Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ डिसेंबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाचा ठराव विधानसभेत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मांडला.
तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या ठरावाच्या
मसुद्यावर आक्षेप घेत चर्चेची मागणी केली होती. मात्र हा ठराव एकमताने मंजूर करण्याचं
यापूर्वीच ठरलं होतं, त्यामुळे चर्चा घेतली जाणार नसल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी सांगितलं. या ठरावातल्या व्याकरणासह इतर चुका असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधलं.
त्या चुका दूर केल्या जाती, न्यायालयीन कारवाईत देखील या ठरावावर आक्षेप
घेतला जाणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात
आलेलं पाणी औद्योगिक विकास महामंडळानं विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावं, यासाठी आवश्यक सूचना
देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
यामुळे धरणातलं पाणी शिल्लक राहून ते पिण्याच्या वाढत्या गरजेसाठी वापरण्यात येईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन
मराठा आरक्षित मात्र न्यायलायाच्या निर्णयामुळे नियुक्त होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना
आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात नियुक्त्या दिल्या जातील, अशी ग्वाही फडणवीस
यांनी दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.
जालना जिल्ह्यातले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांना
निलंबित करत असल्याची घोषणा, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत
केली. भ्रष्टाचार आणि महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तणूक या मुद्यावरून ही कारवाई करण्यात
आली असून, दोन वर्ष संबधीत अधिकाऱ्याची चौकशी सुरु होती. तत्कालीन सरकारने
त्यांना पाठीशी घातलं, असा आरोपही सावंत यांनी केला.
राज्यातले गडकिल्ले, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी
येत्या तीन वर्षात एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असं सांस्कृतिक कार्य
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितलं.
शेतकऱ्यांचं विविध प्रकारचं होणारं नुकसान मोजण्यासाठी एक ॲप
विकसित करून ई- पंचनामे करण्याची प्रणाली विकसित केली जात असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई
यांनी सांगितलं.
****
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र मुंबईतल्या
विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात उभारण्यात येणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येत्या २३ जानेवारीला
या तैलचित्राचं अनावरण होणार असल्याचं ते म्हणाले.
****
विधीमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरु होण्याआधी सरकारची धोरणं
आणि काही मंत्र्यांच्या कथित गैरव्यवहारांच्या विरोधात, विधान भवनाच्या परिसरात
विरोधकांनी गजर आंदोलन केलं.
****
देशभरातल्या रुग्णालयांमध्ये कोविड विषयक आपत्कालीन यंत्रणेच्या
सज्जतेचा सराव आज घेण्यात येत आहे. यावेळी मुख्यतः प्राणवायूची उपलब्धता, व्हेंटीलेटर्ससह
अन्य वैद्यकीय सामग्री आणि वैद्यकीय-निमवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा
आढावा घेतला जात आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि तज्ञांनी अचूक माहिती देऊन कोविड विरुद्धच्या
लढ्यात सामील व्हावं, असं आवाहन, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया
यांनी केलं आहे.
दरम्यान, मांडविया यांनी आज सकाळी दिल्लीतल्या सफदरजंग
रुग्णालयात यंत्रणेचा आढावा घेतला. कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातली आरोग्य
यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी यांनतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
डेटा ही जगातली अतिशय मौल्यवान गोष्ट असून, योग्यरितीने धोरण
आखण्यासाठी ती अत्यावश्यक आहे, असं भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत
यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी हे मत व्यक्त केलं. भारताच्या
जी 20 अध्यक्षतेच्या काळात डेटा साठवण्याची आणि एकमेकांसोबत शेअर
करण्याची यंत्रणा अद्ययावत करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र
गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल काल जाहीर झाला. मुख्य
परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारानं आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन
भरणं आवश्यक असल्याचं आयोगानं सांगितलं.
****
उत्तरेकडच्या
राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, गुरुवारपर्यंत ती कायम राहील असा इशारा हवामान विभागानं
दिला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, आणि उत्तर प्रदेशात पुढचे दोन दिवस दाट धुकं असेल
असं हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहोपात्रा यांनी सांगितलं.
राज्यात विदर्भ
आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात काही
ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यात हवामान
कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
**** ****
No comments:
Post a Comment