Friday, 30 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी; देशभरातून कुठूनही मतदान करणं शक्य होणार

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचं निधन;महान फुटबॉलपटू पेले कालवश 

·      विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र

·      केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचा आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम

·      समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किटची घोषणा

·      सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा-राज्य सरकारचं केंद्राला पत्र

·      विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

आणि

·      देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश

 

सविस्तर बातम्या

केंद्रीय निवडणूक आयोगानं रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी केली आहे. यामुळे इतर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आपल्या राज्यात परतण्याची गरज आता राहणार नाही. देशभरातून कुठूनही आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगानं बहु-मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान-यंत्र निर्माण केलं असून, या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रातून बहात्तर मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या यंत्राच्या उपयोगाची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेला सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून, या पक्षांनी येत्या एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतच्या आपल्या सूचना मांडाव्यात, असं त्यांना सांगितलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांचं आज पहाटे अहमदाबाद इथं निधन झालं, त्या शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. हिराबा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे परवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं काल कर्करोगानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. २१ वर्षांच्या कारकिर्दीत पेले यांनी १ हजार २८१ गोल केले. त्यांनी ब्राजिल संघाला तीन वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. पेले यांच्या निधनानं क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील आदींसह सुमारे ३९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या प्रस्तावाबाबत कल्पना नसल्याचं, वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. त्यापूर्वी काल विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

केंद्राच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम राबवण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली .या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या ड वर्ग महानगरपालिका, ब आणि क वर्ग नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींमधल्या शहरांचा समतोल आणि कालबद्ध सर्वसमावेशक विकास करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केलं.

****

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी केंद्र सरकारकडे केली असून, ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्रीयांनी व्यक्त केला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सुरू केलेल्या, विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास, या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्राच्या मान्यतेनंतर तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन झाल्यावर, प्रादेशिक असंतुलन शोधून समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

मराठवाडा आणि विदर्भात सत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिल आहे, यातून या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आता या महामार्गामुळे नागपूर आणि औरंगाबाद थेट संपर्क झाला असल्याने, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या धार्मिक आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होणार आहे. याठिकाणीही पर्यटन स्थळांवर सुविधा विकसित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. समृद्धी महामार्ग गडचिरोली मार्गे छत्तीसगड तसंच मध्यप्रदेशाला जोडण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाड्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा औद्योगिक मार्गिकेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले...

 

Byte …

नागपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर देखील आपण विकसित करतोय. मग त्यात मराठवाड्याला पण न्याय मिळणार आहे. आणि मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे जे काही आहेत, ते ही त्याच्यातून कव्हर होतायत. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टीक सपोर्ट देखील तयार होतील.

****

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चेत बोलताना, मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले,

 

Byte ..

ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन त्यावेळेस माझी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधीत्व द्या अन् बाकीच्या पण जागा त्या ठिकाणी भरा. कुठल्या घ्यायच्यात त्या भरा.

****


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अधिक बळकट करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं तसंच समुपदेशन उपक्रमात तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार एक नवीन धोरण आखत असल्याची माहिती दिली. ऊर्जा योजनेसाठी केंद्रानं एकोणचाळीस हजार सहाशे दोनकोटी रुपये मंजूर केल्याचं फडणवीस  यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातले किमान तीस टक्के शेतकरी पूर्णपणे सौरऊर्जा वापराकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या प्रकारचा पहिला पथदर्शी फीडर राळेगण सिद्धी इथं बसवण्यात आला असून, या गावातल्या ग्रामस्थांनी अजून एका सौर फीडरची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणं आवश्यक असून, राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करत नाही मात्र काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधलं.

****

पाणीपुरवठा विभागातल्या कामांना गती मिळावी यासाठी या विभागातल्या एक हजार तीनशे तेरा जागा भरण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक उपअभियंता पद भरण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत दिली. बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

राज्यातल्या ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेत दिली.

****


परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला पन्नास वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त, पन्नास कोटी रुपये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, त्यापैकी पंचवीस कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, आणि उर्वरित निधी आवश्यकतेनुसार देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत दिली.  कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.

****

सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच निर्यात धोरणात योग्य तो बदल करावा, अशी मागणी करणारं पत्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला आठ हजार ७०० रुपये, आणि कापसाला १२ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे. सोयाबीन ढेप निर्यातीसंदर्भात धोरणात बदल करावा, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावं, आदी मागण्यांही सत्तार यांनी पत्रातून केल्या आहेत.

****

राज्यातल्या बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसंच अशा डॉक्टरांना अधिकाधिक कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीनं कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला  ते उत्तर देत होते. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात चार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहितीही महाजन यांनी यावेळी दिली.

****

परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या पदवीधारकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं काल देशभरातल्या एक्क्याण्णव ठिकाणी छापे घातले. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, बुलडाणा, पुणे, जळगाव इथल्या वैद्यकीय परिषदांचा, तसंच परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

****

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी १२ जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करता येतील. या जागांसाठी मतदान ३० जानेवारीला होईल आणि २ फेब्रुवारीला निकाल लागतील.

****

देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातल्या शहरांमध्ये मार्च २०२३ पर्यंत 5-जी सेवा सुरू होणार आहे. औरंगाबाद शहराचा या टप्प्यात समावेश करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड अग्रीकल्चर - सीएमआयए संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून सीएमआयएने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात येत्या मार्च महिन्यापासून 5-जी सेवा उपलब्ध होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरसकट सगळ्या दिव्यांगांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचे आदेश, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर, कुटुंबप्रमुख दिव्यांग असल्यास मिळकत करामध्ये मिळणारी पन्नास टक्के सूट, ही कुटुंबाचे प्रमुख नसलेल्या दिव्यांगांनाही मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीनं केली होती, त्यानंतर, ही अट शिथिल करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या शेवाळा इथं मन्याड नदी संवाद यात्रेचा काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मन्याड नदीमधली गाळामुळे बंद पडलेली लिंबा उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गाळ काढण्याची तयारी दाखवल्याबद्दल राऊत यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं.

****

राज्य शासनाच्या २०२१-२२ च्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात उस्मानाबादच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मधले क्रीडा शिक्षक संजय देशमुख यांना विशेष क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मक्रणपूर इथं आज मक्रणपूर परिषद आणि जयभीम दिन स्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान आयोजित या परिषदेची सुरुवात सकाळी दहा वाजता ध्वजारोहणाने होईल. या परिषदेदरम्यान आज विविध कार्यक्रम होणार आहेत.

 

२०२२ या वर्षाचे अखेरचे २ दिवस शिल्लक आहे. सर्वत्र नव्या वर्षाची तयारी सुरू झाली आहे. या सरत्या वर्षानं आपल्याला काय दिलं, काय शिकवलं याचा आढावा घेणारा कार्यक्रम ‘सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा आज रात्री साडे ९ वाजता अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित केला जाईल. राज्यातल्या सर्व केंद्रांवरुन हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल.

****

No comments: