Saturday, 1 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत साडे ९१ रुपयांची कपात केली आहे. दिल्ली आजपासून १९ किलो एलपीजी व्यावसायिक सिलेंडर दोन हजार २८ रुपयांना, तर मुंबईत एक हजार ९८० रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं भारतीय तेल महामंडळानं सांगितलं.

****

इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात आय पी पी बी, या टपाल खाते संचालित बँकेनं, आपल्या ग्राहकांसाठी व्हॉटस्अॅप बँकिंग सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या मोबाईल फोनद्वारे बँकेचे व्यवहार करणं सोपं होणार आहे. घरपोच सेवा, जवळचं टपाल ऑफिस शोधणं आणि इतरही सेवा या सुविधेद्वारे उपलब्ध होणार आहे.

****

केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल राष्ट्रीय पुरवठा संकेतस्थळाच्या सागर सेतू मोबाईल अॅपचं लोकार्पण केलं. हे मोबाइल अॅप सामान्यत: आयातदार, निर्यातदार आणि सीमा शुल्क मध्यस्थ यांच्या आवाक्यात नसलेल्या कार्याची प्रत्यक्ष माहिती प्रदान करेल. यामध्ये जहाजाशी संबंधित माहिती, तसंच जहाजांच्या वाहतुकी संबंधित व्यवहारांचा समावेश आहे. आयात आणि निर्यातीच्या मंजुरी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या देयकांच्या डिजिटल व्यवहारासाठी  देखील हे अॅप उपयोगी आहे. या अॅपमुळे सागरी व्यापाराला चालना मिळेल आणि देशाची अर्थव्यवस्था वाढेल अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या बुधवारी रात्री घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली, आणि माहिती घेतली.

दरम्यान, या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी सुमारे ५०० अज्ञातांविरोधात विविध १८ कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, लाखोंचा जनसमुदाय सभेला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या राज्य शासनानं छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न रेंगाळून ठेवलं आहेत, पाणीपुरवठा योजना, रस्ते या सारख्या योजना रखडल्या असून त्यांना सरकारनं गतिमान करण्याची गरज असल्याचं देसाई म्हणाले.

****

राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, कांदा अनुदान योजना २०२२-२३ चा लाभ घेण्यासाठी, तीन एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अर्ज करावेत असं आवाहन राज्याच्या पणन संचालकांनी केलं आहे. हे अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे करता येणार आहे. 

****

राज्यात दिव्यांगांसाठी महाशरद हा उपक्रम, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येत आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक सहाय्यक उपकरणांची नोंदणी  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाशरद डॉट इन, या संकेतस्थळावर करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था या एकमेकांशी संपर्क साधू शकतील.

****

मानसिक आरोग्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन लातूर जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी.बी. माने यांनी केलं आहे. लातूर इथं काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत समाजात जनजागृती व्हावी आणि मानसिक रूग्णांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी या कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक असून, आरोग्य मंडळानं त्यादृष्टीनं प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली. सरकारने राज्यात एकूण आठ विभागांत आरोग्य मंडळाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधुनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या मिया ब्लीचफेल्ड्ट हिचा 21-14, 21-17 असा पराभव केला.

पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदंबी श्रीकांतला पराभव पत्करावा लागला.उपांत्यपूर्व फेरीत त्याला जपानच्या खेळाडूने मात दिली.

****

येत्या सहा एप्रिलपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या या अंदाजात, उद्या छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

//**********//

No comments: