Tuesday, 27 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 27 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      जगभरात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज आरोग्य यंत्रणेची सराव चाचणी

·      देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक-पहिल्या वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन;देशभरात वीर बाल दिवस साजरा

·      महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा

·      खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची   घोषणा 

·      पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबाद इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेला प्रथम पारितोषिक

आणि

·      कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक

 

सविस्तर बातम्या

जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, यासाठी आज देशभरात सराव चाचणी करण्यात येणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये हा सराव करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. या सरावामध्ये संबंधित अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उपलब्धता, खाटांची क्षमता, डॉक्टर्स, परिचारक आणि निम-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ, अद्ययावत आणि मूलभूत जीवनावश्यक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, चाचणी क्षमता आणि वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता यांची तयारी पाहिली जाणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करुन हा सराव करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.

****

देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत पहिल्या वीर बाल दिवस सोहळ्यात ते बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, २६ डिसेंबर हा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले...

 

साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो किससे से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले...

क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे वीर बालक दिवसानिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आलं. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी शीख समाजाचे बलिदान या विषयावर मार्गदर्शन केलं.

साहिबजादे यांच्या धैर्य, साहस, बलिदानाचं स्मरण करत नांदेड शहरातून काल शोभायात्रा काढण्यात आली. साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण करुन देणाऱ्या देखाव्यासह, अनेक देखावे तसंच संत नामदेवांची वेशभुषा केलेले विद्यार्थी  यावेळी लक्ष वेधून घेत होते. शहरातील सुमारे ६५ शाळांच्या पाच हजारावर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शालेय स्तरावर निबंध स्पर्धा तसंच वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली.

 

औरंगाबाद शहरात चार ठिकाणी भव्य एलईडी वॉलवर हिस्ट्री ऑफ चार साहिबजादे हा लघुपट दाखवण्यात आला. सिंधी कॉलनी इथल्या गुरुद्वाऱ्यात कीर्तनाच्या माध्यमातून ही शौर्य गाथा सांगण्यात आली.

****

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनात गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटकव्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले...

 

हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कन्नड सरकार कर्नाटक सरकार,तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?

 

विधानसभेतही या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी केली. ते म्हणाले...

 

उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहोत. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीत असल्यामुळे काल हा ठराव मांडता आला नाही, आज हा प्रस्ताव मांडणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 

आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांचावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचंय ते सगळं करू मुळात हे खरंय की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं आज तो आणण्याचा निर्णय होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार कडनं निमंत्रण आलं. त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्या मुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ तसुभरही  तसुभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो

 

अधिवेशनात काल कामकाज सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं. 

****

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही काल विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात नियम २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्यात आलं आहे, मात्र अजूनही या निर्णयावर अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणी येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. सिंधुदूर्ग विमानतळाच्या अनुषंगानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

****

राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

****

ग्रामविकास विभागातली १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरू केल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधान परिषदेत केली. गेल्या पाच वर्षात या तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहेत. आमदार सतीश चव्हाण यांनी या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

****

महाराष्ट्रीय कलोपासक तर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेनं प्रथम पारितोषिक मिळवलं. अभिनय नैपुण्य स्त्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कारही याच एकांकिकेला मिळाले. काल पुण्यात हे पारितोषित वितरण करण्यात आलं.

****

आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. या तिघांनाही सीबीआय न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अर्पित जैन आणि अनिल विश्वकर्मा अशी या आरोपींची नावं असून, त्यांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली. या दोघांनी मूर्तीचे तुकडे मध्यप्रदेशात भोपाळ इथं एका सराफाला विकल्याचं तपासात समोर आलं. त्यांच्याकडून मूर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजू नवघरे यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १३ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनलला ४ जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्री.राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात सेलू इथं दोन दिवस सुरु असलेल्या संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

****

लातूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव हा रखडलेला रस्ता तयार करावा, या मागणीसाठी काल १३ गावांतील नागरिकांनी टाळ, मृदंग आणि हलगीच्या निनादात रास्तारोको आंदोलन केलं. यासंदर्भात येत्या शुक्रवारी बैठक घेण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं .

****

बालविवाह मुक्त परभणी, ही मोहीम जिल्ह्यात सामाजिक चळवळ म्हणून राबवण्यात येणार असून, यामध्ये सर्वांनी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. काल यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या जनजागृतीसाठी ग्राम पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, या समितीच्या नोंदीनुसार तालुका पातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर समिती स्थापन करणार असल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितलं.

****

फिर्यादीसोबत तडजोड करून देण्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपये लाच मागणारा पोलिस नाईक आणि पोलिस पाटील या दोघांना काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. विजय पवार आणि गुलाब चव्हाण अशी या दोघांची नावं आहेत.

****

हिंगोली नगर परिषदेनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेतलेल्या भित्तीचित्र स्पर्धेत कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातले कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांचा प्रथम क्रमांक आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते त्यांना सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

No comments: