Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती.
·
कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम - आरोग्यमंत्री
डॉ. तानाजी सावंत यांची ग्वाही.
·
राज्यात खाजगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा.
आणि
·
भारत आणि बांगलादेश दरम्यानचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना रंगतदार
अवस्थेत.
****
जगातल्या
काही देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा
उपाय म्हणून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी
आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख
मांडवीय यांनी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी चर्चा करून तात्काळ ही चाचणी
अनिवार्य करण्यात येईल. भारतात आल्यानंतर कोणालाही तापासारखी कोविडची लक्षणं आढळली
किंवा RTPCR चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं तर त्या रुग्णाला तत्काळ विलगीकरणात
पाठवण्याचे आदेश आरोग्य मंत्रालय जारी करेल, असं मांडवीय यांनी सांगितलं.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम असून नागरिकांनी या सदर्भातल्या
नियमांचं पालन करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यांच्या
हस्ते आज पिंपरी चिंचवड इथं अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं, त्यावेळी सावंत
बोलत होते. ते म्हणाले -
महाराष्ट्राची स्थिती अगदी ताकदीची
आहे. कारण जवळपास ९५% लोकांचं लसीकरण झालेलं आहे. आपली हर्ड इम्युनिटी महाराष्ट्रातली
अतिशय चांगली आहे. आपला बुस्टर डोस सुद्धा ६० ते ७० टक्के लोकांपर्यंत पोहोचला आहे.
त्याच्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. मंदिरात जाऊ, पर्यटनस्थळी जाऊ, मुलांना
सुट्ट्या लागलेल्या आहेत. आणि एव्हढं माफक आवाहन करतो आपल्या माध्यमातून थोडं डिस्टन्स
मेंन्टेन करा, सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरा, घाबरायचं तर अजिबात करण नाही. आणि म्हणून
प्रत्येक सण-सुद असेल किंवा अशा सुट्ट्या असतील तर एन्जॉय करायचं का? तर डेफिनेट एन्जॉय
करायचा पण काही तत्व काही बंधनं पाळून करायचा एव्हढं आपल्याला आवाहन करतो.
राज्याचं
९५ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. वर्धक मात्राही देण्यात आलेली आहे. त्यामुळं नागरिकांनी
घाबरण्याचं कारण नसल्याचं सावंत यांनी नमूद केलं.
****
शेजारच्या
देशातल्या वाढत्या कोरोना परिस्थितीमुळं तीर्थक्षेत्र आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापराचं
आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी
मंदिर, शिर्डीच्या साई संस्थान आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर परिसरात मास्क वापरण्याचं
तसंच सुरक्षित अंतर पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंढरपूर मंदिर व्यवस्थापनानं
कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. कोल्हापुरात आजपासून महालक्ष्मी अंबाबाई
मंदिरातल्या कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांनी
मास्कचा वापर करावा असं आवाहन केलं आहे. त्यांना सक्ती केलेली नाही.
****
महाराष्ट्र
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांनी नियुक्ती
करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहांदे यांना आज मुंबईत पद आणि
गोपनीयतेची शपथ दिली. डॉ.चहांदे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी आहेत.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांचं सकाळी पावणे अकरा वाजता चिकलठाणा
विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते छावणी परिषदेच्या मैदानावर नानासाहेब धर्माधिकारी
प्रतिष्ठानच्या शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेत मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री
शिंदे दुपारी सव्वा बारा वाजता विमानानं सोलापूरला रवाना होणार आहेत.
****
राज्यात
आगामी काळात खाजगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मूळ पशुवैद्यकीय
विद्यापीठांच्या नियमात बदल करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठाच्या
अंतर्गत ठराविक महाविद्यालयं होती. मात्र कृषी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यानंतर
खाजगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालयं सुरू झाली. त्याच धर्तीवर राज्यातल्या पशुसंवर्धन
विद्यापीठातल्या कायद्यामध्ये बदल केला जाणार असून त्यानंतर खाजगी तत्वावर पशुसंवर्धन
महाविद्यालयांना परवानगी देण्यात येणार असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं.
****
खऱ्या
विषयांपासून लक्ष विचलित करण्यासाठी देशामध्ये हिंदू-मुस्लीम वैरभाव पसरवला जात असल्याचा
आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा
आज नवी दिल्लीत पोहोचली, त्यावेळी लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ही यात्रा १०८ दिवसांचा प्रवास करुन आज सकाळी सहा वाजता दिल्लीत पोहोचली. काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी या यात्रेचं बदरपूर इथं स्वागत केलं. तामिळनाडू इथून सुरु झालेली ही
यात्रा तेलंगणा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना
भेट देऊन आज नवी दिल्लीत दाखल झाली.
****
महाराष्ट्र
-कर्नाटक सीमा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून सीमा बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू
करणार आहे. तसंच या पूर्वीच्या सरकारनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना
सांगितलं. आमचं शासन सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा, निर्वाळा केसरकर
यांनी दिला. सरकारनं कर्नाटक महाराष्ट्राच्या राज्यपालांची बैठक बोलावून सकारात्मक
पाऊल टाकलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा प्रदीर्घ काळ प्रलंबित सीमा
प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमदारांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे
राज्याबरोबर केंद्र सरकार सुद्धा सीमा बांधवांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचं केसरकर
यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र
आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा
परस्पर समन्वय दृढ आणि व्यापक करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी दिले आहेत. दोन्ही
राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक आज अमरावती इथं झाली त्यावेळी हे निर्देश
देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी
आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या
नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात जेणेकरुन त्यांची माहिती दोन्ही राज्यातील
प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणं शक्य होईल, अशा सूचना कोश्यारी
यांनी यावेळी दिल्या.
****
भारत
आणि बांगलादेश दरम्यान ढाका इथं सुरू दुसरा कसोटी क्रिकेट सामना रंगतदार अवस्थेत आहे.
या सामन्यात विजयासाठी १४५ धावांचं लक्ष्य असलेल्या भारतीय संघानं तिसऱ्या दिवस अखेर
चार बाद ४५ धावा केल्या आहेत. अक्षर पटेल २६ आणि जयदेव उनाड्कट तीन धावा काढून खेळत
आहेत. कर्णधार के. एल. राहुल तसंच चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली बाद झाले
आहेत. मेहीदी हसन यानं तीन गडी बाद केले आहेत. त्या आधी बांगलादेश संघांनं आपल्या दुसऱ्या
डावात २३१ धावा केल्या. अक्षर पटेलनं तीन तर आर. अश्र्विन, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी
दोन गडी बाद केले. उमेश यादव, जयदेव उनाद्कट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बांगलादेशकडून
लिट्टन दास यानं ७३ तर झाकीर हसन यानं ५१ धावा केल्या. बांगलादेशनं पहिल्या डावात २२७
धावा केल्या आहेत. भारताला पहिल्या डावातली ९२ धावांची आघाडी आहे.
****
केंद्रीय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली इथं आज खेलो इंडियाच्या
नव्या ‘डॅशबोर्ड’चं अनावरण केलं. यावर ‘खेलो इंडिया’ योजना आणि ‘खेलो इंडिया’च्या कार्यक्रमांशी
संबंधित सर्व सांख्यिकी माहिती उपलब्ध आहे. यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला या
योजनेसंबंधी विविध प्रकारची ताजी आकडेवारी, इतर लाभ या संबंधी सर्व माहिती उपलब्ध होईल.
****
भारतीय
अर्थव्यवस्था नवी भरारी घेत असून भारताचं पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न
नक्की साकार होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त
केला आहे. ते आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३व्या अखिल
भारतीय वाणिज्य परिषदेच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. या परिषदेत भारतीय वाणिज्य संघटनेच्या
वतीने ‘इंडियाज मार्च टूवडर्स फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी बाय २०२४’ या विषयावर तीन दिवसीय
परिषद घेण्यात आली. वाणिज्य परिषदेत झालेले मंथन देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशादर्शक
ठरेल, असा विश्वासही डॉ.कराड यांनी यावेळी व्यक्त केला.
****
No comments:
Post a Comment