Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत नागरिकांच्या
औषधांच्या खर्चात सुमारे १८ हजार कोटी रुपयांची बचत.
·
टपाल कार्यालयातल्या विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरात
उद्यापासून वाढ.
·
औरंगाबाद पासपोर्ट सेवा केंद्र आता कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये
अपग्रेड होणार.
आणि
·
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र
उत्साह.
****
प्रधानमंत्री
जनऔषधी योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत नागरिकांच्या औषधांच्या खर्चात सुमारे १८ हजार
कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय खतं आणि रसायन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात
आली. चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत नागरिकांनी ७५८ कोटी रुपयांची औषधं खरेदी
केली, त्यातही नागरिकांची सुमारे साडे चार हजार कोटी रुपये बचत झाल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. देशभरातल्या ७४३ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक जनऔषधी
केंद्र सुरू करण्यात आले असून, २०२५ पर्यंत ही संख्या साडे दहा हजारावर नेण्याचं उद्दीष्ट
असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
‘गोटपॉक्स’
आणि ‘लंपी प्रोव्हॅक’ या लंपी प्रतिबंधक लसींचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी केंद्रीय
मत्स्यसाठे, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रुपाला, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर इथं सामंजस्य करार
करण्यात आला. पुण्यातल्या ‘आयव्हीबीपी आणि उत्तर प्रदेशातील ‘आयसीएआर’यांच्यात हा करार
करण्यात आला. ‘लंपी प्रोव्हॅक’ लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी भारत सरकारच्या एग्रिनोवेट
इंडिया लिमिटेड कंपनीने सामंजस्य कराराद्वारे आयव्हीबीपीला ठराविक अधिकार दिले आहेत.
****
कॅथलिक
चर्चचे माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचं आज दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. ते ९५ वर्षांचे
होते. २००५ मध्ये तत्कालीन पोप जॉन पॉल यांच्या निधनानंतर बेनेडिक्ट यांची पोप पदी
निवड झाली होती. आठ वर्षे या पदावर राहिल्यानंतर त्यांनी आजारपणामुळे पदाचा राजीनामा
दिला होता. ६०० वर्षांच्या इतिहासात पदाचा राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे पहिलेच पोप
होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप बेनेडिक्ट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
आहे.
****
चीनने
आठ जानेवारीपासून आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या करणार असल्याचं म्हटलं आहे. कोविडची
वाढती प्रकरणं असूनही प्रवासी निर्बंध कमी करण्याच्या चीनच्या निर्णयानंतर भारतासह
अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. चीन
मधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याच्या अनेक देशांच्या निर्णयाचं जागतिक आरोग्य
संघटनेनं समर्थन केलं आहे. संघटनेनं चीन सरकारला कोविड संदर्भात खरी परिस्थिती स्पष्ट
करण्यास सांगितलं आहे.
****
कृषी
आणि प्रक्रिया-युक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्कयांनी
वाढ झाली असल्याचं वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालकांनी दिलेल्या अंदाजित
आकडेवारीनुसार सांगण्यात आलं आहे. प्रक्रिया युक्त फळे आणि भाज्यांनी ३२ पूर्णांक साठ
टक्के वाढ नोंदवली, तर ताज्या फळांनी मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत चार
टक्के वाढ नोंदवली. चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत डाळींच्या निर्यातीत नव्वद
पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकी वाढ झाली आहे.
****
चालू
आर्थिक वर्षात उद्यापासून सुरू होत असलेल्या अखेरच्या तिमाहीपासून केंद्र सरकारने टपाल
कार्यालयातल्या विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात वाढ केली आहे. पाच वर्ष मुदतीच्या
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवरून ७ टक्के तर,
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरही ७ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांवरून ८ टक्के इतका
झाला आहे. मासिक उत्पन्न बचत खात्यावरील व्याजदार आता ७ पूर्णांक १ दशांश टक्के इतका
करण्यात आला आहे. यासोबतच किसान विकास पत्रासाठीही आता १२० महिन्यांच्या मुदतीसह ७
पूर्णांक २ दशांश टक्के असा वाढीव दर लागू करण्यात आला आहे. याचप्रमाणे एक वर्ष मुदतीच्या
अल्पबचत ठेवींसाठीचा व्याजदरही ५ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवरून ६ पूर्णांक ६ दशांश
टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी
खाते आणि बचत ठेवींवरच्या व्याजदरात कोणतेही बदल केले नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट
केलं आहे.
****
नागरिकांनी
आपला आधार कार्ड क्रमांक कोणालाही सांगू अथवा देऊ नये, तसंच सार्वजनिकरीत्या तो जाहीर
करू नये, तसंच कोणत्याही समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देऊ नये, असा सल्ला, विशिष्ट
ओळख प्राधिकरणानं दिला आहे. आधार कार्ड धारकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेला आपला ओ
टी पी देऊ नये, त्याचप्रमाणे एम आधार पिन कोणालाही देणं टाळावं, असं आवाहन, इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं केलं आहे.
****
विधीमंडळ
हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल
केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापूर इथं आज निदर्शनं
करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करून पवारांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर आणि सरचिटणीस हेमंत
आराध्ये यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त
केला.
****
औरंगाबाद
इथलं पासपोर्ट सेवा केंद्र आता कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड होणार आहे. प्रादेशिक
पासपोर्ट अधिकारी डॉ.राजेश गवांडे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला दिलेल्या
उत्तरात ही माहिती दिली. या प्रक्रियेला आणखी गती देण्यात येणार असल्याचं डॉ गवांडे
यांनी या पत्रातून कळवलं आहे. हा बदल झाल्यानंतर औरंगाबाद इथून दररोज ८० ऐवजी किमान
२०० नागरिकांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील
यांनी दिली.
****
आजच्या
सूर्यास्तासह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरात नागरिकांमधून उत्साह दिसून येत
आहे. नववर्ष आगमनाच्या शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलिया
खंडात न्यूझीलंड इथं नागरिकांनी नवीन वर्षाचं नयनरम्य रोषणाई तसंच आतषबाजी करून जल्लोषात
स्वागत केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आनंद, ध्येय, प्रेरणा
आणि मोठे यश घेऊन येईल. हे नवीन वर्ष प्रगती आणि भरभराटीचे ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी
दिल्या. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसमावेशक विकासासाठी स्वत:ला समर्पित करण्याचं
आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हा आनंदाचा प्रसंग विकासाची
गती सुनिश्चित करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक जोमाने टिकवून ठेवण्याची संधी असल्याचं
त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्याचा
संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी जनतेला केलं.
****
राज्यातल्या
देवस्थानांच्या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी
गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटच्या
स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी
मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिर्डीत
आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी
राज्यासह देशभरातून भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं
यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे.
बुलडाणा
जिल्ह्यात शेगाव संत नगरीतही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे शेगाव नगरीला
मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नाशिक
जिल्ह्यात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर परिसरात भाविकांची अलोट
गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिर संस्थानकडून चोवीस तास दर्शनासाठी खुले
ठेवण्यात येत आहे.
औरंगाबाद
इथं सायंकाळी साडेसहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत पावणे सहाशे पोलिसांचा बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची
तपासणी करण्यात येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत
सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment