्यटन स्थळी जात असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे. मात्र या उत्साहाला कोणतंही गालबोट लागू नये, तसंच नागरिकांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासनानंही खबरदारी घेतली आहे. औरंगाबाद इथं सायंकाळी साडे सहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे पावणे सहाशे पोलिस बंदोबस्तावर तैनात असतील. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथं होणाऱ्या जी - 20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं रस्त्याचं काम पूर्ण करावं, या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात सध्या रबी पिकं वाढीच्या अवस्थेत असून शेतकरी पिकांना खताची मात्रा देत आहेत, जिल्ह्यात खताचा पुरवठा पुरेसा असून, कोणीही जास्त दरानं खतं खरेदी करू नयेत, असं आवाहन हिंगोलीच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

No comments: